Balaram Jayanti 2023: श्रावणात कृष्ण जन्म साजरा करतो, तशी आज भाद्रपद षष्ठीला साजरी होते बलराम जयंती!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 12:08 PM2023-09-21T12:08:23+5:302023-09-21T12:09:03+5:30

Balaram Jayanti 2023: कंस एकामागोमाग एक देवकीच्या मुलांना जीवे मारत असताना कृष्णाच्या आधी जन्म घेऊन ज्येष्ठ बंधुत्त्व निभावणारे बलराम यांची आज जयंती!

Balaram Jayanti 2023: As Krishna's birth is celebrated in Shravan, Balaram Jayanti is celebrated today on Bhadrapada Shashti! | Balaram Jayanti 2023: श्रावणात कृष्ण जन्म साजरा करतो, तशी आज भाद्रपद षष्ठीला साजरी होते बलराम जयंती!

Balaram Jayanti 2023: श्रावणात कृष्ण जन्म साजरा करतो, तशी आज भाद्रपद षष्ठीला साजरी होते बलराम जयंती!

googlenewsNext

>> रोहन विजय उपळेकर

आज भाद्रपद शुद्ध षष्ठी, भगवान श्रीकृष्णांचे ज्येष्ठ बंधू भगवान श्रीबलरामांची जयंती! भगवान श्रीकृष्ण व त्यांचेच अंश असणारे भगवान शेषांचे अवतार भगवान श्रीबलराम हे जगाच्या कल्याणासाठी अवतरले होते. देवकीमातेचा सातवा गर्भ श्रीभगवंतांच्या योगमायाशक्तीने देवकीच्या गर्भातून काढून गोकुळात राहणा-या वसुदेवांच्या दुस-या पत्नीच्या, रोहिणीमातेच्या गर्भात स्थापन केला होता. तेच रोहिणी-वसुदेवांचे पुत्र भगवान बलराम होत. देवकीच्या गर्भातून काढून घेतल्यामुळे शेषांना 'संकर्षण' म्हणतात. त्यांनी लोकांचे रंजन केले म्हणून त्यांना 'राम' म्हणतात आणि बलवानांमध्ये श्रेष्ठ असल्याने त्यांना 'बल' असेही म्हणतात. नांगर हे त्यांचे आयुध असल्याने त्यांना 'हलधर' किंवा 'हलायुध' देखील म्हणतात. आपल्या बलाचा अतिशय नेटकेपणे व चांगल्याच कार्यासाठी, सात्त्विक गोष्टींसाठीच ते सदैव वापर करतात म्हणून त्यांना 'बलभद्र' असेही म्हणतात.

श्रीबलराम नावाप्रमाणेच अत्यंत बलवान होते. ते युद्धनीती, मल्लविद्या, मुष्टियुद्ध आदी विद्यांचे महान ज्ञाते मानले जातात. दक्षिण भारतामध्ये श्रीविष्णूंच्या दशावतारांमध्ये नवव्या बुद्धावताराच्या जागी भगवान बलरामांचीच गणना होते. 'द्वापरे रामकृष्णायां' या श्लोकातूनही बलराम-श्रीकृष्णांनाच द्वापर युगातील अवतार म्हटलेले आहे.

वैष्णव संप्रदायांमध्ये 'चतुर्व्यूह' अशी एक संकल्पना आहे. श्रीरामोपासक वैष्णव श्रीराम, लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न यांना चतुर्व्यूह म्हणतात तर श्रीकृष्णोपासक श्रीकृष्ण, बलराम, प्रद्युम्न व अनिरुद्ध यांना चतुर्व्यूह म्हणतात. ह्या चारही रूपात भगवंतच साकारलेले आहेत, अशी वैष्णवांची धारणा आहे. परमपावन श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रात 'चतुर्व्यूह' (नाम क्र.१३८), 'भुजगोत्तम' (१९३), 'धरणीधर' (२३५) 'संकर्षणोऽच्युत' (५५२), 'हलायुध' (५६२), 'धराधर' (७५६), 'चतुर्व्यूह' (७६७), 'अनन्त' (८८६) इत्यादी नामांमधून भगवान शेषस्वरूप श्रीबलरामांचाच उल्लेख करण्यात आलेला आहे. [ http://rohanupalekar.blogspot.in ]

श्रीभगवंतांनी अघासुराचा उद्धार केल्यानंतर ब्रह्मदेव चिडले. कारण देवांनी प्रत्यक्ष पापाचाच उद्धार केला होता. त्यावेळी ब्रह्मदेवांनी गोपबालक व गाई-वासरे अदृश्य करून गुहेत नेऊन ठेवली. तेव्हा त्यांचा गर्व हरण करण्यासाठी श्रीभगवंतांनी स्वत:पासून सर्व पुन्हा निर्माण केले. तेच त्या सर्वांच्या रूपात नटले व असे वर्षभर त्यांची लीला चालू होती. त्यावेळी केवळ श्रीबलरामांनाच कळले की ही गायीवासरे वेगळी आहेत. कारण भगवान बलराम हे साक्षात् श्रीकृष्णांचेच अंश होते. गोकुळातल्या इतर कोणालाही देवांची ही लीला कळली नाही.

भगवान श्रीकृष्ण रंगाने सावळे व पीतांबर धारण करीत तर श्रीबलराम गौरवर्णाचे व नीलांबर धारण करीत. सर्व गोपबालक या दोन्ही अवतारांसोबत अत्यंत आनंदित होऊन व्रजात गोचारणादी लीला-क्रीडा करीत असत. श्रीबलरामांचा विवाह आनर्त देशाच्या रैवत नावाच्या राजाच्या रेवती नामक कन्येशी झालेला होता. दुर्योधन हा बलरामांचा युद्धशास्त्रातला शिष्य होता. त्यांना आपली बहीण सुभद्रेचे त्याच्याशी लग्न लावून द्यायचे होते. पण श्रीकृष्णांना ते मान्य नसल्याने, त्यांनी अर्जुनाला त्रिदंडी संन्यास घ्यायला लावून सुभद्रेचे अपहरण करायला लावले व त्यांचा विवाह लावून दिला. महाभारत युद्धाच्या काळात बलराम तीर्थयात्रेला निघून गेले होते. त्यांनी युद्धात भाग घेतला नव्हता. भगवान बलरामांच्याही अशा अनेक लीलांचे सुरेख वर्णन श्रीमद् भागवतील दशमस्कंधात आलेले आहे. मोक्षपुरी द्वारकेमधील श्रीद्वारकाधीश मंदिराच्या आवारातच भगवान श्रीबलरामांचेही सुरेख मंदिर आहे. तेथील श्रीबलरामांची श्रीमूर्ती अतीव देखणी आहे. श्रीक्षेत्र जगन्नाथपुरी येथेही श्रीबलभद्रांचा सुरेख विग्रह आहे.

भगवान श्रीकृष्णचंद्र प्रभूंचेच स्वरूप आणि प्रधान लीलासहचर असणा-या भगवान श्रीबलरामदादांच्या श्रीचरणीं जयंतीनिमित्त साष्टांग दंडवत !

संपर्क - 8888904481

Web Title: Balaram Jayanti 2023: As Krishna's birth is celebrated in Shravan, Balaram Jayanti is celebrated today on Bhadrapada Shashti!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.