Bail Pola 2022: आज पोळ्याचा उत्सव; त्यानिमित्ताने वाचा एका शेतकरी दादाची आणि बैलांची मजेशीर गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 11:57 AM2022-08-26T11:57:02+5:302022-08-26T11:58:05+5:30

Bail Pola 2022: बैल पोळा हा कष्टकऱ्यांचा सण आहे, रिकामटेकड्या लोकांचा नाही. याची जाणीव करून देत आहेत हे शेतकरी दादा. वाचा हा मजेशीर किस्सा!

Bail Pola 2022: Festival of Pola today; On that occasion, read the funny story of a farmer and the bulls! | Bail Pola 2022: आज पोळ्याचा उत्सव; त्यानिमित्ताने वाचा एका शेतकरी दादाची आणि बैलांची मजेशीर गोष्ट!

Bail Pola 2022: आज पोळ्याचा उत्सव; त्यानिमित्ताने वाचा एका शेतकरी दादाची आणि बैलांची मजेशीर गोष्ट!

googlenewsNext

आज ढवळ्या-पवळ्यांचा दिवस. शेतकऱ्यांशी इमान ठेवणारे हे मित्र, त्यांचा आणि पर्यायाने आपलाही उदरनिर्वाह करतात. आजच्या आधुनिक शेतीच्या काळात  त्यांचा उपयोग होत नसेलही, पण निरुपयोगी झालेली वस्तू किंवा व्यक्ती टाकून देणारा शेतकरी दादांचा स्वार्थी स्वभावही नाही. आपल्या वृद्ध माता पित्यांप्रमाणे ते पशुधनाचे संगोपन करतात. कारण कष्टकरी बैल कोण आणि बैलबुद्धीचे कोण यातला भेद ते निश्चितपणे जाणतात. यावरून एक मजेशीर किस्सा आठवला. ह.भ.प.मकरंदबुवा रामदासी यांनी कीर्तनात तो सांगितला होता.

काही कॉलेज तरुण निसर्गाच्या सान्निध्यात निवांत क्षण घालवण्यासाठी एका गावात गेले. ठिकठिकाणचे फोटो घेत, सेल्फी घेत ते एका शेतातून जात होते. त्या शेतात त्यांना उसाच्या रसाचं गुऱ्हाळ दिसलं. सूर्य डोक्यावर आला होता. घुंगराची मंजुळ खुळ खुळ कानावर पडताच तहानलेले युवक गुऱ्हाळाच्या दिशेने वळले. तिथे गेल्यावर पाहिलं, तर दोन बाक ठेवले होते. मुलांनी त्यावर मांड ठोकली. त्यांची हाश हुश ऐकून शेतकरी दादा आतल्या खोलीतून बाहेर आले. मुलांनी काही न बोलता हाताने चार फुल्लची ऑर्डर दिली. 

दादा गळ्यातल्या उपरण्याने कपाळाचा घाम टिपत परत आत गेले. पुढच्या काही क्षणांत रसाचे चार ग्लास चौघांच्या पुढ्यात ठेवले. सुमधुर रसाचा एक घोट पोटात जाताच मुलांनी मुक्त कंठाने कौतुक केलं. दादांनी स्मित करून समाधान व्यक्त केलं. अशिक्षित दिसणाऱ्या शेतकरी दादासमोर उगीच आपलं ज्ञान पाजळण्याची मुलांना हुक्की आली. ग्लास मोठा होता आणि मुलांची प्रश्नपत्रिकासुद्धा! रस प्यावा, पैसे द्यावे आणि मुकाट निघावं, ते सोडून मुलं शेतकरी दादांची शाळा घेऊ लागले. दादांचा स्वभाव शांत होता. ते नम्रपणे उत्तर देत होते.

हा तुमचा पूर्णवेळ व्यवसाय आहे का? शेत कोण सांभाळतं? उत्पन्न किती? पीक कोणतं? दुष्काळ-सुकाळ, नफा-तोटा, कुटुंब कबीला, असं सगळं काही प्रत्येकी १० रुपयांत विचारून घेतलं. शेवटी ग्लासमधला आणि बोलण्यामधला रस संपला तेव्हा कुठे मुलं पैसे देऊन जायला निघाली. 

अचानक एकाची ट्यूब पेटली, मशीनचा तर आवाज आला नाही, मग रस कसा दिला? दादा म्हणाले, माझ्याकडे लाकडी घाणा हाये नि त्याला बैल जुंपले हायेत. घाण्यात ऊस टाकला की बैल गोल गोल फिरत राहतात. रस निघतो.' त्यावर मुलांनी प्रतिप्रश्न केला, 'पण बैलांवर लक्ष ठेवावं लागत नाही का?'

शेवटी दादा आपल्या सात्विक रागावर आवर घालत म्हणाले, 'लक्ष न्हाई ठेवावं लागत, कारण अजून कालेजात जात न्हाईत ती !'

या दृष्टांतावरून आपल्यालाही बैल आणि बैलबुद्धी यातला फरक कळला असेल. तो लक्षात घ्या आणि जे कष्ट करतात, त्यांचा आदर करा, रिकाम्या चौकशा करतात त्यांचे मनोरंजन अजिबात करू नका! हा कष्टकऱ्यांचा सण आहे, रिकामटेकड्या लोकांचा नाही!

Web Title: Bail Pola 2022: Festival of Pola today; On that occasion, read the funny story of a farmer and the bulls!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.