आयुर्वेद सांगते, प्रात:स्नानाचे होतात दहा चमत्कारिक फायदे!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 07:29 AM2021-05-08T07:29:07+5:302021-05-08T07:29:36+5:30
नित्य स्नानाचा मुख्य लाभ हा, की शरीराला अपेक्षित जलतत्त्वाची पूर्तता होते.
स्नान सूयोदयापूर्वीच करावे असे शास्त्र सांगते. `नद्यां स्नानानि पुण्यानि' असे धर्मशास्त्राचे वचन आहे. म्हणजेच नदीतील स्नान पुण्यकारक असते, असा या वचनाचा अर्थ आहे. परंतु नदीस्नान शक्य नसले, तरी घरच्या घरी सूर्योदयापूर्वी थंड पाण्याने केलेले स्नान तितकेच पुण्यकारक व लाभदायक ठरते.
पूर्वी नदीस्नानाचा आग्रह का केला जात असे? तर सतत वाहते पाणी हे प्रदुषणमुक्त असते, स्वच्छ व पवित्र असते. मागील रात्री रात्रभर चंद्राच्या आणि नक्षत्रांच्या किरणांतून अमृत कणांचा वर्षाव विश्वावर आणि जलाशयातील जलावर झालेला असतो. सूर्योदयानंतर मात्र ती अमृतभारितता सूर्यकिरणांमुळे नष्ट होते. म्हणून स्नान हे सूर्योदयापूर्वी तेही वाहत्या पाण्यात करणे हिताचे मानले जात असे.
स्नान प्रवासात डुंबत शांतपणे करावे. कमरेएवढ्या पाण्यात उभे राहून आचमन, मार्जन, संकल्प, तर्पण करायचे असते. तेवढा वेळ पाण्यात उभे राहिल्याने वंशपरंपरागत शारीरिक विकार नष्ट होतात. यावर आताच्या काळात टब बाथ हा पर्याय वैज्ञानिकांनी शोधून काढला आहे. परंतु ते पाणी प्रवाही नसल्याने नदी स्नानाचे मूल्य देऊ शकत नाही.
आयुर्वेद सांगते-
गुणा दश स्नानपरस्य पुंस: रूपं च तेजश्च बलं च शौचम
आयुष्यमारोग्यमलोलुपत्वं दु:स्वप्नघातश्च तपश्च मेघा।।
याचा अर्थ असा, की नित्य प्रात: स्नानात दहा गुण आहेत. रूप, तेज, बल, कांति, शुद्धता, दीर्घायुष्य, निरोगिता, आळसावर मात, दुष्ट स्वप्नांचा नाश, तप आणि मेघा. मेघा म्हणजे धारणाशक्ति. हे दहा गुण प्रात:स्नानाने प्राप्त होतात.
आपल्या वेदाने सांगितले आहे, की पाण्यात सर्व वनौषधि विद्यमान आहेत. नित्य स्नानाचा मुख्य लाभ हा, की शरीराला अपेक्षित जलतत्त्वाची पूर्तता होते. शरीर पंचभूतांचे आहे. पंचभूतात जलतत्त्व आहे. शरीराला या जलतत्त्वाचाही पुरवठा हवा. स्नानामुळे साडेतीन कोटी रोमरंध्रातून जलतत्त्व शरीरात प्रविष्ट होते व पंचतत्त्वाची धारणा होते. स्नानानंतर रोमरंध्रात पाणी मुरते.
मंगलस्नान गरम पाण्याने केले, तरी डोक्यावर थंड पाणीच वापरावे. त्यामुळे उष्णताजन्य नेत्रविकार होणार नाहीत.त्यामुळे, यापुढे आंघोळीचा कंटाळा न करता आंघोळीची गोळी बंद आणि प्रात:स्नान सुरू करा व असाधारण लाभ मिळवा.