विजयपताका श्रीरामाची, झळकते अंबरी, प्रभू आले मंदिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 11:02 AM2024-01-22T11:02:11+5:302024-01-22T11:02:25+5:30

रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा पुढील कित्येक वर्ष जगभरात लक्षात राहील.

ayodhya ram mandir pran pratishtha ceremony and auspicious event | विजयपताका श्रीरामाची, झळकते अंबरी, प्रभू आले मंदिरी

विजयपताका श्रीरामाची, झळकते अंबरी, प्रभू आले मंदिरी

अवघा देश राममय झाला आहे. श्रीराम दर्शनाची आस सर्वांना लागली आहे. जवळपास ५०० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेरीस रामलला विराजमान होत आहेत. प्रत्यक्ष त्रेतायुगात श्रीरामांना १४ वर्षांचा वनवास भोगावा लागला होता. मात्र, आताच्या कलियुगात श्रीराम ५०० वर्षांचा संघर्ष करत मंदिरी विराजमान होत आहेत. आदर्श पुत्र, एकपत्नीव्रती, महापराक्रमी, सर्वश्रेष्ठ योद्धा आणि आदर्श राजा म्हणून आजही श्रीरामांची महती गायली जाते. रामलला प्राणप्रतिष्ठेचा भव्य सोहळा होत आहे. केवळ भारतात नाही, तर संपूर्ण जगभरात या सोहळ्याची उत्सुकता आहे.

भगवान विष्णूच्या दशावतारांमध्ये सातवा अवतार श्रीरामांचा असल्याचे म्हटले जाते. रामायण, महाभारतानंतर आलेल्या कलियुगात भरतवर्षावर अनेकांनी आक्रमणे केली. यामध्ये देशभरातील अनेक मंदिरे उद्ध्वस्त केली. भारतातील एकता तोडण्याठी ही रणनीति वापरण्यात आली. रामजन्मस्थानही याला अपवाद नाही. यानंतर पुन्हा एकदा रामजन्मभूमी आणि राम मंदिराचा मुद्दा मोठ्या प्रमाणात उचलण्यात आला. आताच्या काळानुरूप प्रक्रिया करण्यात आली. प्रसंगी न्यायालयात कायदेशीर लढाई लढून अखेरीस राम मंदिराचा मार्ग मोकळा झाला.

रामाच्या राज्याभिषेक सोहळ्याची आधुनिक काळातील प्रचिती

रावणवध केल्यानंतर बिभिषणाकडे श्रीलंकेचे राज्य सोपवून श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण आणि हनुमंतांसह हजारो लोक अयोध्येत आले होते. अयोध्येची अवघी प्रजा रामाची आतुरतेने वाट पाहत होती. अखेरीस अयोध्येत आल्यानंतर श्रीरामांचा त्रिवार जयजयकार करण्यात आला. आनंदाने अयोध्याजन अगदी नाचत होते. श्रीरामांचा राज्याभिषेक झाल्यानंतर ज्या ज्या लोकांनी रामकार्यात हातभार लावला, त्या सर्वांचा मान-सन्मान, आदर-सत्कार करण्यात आला. रामराज्यातील तो सोहळा कसा असेल, याची किंचित प्रचिती आपल्याला येऊ शकते. ५०० वर्षांपासून रामजन्मभूमी आणि राम मंदिरासाठी ज्यांनी ज्यांनी आपले आयुष्य वेचले, संघर्ष केला, लढा दिला, त्यांचे स्मरण करून आज हयात असलेल्यांचा मान-सन्मान, आदर-सत्कार करण्यात येत आहे.

विजयपताका श्रीरामांची, झळकते अंबरी, प्रभू आले मंदिरी

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक आणि अभूतपूर्व निकालानंतर अखेरीस राम मंदिर निर्माणाचा मार्ग मोकळा झाला. प्रभू पुन्हा मंदिरी परतणार यावर शिक्कामोर्तब झाले. अवघ्या देशाने आनंदोत्सव साजरा केला. यानंतर सर्वजण पुन्हा रामकार्याला लागत मंदिर उभारणीवर भर देण्यात आला. संपूर्ण भारत पुन्हा एकदा रामकार्यासाठी सज्ज झाला. जवळपास ४ ते ५ वर्षांनंतर राम मंदिर प्रत्यक्ष दिसू लागले. देशात पुन्हा एकदा चैतन्य निर्माण झाले. राम मंदिरासाठी आपलाही खारीचा वाटा असावा, असे रामभक्तांना वाटू लागले आणि जे जे आपल्याला शक्य होईल, ते ते अयोध्येत पाठवण्यास सुरुवात झाली. देशाच्या सर्व भागातून काही ना काही हातभार लावण्यात आला. 

अखेरीस रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा प्रत्यक्ष पाहण्याचा योग हजारो लोकांना येणार आहे. हा अद्भूत सोहळा  पुढील अनेक वर्षे कायम स्मरणात राहणार आहे. प्रत्येक जण आपापल्यापरिने रामाची स्तुती, रामगायन, रामनामाचा जयघोष करताना दिसत आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा देशाची ताकद जगाला दिसणार आहे. रामराज्य हे सर्वदूर पसरले होते, असे म्हटले जाते. तसेच सर्वदूर पसरलेला रामनामाचा आणखी कित्येक पटीने वृद्धिंगत होणार आहे. रामराज्याचा संकल्प घेऊन पुनःप्रत्यर्याचा आनंद मिळण्यासाठी रामकार्यात आपणही सहभागी होऊया.. नैतिकता, मर्यादा पुरुषोत्तम, उत्तम शासक-प्रशासक, आदर्शांचा आदर्श असलेल्या रामाचे स्मरण करून आपापल्यापरिने रामराज्य घडण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करूया.. खारीचा वाटा प्रत्येकाने उचलला तर रामराज्याचा संकल्प साकार होणे कठीण गोष्ट नाही..

||जय श्रीराम||
 

Web Title: ayodhya ram mandir pran pratishtha ceremony and auspicious event

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.