Balu Mama Jayanti: निस्सीम ईश्वरभक्त बाळू मामा यांची जयंती; त्यांना संचारी संत का म्हणत? जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 10:02 AM2024-10-14T10:02:43+5:302024-10-14T10:02:56+5:30
Balu Mama Janmotsav: अश्विन शुद्ध द्वादशीला धनगर समाजात बाळू मामांचा जन्म झाला, संसारात राहून ते संतपदाला कसे पोहोचले ते संक्षिप्त चरित्रातून पाहू!
बाळू मामांना मानणारे असंख्य भक्त महाराष्ट्रात आणि कर्नाटकात सापडतात. ते निस्सीम ईश्वर भक्त होते. त्यांना आत्मब्रह्म उमगले. साक्षात्कार झाला. त्यांनी चमत्कार केले, सेवा केली, प्रबोधन केले आणि लोकांना सन्मार्गाला लावले. आज अश्विन शुद्ध द्वादशीला त्यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. त्यानिमित्त संत साहित्य या संकेत स्थळावरुन त्यांचे चरित्र थोडक्यात जाणून घेऊ.
बाळू मामांचे बालपण :
संत बाळूमामा (balumama) मुंबई राज्यात व सध्या कर्नाटक राज्यात असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यात अक्कोळ हे गांव आहे. या गावातील श्री मायाप्पा आरभावे व त्यांची पत्नी सत्यव्वा या सात्विक धनगर जोडप्याच्या पोटी बाळूमामांचा जन्म झाला. हा दिवस सोमवार आश्विन शुद्ध द्वादशी शके १८१४ ( दि. ३-१०-१८९२ ) हा होता.
बालपणातले जगावेगळे वागणे सुधारावे म्हणून त्यांना अक्कोळ इथल्या जैन व्यापारी चंदूलाल शेठजी यांचेकडे चाकरीला ठेवले. शेठजी कुटूंबीयांकडून जेवणाचे ताट बदलण्याचे निमित्त होवून, बहीण गंगुबाई हि-याप्पा खिलारे हिच्याकडे मामा राहू लागले. त्यांचे भाचे बाळूमामांना मामा म्हणत असत. तेंव्हापासून ते भाच्यांचे मामा आणि जगाचे बाळूमामा झाले.
उन्हाळ्याच्या ऐन दुपारी खोल अवघड विहिरीचे पाणी पाजून दोन साधुना तृप्त केले. साधुनी बाळूमामांना वाचासिद्धी व कार्यसिद्धीचा आशीर्वाद दिला. बाळूमामांच्या इच्छेविरूद्ध पण आई-वडिलांची आज्ञा पाळण्यासाठी बहीण गंगुबाईची मुलगी सत्यव्वा बरोबर त्यांचा विवाह झाला. दोघेही कुळाचाराप्रमाणे मेंढ्या राखू लागले. फिरता संसार सुरू झाला.
बकरी चारत असताना अरे बाळू, तू गुरू करून घे…अशी आकाशवाणी झाली. तेंव्हा बाळूमामांनी ठरवले की, मी भुते काढल्याचे पैसे जो कोणी बरोबर सांगेल त्याला मी गूरू करून घेईन. काही दिवसांनी शिवारात फिरत असताना मुळे महाराज भेटले व म्हणाले, अरे बाळू, भुते काढलेले १२० रूपये मला दे…हे उद्गार ऐकून मामांनी गुरू म्हणून मुळे महाराजांचे पाय धरले.
लग्नानंतर सुमारे ९ वर्षांनी सत्यव्वा गरोदर राहिली. पण बाळूमामांची आज्ञा न पाळल्यामुळे तिचा गर्भपात झाला. तेंव्हापासून त्यांनी पत्नीचा त्याग करून जगाचा संसार आपला मानला. मामा बक-यांचा कळप घेवून महाराष्ट्र आणि कर्नाटकात गावोगावी जात असत. त्यामुळे संचारी संत म्हणून ते प्रसिध्दीस आले.
किर्ती किंवा प्रसिद्धीची त्याना अपेक्षा नव्हती. भक्तांच्या भल्यासाठी, कल्याण्यासाठी प्रसंगानुसार त्यानी काही चमत्कार घडवले. पंचमहाभूतावर त्यांची सत्ता होती. कानडी व मराठी ग्रामिण बोली भाषेत ते सर्वांना न्याय, निती, धर्माचरणाचा उपदेश करीत असत. प्रसंगी शिव्या देत. त्यांच्या शिव्या म्हणजे आशीर्वादाच्या ओव्याच असत.
लहानांपासून थोरापर्यंत, गरीबापासून श्रींमतापर्यंत व अडाण्यापासून विद्वानापर्यंत सर्व थरांतील स्त्री-पुरूष त्यांचे भक्त होते व आहेत.शर्ट, धोतर फेटा, कांबळा, कोल्हापूरी चप्पल हा त्यांचा पेहराव…भाजी भाकरीचा साधा आहार त्यांना आवडे. ऊन, वारा, पाऊस किंवा थंडी असो..बक-यांसवे शिवारातचं त्यांचा मुक्काम असे.गोरगरिबांना अन्नदान व्हावे, ते भक्ती मार्गाला लागावेत म्हणून त्यांनी १९३२ सालापासून भंडारा उत्सव चालू केला.
बाळूमामांनी केलेले चमत्कार:
समाजाला सन्मार्गाला लावायचे झाल्यास तर तामस, राजस आणि सात्विक अशा तिन्ही प्रकारच्या स्वभावांच्या माणसावर प्रभाव पाडावा लागतो.संतांना चमत्कार करण्याची इच्छा-हौस नसते. पण कार्य व्हावे म्हणून ज्ञानदेवांनासुद्धा सामर्थ्य दाखवावे लागले, ही वास्तवता होय.
संत बाळूमामांना अधूनमधून कितीतरी चमत्कार करावे लागले. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चमत्कार केल्यावाचून जगात कोणालाही प्रतिष्ठा किंवा महत्व प्राप्त होत नसते. पण बाळूमामानी हे चमत्कार प्रतिष्ठेसाठी किंवा प्रसिद्धीसाठी केलेले नसून प्रसंगवशात केलेले आढळतात. आपण शिंप्याचे उदाहरण घेवू. शिलाई यंत्र, शिवण्याचे तंत्र, इतर साधने शिंप्याकडे सारखीच असतात ना, पण एखादा शिंपी विशेष डौलदार कपडे शिवतो म्हणून लोकप्रिय होतो. त्याप्रकारे तो चमत्कार केलेल असतो.
ईश्वरकृपेचे सामर्थ्य किंवा योगसामार्थ्य वापरून आश्चर्यकारक काही घडवणे म्हणजे उगाच बुवाबाजी नसून त्यामागे योगशास्त्र असते हे कोणी विसरू नये.बाळूमामांच्या सानिध्यात माणसे सुधारत यात नवल नाही. मामांच्या सहवासात प्राणी, जनावरे अवगुण टाकून सद्गुणी होतात हे विशेष होय.भीमा नावाचा त्यांचा पांढरा शुभ्र केसाळ कुत्रा एकादशी दिवशी फक्त दूध पीत असते. दुसरे काहीही घातले तरी खात नसे. इतरवेळीसुद्धा त्याचे खाणे शुद्ध शाकाहरी असे.
मामांच्या सहवासात असणा-याने किंचीत खोटेपणा किंवा चोरटेपणा केला तरी त्याची भयंकर फजिती होवून त्याला पश्चाताप होत असे. आजही मंदिरात किंवा बक-यांच्या कळपात गैरवर्तन करणा-यांना पदोपदी प्रचिती येत असते. एखाद्या प्रसंगी मामा अस्सल नागरूपही धारण करत. मामांची गोडी चारणारा दादू गवळी अनावधानाने झोपला असता मामांनी त्याला नागरूपात जागे केले. ते स्वतः स्वकष्टाने जीवन जगत होते. याचना हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नव्हता. देवी अन्नपूर्णा मामांवर प्रसन्न होती. त्यांचा भंडारा आजही कठीण प्रसंगी याचा अनुभव येतो. अल्पसा पदार्थ असंख्यांना पुरवून उरणे हे प्रकार नेहमीचेच असत. स्वतः मामा आपल्यासाठी कोणतीच सिद्धी वापरत नसत. याबाबतीत ते माणिकप्रभू महाराज ( हुमनाबाद- गुलबर्गा ) यांच्या सारखेच होते.
आदर्श कर्मयोगी संन्याशी बाळूमामा
स्वच्छ पांढरे धोतर नेसलेले, पूर्ण हातोप्यांचा शर्ट, डोक्याला तांबडा रूमाल ( फेटा ), पायात कोल्हापूरी कातड्याच्या चप्पला, मेंढ्या राखण्यासाठी हातात काठी, सुमारे पाऊणेसहा फूट उंची, प्रमाणबध्द बांध्याची शरीरयष्टी, निमगोरा-सावळा वर्ण, रेखीव नासिका, प्रमाणबध्द चेहरा, भव्य कपाळ आणि भेदक दृष्टी असे मामांचे दर्शन असे. पादस्पर्श दर्शन कोणीही घेत नसत, दूरूनचं दर्शन घेत. नेहमीच्या सहवासातील लोकही जवळ जाण्याचे धाडस करत नसत. जोंधळ्याची भाकरी, उडदाचे डांगर, मूग-उ़डदाची आमटी, हरभ-याची-अंबा़ड्याची पालेभाजी, वर्णा-पावट्याची उसळ आणि शेवग्याच्या शेंगाची आमटी हे मामांच्या खास पसंतीचे पदार्थ. योग्याप्रमाणे ते अल्पाहारी होते.
संत बाळूमामा कानडी आणि मराठी भाषा उत्तम बोलत. भक्तांशी ते त्यांच्या बोली भाषेत संवाद करत. शिकलेल्या शहरी माणसांशी शहरी भाषेत बोलत. सामान्य धनगराप्रमाणे त्या व्यवसायास आवश्यक ती सर्व कामे ते करत असत. असामान्य विभूती असूनही मामा अगदी साध्या राहणीचे होते.दर एकादशीचा उपवास फक्त द्वादशीला स्नान करून उपवास सोडत. त्यांच्या कपड्यांना कधीही घामाची दुर्गंधी येत नसे. कपडे स्वच्छ धुतल्यासारखे असत. त्यांच्या चपलांना ऐन पावसाळ्यात सुधा चिखल लागत नसे. त्यांना भक्तीप्रेमाने चाललेले भजन फार आवडे. नाटकीपणाची त्यांना चिड असे. ढोंगीपणा, अनाचारी वृत्ती आणि अंधश्रध्दा यांना त्यांचा प्रखर विरोध असे. बाळूमामा क्षणात समोरील माणसाचे अंतःकरण जाणत. त्यांना सर्व योगसिद्धी अवगत होत्या. त्यांची वाचासिद्धी होती. ते त्रिकालज्ञानी होते. मामांजवळ आपला व परका हा भेद नव्हता. सर्वांना मामा आपलेच आई-बाप वाटत.इतरत्र श्रद्धावान माणसे आपला खरून निघून संतांच्या भेटीसाठी त्यांच्या गावी जात असतात. बाळूमामा धनगर स्वरूपात पुण्यवान गावांच्या रानात-शिवारात येत अशत. त्यामुळे त्यांचा लाभ फार सुलभपणे होते. मात्र ऐक गंमत होती. कांही वेळा काही दर्शनार्थींना ते अतिशय शिव्या देत असत. माणसांची श्रद्धा तपासणे, अभिमान अहंकार झाडावयास लावणे आणि त्यांची संकटे नष्ट करणे असा तिहेरी हेतू त्या शिव्यादेण्यामागे असे. पण पुण्य नसल्यास माणूस मामांपासून दूरचं राहत असे.
मामांचे अवतारकार्य समाप्त :
वयाच्या ७४ व्या वर्षी मामा सगुणरूप अदृश्य झाले. समाधीपूर्वी एक दोन वर्षे सूचक शब्दांनी मामा कल्पना देत होते. गूढ वेदान्तशास्त्रपर वचने बोलत होते. तथापि बहुतेक सर्वांना स्पष्ट बोध अखेरपर्यंत होवू शकला नाही. अनेक भक्तांना स्वप्नात तशाप्रकारच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. काही जणंना प्रत्यक्ष प्रकट होवून आपल्या समाधीसंबंधी आवश्यक ते सांगितले होते. अकेर देह ठेवताना मामांनी आपण प्रकाशरूप म्हणजे ब्रत्द्मरूप झाल्याचा प्रत्यक्ष प्रत्यय, मरगुबाईचे मंदिरात त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या भक्तांना दिला. परब्रत्द्माला म्हणजे अनादी देवाला उपनिषदे ( वेद ) प्रकाशरूप असेच समजतात. श्रावण वद्य चतुर्थी शके १८८८ म्हणजे ४ सप्टेंबर १९६६ रोजी मामा सगुणरूप सोडून निजधामाला गेले. तरी आजही ते भक्तांच्या मनात घर करून आहेत.