सावधान! घराघरात कली प्रवेश करतोय; त्याला रोखण्याचे आहेत 'हे' उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 09:00 AM2021-07-19T09:00:00+5:302021-07-19T09:00:03+5:30
ज्या घरात शांत वातावरण नाही, तेथे कलीचा प्रवेश झाला असे समजावे.
एकूण चार युगे आहेत. त्यापैकी सत्य, त्रेता व द्वापार युगे होऊन गेलेली आहेत व शेवटचे कलियुग सुरू आहे. कली रंगाने काळा आहे. तो लिंग व जिव्हा यावर ताबा घेतो व स्वैर वागायला लावतो. कलीचे मुख्य गुण म्हणजे सर्व ठिकाणी गोंधळ माजवणे, जे व्यवस्थित चालले असेल त्याचा नाश करणे, कोणालाही सुखाने जगू न देणे, सर्व ठिकाणी भांडण-तंटे लावणे व अस्थिरता निर्माण करणे.
ज्या घरात शांत वातावरण नाही, तेथे कलीचा प्रवेश झाला असे समजावे. कलियुगात लोकांच्या मनोवृत्तीत फरक पडत आहे म्हणून त्यांच्या वागण्यातही फरक पडत आहे. भ्रष्टाचाराने पैसे खाणारे लखपती झाले आहेत. अशांच्या घरी गुंतागुंत वाढते. घरात नितिमत्तेमध्ये फरक पडला आहे त्यामुळे समाधान राहत नाही. अस्वस्थपणा, आजार वाढतो.
कलियुगाचा प्रभाव ओळखणे सोपे आहे. भावाभावात प्रेम राहत नाही. वाद कायम राहतो. एक भाऊ श्रद्धावान तर दुसरा नास्तिक असतो. आई मुलाचे पटत नाही. सासू सुनेचे पटत नाही. वडील मुलाचे पटत नाही. एवढेच काय तर नवरा बायकोचे पटत नाही. म्हणून विभक्त होतात. घरात इस्टेटीवरून वाद होऊन नातेसंबंध विकोपाला जातात.
पूर्वी घरामध्य धार्मिक वातावरण होते. लोक पूजाअर्चा, ध्यानधारणा करत असत. आजकाल सुशिक्षितपणाच्या नावावर धर्माला, शास्त्राला तिलांजली दिली जाते. विज्ञाननिष्ठ म्हणत जुन्या बाबींना अनावश्यक ठरवले जाते. काहींना पैशांचा अभिमान वाटतो, काहींना शिक्षणाचा, काहींना पद-प्रतिष्ठेचा. जो तो आपापल्या अहंकारात जगतो. याचे कारण मनुष्याला धार्मिक बैठक उरलेली नाही. बाहेरचा आहार तामसी गुणांना उत्तेजित करतो. घरचा सात्त्विक आहार बेचव वाटू लागतो. हा कलीचा महिमा आहे.
इतके दिवस कली बाहेरून प्रभाव पाडत होता. तो मनुष्यापोटी जन्माला येत आहे. तसे होऊ नये म्हणून पूर्वी गर्भवती स्त्रियांना जपले जात. गर्भसंस्कार घातले जात. आता कोणाला काहीच बंधन नको असते त्यामुळे कलीचा शिरकाव सहज शक्य झाला आहे. व्यभिचार करताना मनुष्य धजत नाही. त्याला पाप-पुण्याची नोंद ठेवावी वाटत नाही. अशाने मनुष्य केवळ स्वत:ची अधोगती ओढावून घेत आहे.
हे वास्तव आहे आणि ते आपण अनुभवत आहोत. दिवसेंदिवस होणारा संस्कृतीचा ऱ्हास , धर्माची विटंबना, थोरा मोठ्यांचा अनादर, व्यक्तिस्वातंत्र्यांच्या नावावर चाललेला नंगानाच ही कलीची रूपे आहेत. ती आपल्या उंबरठ्यापर्यंत, नव्हे घरातच आली आहेत.
त्यावर उपाय आहे तो केवळ सन्मार्गाचा, भक्तीमार्गाचा, अध्यात्माचा. संतांचे ग्रंथ, भगवंताचे नाव, सदाचरण, सद्भक्ती, ईश्वर कार्य, समाजसेवा या गोष्टीच कलियुगातून आपल्याला तारून नेणार आहेत. अन्यथा कली कलह वाढवत नेईल आणि आपला सर्वनाश करेल!