बाप्पाच्या आवडीचा आहार हा हिवाळ्यातला आदर्श आहार म्हणता येईल; कसा ते जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 03:36 PM2023-12-16T15:36:03+5:302023-12-16T15:36:32+5:30
मोदक, लाडू याबरोबरीने बाप्पाचा आवडता खाऊ सर्वांसाठी आदर्श आहार कसा ते पहा.
आपण काय खातो, कसे खातो, कधी खातो, यावर आपले आरोग्य अवलंबून असते. एखाद दिवसासाठी अन्न सोडले, तर त्याला लंघन म्हणता येईल, परंतु स्वास्थ्यबदलासाठी कायमचे उपाशी किंवा अर्धपोटी राहणे प्रकृती अस्वास्थास कारणीभूत ठरेल. म्हणून वैद्यकीय शास्त्रातसुद्धा संतुलित आहाराचा पर्याय सुचवला जातो. त्यातही इतर आहार पद्धतींच्या तुलनेत भारतीय आहार पद्धत अतिशय योग्य आहे, असे वैद्यकियदृष्ट्यादेखील सिद्ध आहे. म्हणून, सकस आहार कसा असावा? तर बाप्पासारखा.
बाप्पाची तुंदिल तनु प्रतिमा पाहून, अनेकांना तो स्थूल, बोजड वाटतो. मात्र, तो स्थूल दिसत असला, तरी अतिशय चपळ आहे. हे आजवर त्याने युद्धभूमीवर कायम सिद्ध केले आहे. शिवाय, तो कधीही आळसावलेला दिसत नाही. उलट आपण त्याला मंगलमूर्ती, वरदविनायक, तेजोनिधी अशा नावांनी संबोधतो. याचे कारण, बाप्पाची आहारशैली. बाप्पाला मोदक आवडतो, पंचखाद्य आवडते, लाडू आवडतात, ऊसाचे कर्वे आवडतात. या पदार्थांचा नीट अभ्यास केला तर लक्षात येईल, की हे सगळे पदार्थ सकस आहारांतर्गत येतात. ज्यात गूळ, खोबरे, साजूक तूप, फळे, सुका मेवा, अशा पौष्टिक पदार्थांचा समावेश होतो. हे सर्व घटक शरीराला गुणकारक आहेत. या पदार्थांनी पोट भरलेले राहते, त्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि खाऊन सुस्तपणादेखील येत नाही. तसेच या खाद्यपदार्थांनी मेदवृद्धी न होता, अंगात उत्साह निर्माण होतो.
म्हणून तर हिवाळ्यात दिवाळीचा, दत्तजयंती, संक्रांतीचा सण येतो. फराळातून शरीराला आवश्यक घटकांची पूर्तता होते, दत्तजयंतीला पंजिरीच्या प्रसादातून सुंठ, खडीसाखर पोटात जाते, तर संक्रांतीला तीळ, गूळाची स्निग्धता शरीराला लाभदायक ठरते. दरम्यान संकष्टीच्या निमित्ताने मोदकांचा प्रसादही भरीला असतोच. आपल्या पूर्वजांनी सण-उत्सव-संस्कृती-परंपरा यांची कशी उत्तम सांगड घातली आहे, हे यावरून जाणवते. त्याचीच उजळणी बाप्पा त्याच्या व्यक्तीमत्त्वातून आपल्याला करून देतो.
गणपती बाप्पाचे शरीर सौष्ठव इतर देवतांसारखे नसले, तरी बाप्पाने आरोग्याच्या बाबतीत कधीच हेळसांड केली नाही. उलट तो घेत असलेला आहार, अतिशय आदर्श आहे. आताच्या काळात सांगायचे झाले, तर बाप्पा हेल्दी डाएट घेणारा आहे. याचे वर्णन मराठीतील प्रसिद्ध कवी, शिवदीनी केसरी यांनी एका पदात केले आहे,
देवा प्रचंड गजतुंडा, अभयवरावरी उचलिसी शुंडा,
सिंदुर चर्चित विराजितोसी, एकदंत बरवा दिसतोसी,
पूज्य मानव तू नवहि खंडा, मोदक लाडू इक्षुदंड कि,
पंचखाद्य नैवेद्य मोदकी, सिद्धान्नाचे फार खोडकी,
स्वभक्त प्रेमाद्भुत अखंडा, सकळ कळा विद्या तुजपासि,
म्हणवुनि जन हे सर्वासि, सगुण निर्गुण स्वरूपासि,
दाविसी परि तू न नव्हेसि दुखंडा, केसरि गणनाथा शिवदिन,
कृपा कटाक्षे करि सुदिन, देही स्मरणा पदोपदिना,
ओमकार मुळ मुख्य अखंडा।।
शब्द अलंकारांनी हे पद अतिशय लयबद्ध झाले आह़े त्यात केलेले वर्णन अतिशय साधे पण सुंदर आह़े बाप्पाचे विराट रूप आहे. तो आपल्या भक्तांना अभय देतो. सिंदुर चर्चित आणि एकदंत असूनही तो अतिशय साजिरा दिसतो.
आपणही बाप्पाचा आदर्श बाळगून आरोग्यदायी जीवनासाठी डोळसपणे आहार घ्यायला हवा. मात्र, आताच्या काळात आपल्याला तुंदिल तनु मानवणारी नाही, त्यामुळे आहाराला व्यायामाची जोड दिली, तर उत्तम स्वाथ्याची आणि सात्विक गुणांची, विचारांची आपल्याला निश्चितच कमाई करता येईल.