राम मंदिराच्या पहिल्या मजल्याचे काम वेगाने सुरु; ‘असा’ असेल राम दरबार, कधी होणार पूर्ण?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 05:16 PM2024-05-09T17:16:28+5:302024-05-09T17:17:06+5:30
Ayodhya Ram Mandir News: राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावर राम दरबाराची रचना केली जात असून, या ठिकाणी अनेक मूर्तींची स्थापना केली जाणार आहे.
Ayodhya Ram Mandir News: अयोध्येतील राम मंदिरात रामललाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे. राम मंदिराचे लोकार्पण होऊन अनेक महिने लोटले तरी भाविकांचा महासागर अजूनही अयोध्येत लोटताना दिसत आहे. दररोज लाखो रामभक्त अयोध्येत जाऊन रामललाचे दर्शन घेत आहेत. केवळ देशातून नाही, तर परदेशातूनही हजारोंच्या संख्येने लोक राम मंदिर पाहण्यासाठी अयोध्येत येत आहेत. राम मंदिराचे काम पूर्ण झालेले नाही. पहिल्या मजल्यावर राम दरबार करण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने राम मंदिराचे बांधकाम २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावर प्रभू श्रीराम आणि माता-पित्यांच्या मूर्ती बसवल्या जाणार आहेत. श्रीरामांसह माता सीता आणि लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्या प्रतिमाही स्थापित केल्या जाणार आहेत. प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत हे या सर्वांची रचना करणार असल्याचे सांगितले जात आहे.
राम मंदिर भवन बांधकाम समितीचे अध्यक्ष निपेंद्र मिश्रा यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावर राम दरबार बांधला जाणार आहे. राम दरबाराची कलाकृती बनवण्याचे काम सुरू आहे. राम दरबाराचे काम वासुदेव कामत हे करणार आहेत. याच मंदिरात रामचरितमानसकार गोस्वामी तुलसीदास यांची मूर्तीही स्थापन केली जाणार आहे. तसेच राम दरबारात प्रभूंच्या लीलांचे दर्शन भाविकांना घडवण्यात येईल, असे मिश्रा म्हणाले.
दरम्यान, अलीकडेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अयोध्येत जाऊन राम मंदिरात रामललाचे दर्शन घेतले. श्रीरामांचरणी द्रौपदी मुर्मू नतमस्तक झाल्या. तसेच अयोध्या दौऱ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शरयू नदीची आरतीही केली.