Baba Bholenath: निसर्गाचा अद्भुत अविष्कार; प्रति अमरनाथ; शिवलिंगावर होतो नैसर्गिक जलाअभिषेक!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 08:35 AM2023-08-14T08:35:31+5:302023-08-14T08:35:57+5:30
Shiv Temple: बाबा अमरनाथप्रमाणे येथेही बर्फाचे शिवलिंग बनते आणि पावसाळ्यात धबधब्याच्या रूपाने नैसर्गिक अभिषेक होतो; या ठिकाणाबद्दल जाणून घ्या.
हिमाचल प्रदेशातील मनालीपासून २५ किमी अंतरावर असलेल्या सोलंगनालाजवळ अंजनी महादेव येथे ११.५ हजार फूट उंचीवर बर्फाचे शिवलिंग नैसर्गिकरित्या तयार होते. त्याच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक तेथे पोहोचतात. पावसाळ्यात या शिवलिंगावर उंचावरून पडणाऱ्या धबधब्यामुळे जलाभिषेक होतो आणि हिवाळ्यात हे शिवलिंग अगदी बाबा अमरनाथसारखे पूर्ण बर्फाच्छादित होते, म्हणून लोक त्याला प्रति अमरनाथ असेही म्हणतात.
मिळालेल्या माहितीनुसार, या बर्फाच्छादित शिवलिंगाचा आकार ३० फुटांपेक्षा जास्त असतो. अंजनी महादेवावरून कोसळणारा धबधबा बर्फात रुपांतर होऊन शिवलिंगाचे रूप घेत आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत शिवलिंगाचा आकार आणखी वाढू शकतो.
या ठिकाणचे स्थानमहात्म्य सांगताना एक पौराणिक कथेचा संदर्भ दिला जातो. तो म्हणजे अंजनी मातेचा! त्रेतायुगात माता अंजनीने पुत्रप्राप्तीसाठी व मोक्ष मिळावा म्हणून तपश्चर्या केली. त्यावेळेस शिवाराधनेसाठी जे शिवलिंग तयार केले, तेच अंजनी महादेव म्हणून ओळखले जाऊ लागले. भगवान शिव अंजनी मातेच्या तपश्चर्येला भुलून आनंदाने प्रकट झाले. तेव्हापासून हे शिवलिंग किंवा हे शिवालय इच्छापूर्तीचे स्थान म्हणूनही नावारूपास आले. या शिवलिंगाचे दर्शन घेतल्याने माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते, अशी श्रद्धा आहे.
याठिकाणी शिवलिंग बनणे हा दैवी चमत्कार असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. यासोबतच लोक बर्फात अनवाणी चालतात, निसर्गाचा आनंद घेतात. बाबा भोलेनाथाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने जातात.
हिमाचल प्रदेश हे मुळातच पर्यटन शहर आहे. तर दुसरीकडे देश-विश्वातून लोक कुल्लू-मनालीला भेट देण्यासाठी येतात. अटल बोगदा रोहतांगलाही पर्यटकांची पहिली पसंती आहे. मात्र, यावेळी हिमाचलमधील पूर आणि विध्वंसामुळे पर्यटकांची संख्या खूपच कमी झाली आहे. मात्र अंजनी महादेवाच्या भेटीला जाणाऱ्या भाविकांच्या संख्येत घट झालेली नाही. तुम्हालाही निसर्गाचा अद्भुत सोहळा बघायचा असेल तर तुम्हाला मनाली ते सोलांगनाला हा १५ किलोमीटरचा प्रवास टॅक्सीने करावा लागेल. यानंतर तुम्ही सोलंगनाला ते अंजनी महादेव असा पाच किलोमीटरचा प्रवास पायी किंवा घोड्याने करू शकता. तिथून बाबा भोलेनाथ किंवा प्रति अमरनाथला जाण्यासाठी पायी जावे लागते आणि त्यातच खरा आनंद आहे! हर हर महादेव...!