नववर्षाचे संकल्प करण्याआधी एकदा 'हा' संकल्प जरूर वाचा; तुमचे आयुष्य नक्की बदलेल!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 12:32 PM2021-12-17T12:32:39+5:302021-12-17T12:33:44+5:30
'दुनिया का सबसे बडा रोग, क्या कहेंगे लोग' या एका विचाराभोवती घुटमळणारे आयुष्य ३६० अंशात बदलून टाकायचे असेल तर हा लेख वाचाच!
>> मनीषा उगले
नेमक्या किती लोकांची सर्टिफिकेटस गोळा केली म्हणजे तुम्ही चांगले माणूस आहात हे सिद्ध होतं? किती काळ ती जमवत रहावी लागतात किमान?
आणि कितीही प्रयत्न केले तरी काही लोक तुम्हाला कधीच 'बरं' म्हणत नाहीत, त्यांचं काय करायचं असतं?
काही मित्रमैत्रिणींसोबत बोलताना मला हे खूपदा जाणवत राहतं की 'इतरांना काय वाटेल, लोक काय म्हणतील' या विचाराने ते सतत अस्वस्थ आहेत. या तणावामुळे त्यांना प्रसन्न जीवन जगता येत नाहीये.
आपलं काम प्रामाणिकपणे करणाऱ्या, कोणाचाही मोफतचा रुपया न घेणाऱ्या, लबाडी न करणाऱ्या, इतरांबद्दल नालस्ती करण्याची सवय नसणाऱ्या, आपल्या शाब्दिक वा शारीरिक कृतीने इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेणाऱ्या आणि शक्य तितकं खरं बोलणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कुणाच्या प्रमाणपत्राची आवश्यकता असते?
सतत इतरांना खुश करत रहाण्याच्या नादात फार वेळ आणि मानसिक शक्ती खर्च होते. 'माणसं' आहेत ती, यंत्र नव्हे, की सतत समान अल्गोरिदम फीड केल्यावर ती एकाच पद्धतीने रिऍक्ट होतील! शक्यच नाहीये ते. माणसांना मूडस् आहेत, भावभावना आहेत आणि त्यात परिस्थितीनुसार सतत बदल होतो. त्यामुळे बारोमास आपल्याला आवडेल असा व्यवहार आपल्याशी करायला लोक बांधील नाहीत. का वाईट वाटून घ्यायचं त्याबद्दल?
गंमत म्हणजे जवळजवळ प्रत्येक व्यक्ती स्वतःला सोडून 'समाज' ह्या गोष्टीची कल्पना करत असते. त्यातून 'मी असं केलं तर ह्यांना काय वाटेल, त्यांना काय वाटेल' हे भूत सारखं मानगुटीवर बसलेलं असतं. इतके महत्त्वाचे आहोत का आपण? की लोक त्यांचे व्यापताप सोडून सतत आपल्याबद्दल विचार करत बसतील? तेवढंच काम आहे का त्यांना?
खूप लोकांनी एखादी गोष्ट वारंवार भलत्या पद्धतीने सांगितली म्हणून सत्य बदलत नसतं. त्यामुळे लोक आपल्याबद्दल गैरसमज करून घेतील का? मला चुकीचं समजतील का? याबद्दल सातत्याने विचार करणं निरर्थक आहे. चिक्कूला शंभर जणांनी सफरचंद म्हटलं म्हणून त्याचं सफरचंद होतं का? 'फॅक्ट' बदलत नसेल तर फरक काय पडतो, एकाने म्हटलं काय किंवा अनेकांनी म्हटलं काय? कशाला हवी असते इतरांची सही आपल्याला आपल्या माणूसपणावर?
Top five regrets of the dying ह्या गाजलेल्या पुस्तकात Bonnie Ware यांनी लोकांना मृत्यूच्या वेळी होणाऱ्या महत्त्वाच्या पश्चातापांबद्दल लिहिलंय. हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करत असताना त्यांना अनेक लोकांचे शेवटचे शब्द ऐकता आले. बहुसंख्य लोकांनी शेवटच्या क्षणी व्यक्त केलेली प्रमुख खंत अशी होती की, "मी माझं संपूर्ण आयुष्य लोकांना काय वाटेल या दडपणाखाली घालावलं. जर मी माझं पॅशन फॉलो केलं असतं, माझं आवडतं काम केलं असतं, मला आनंद देणाऱ्या गोष्टी केल्या असत्या आणि माझं आयुष्य माझ्या मनाप्रमाणे व्यतीत केलं असतं तर किती बरं झालं असतं!"
आपल्यासाठी ही गोष्ट फार चांगली आहे की आजवर अनेक माणसांनी त्यांचे अनुभव लिहून व बोलून शेअर केले आहेत. त्यांच्या अनुभवापासून आपण धडे घेऊ शकतो, आपल्याकडून होणाऱ्या संभाव्य चुका टाळू शकतो. पण असं आहे की, घोड्याला पाण्यापर्यंत नेता येतं फारतर, बळेच पाणी नाही पाजता येत! इतरांच्या अनुभवातून काहीच शिकायचं नाही असं आपण ठरवलेलंच असेल तर त्याला काय इलाज आहे?
पण अर्थातच आपण विचारी माणसं आहोत आणि आपण त्याच त्या चुका वारंवार करणार नाही. थोडावेळ बसून आपण स्वतःबद्दल नीट विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपल्या मनातील बहुतांश चिंता या निरर्थक आहेत. जे घडून गेलंय त्यावर आता आपलं नियंत्रण नाही आणि ज्या गोष्टी घडणार आहेत, त्याबद्दल चिंता करत बसल्याने देखील काही होणार नाही. निश्चिन्त मनाने, पण पूर्ण ताकदीनिशी आपण येणाऱ्या दिवसांना सामोरे गेलो तर मात्र काही उत्तम घडण्याची आशा बाळगता येईल. कालच्या दिवसाची खंत वा गिल्ट आज कशाला वाहायचा? आणि उद्याचं तरी ओझं आजच का घेऊन बसायचं डोक्यावर?
एक माणूस म्हणे पहिल्यांदाच आगगाडीत बसला. त्याच्याकडे सामानाची जडशीळ पेटी होती. पण आगगाडीत बसल्यावर त्याने असा विचार केला की या पेटीमुळे गाडीला ओझं होत असावं. आगगाडीला पेटीचं ओझं होऊ नये म्हणून मग त्या माणसाने काय केलं? पुढचा सगळा प्रवास ती जड पेटी स्वतःच्या डोक्यावर घेऊन केला! (गोष्ट - ओशो)
गाडीला ओझं होऊ नये म्हणून स्वतःच्या डोक्यावर ओझं घेतलेल्या माणसापेक्षा काय वेगळे आहोत आपण? समज आल्यापासून अखंड ओझी वाहतो आहोत आपण. आपल्याकडून इतरांच्या काय अपेक्षा आहेत, इतरांना आपल्याबद्दल काय वाटतं, आपण कोणतं करिअर करावं, कोणते कपडे घालावेत, कोणती माणसं जोडावीत, कसं हसावं, बसावं, बोलावं, काय स्टेटस ठेवावं, कोणता डीपी ठेवावा?... संपणार नाहीये ही यादी!
आपल्याला काय वाटतं आपल्याबद्दल? आपला कम्फर्ट कशात आहे? आपल्या निवडी काय आहेत? आपल्यासाठी हा विचार करायला कोणीही बसलेलं नाहीये. का बसावं आणि? जग स्वतःपासून सुरू होतं! तणावपूर्ण, दुर्मुखलेल्या माणसाला कधीच आजूबाजूच्या चांगल्या गोष्टी सापडू शकणार नाहीत. आप अच्छा तो जग अच्छा! हे माझं जीवन आहे, ते सुंदर, परिपूर्ण आणि रसरशीतपणे जगण्याचा मला अधिकार आहे. मी मला मिळालेल्या काळाच्या तुकड्याचा उत्तम पद्धतीने, जबाबदारीने वापर करीन आणि मस्त आयुष्य जगेल. हे का नाही ठरवत आपण? आपल्या मदतीसाठी कोणाची वाट बघत उभे आहोत आपण? स्वतःलाच हातपाय हलवायला लागतील आता!
'वाल्डन' या सुरेख पुस्तकात थोरो म्हणतो, 'आपण स्वतःबद्दल जितक्या वाईट तऱ्हेने विचार करतो, तितका वाईट विचार समाज आपल्याबद्दल विचार नाही करत.' केवढी महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे थोरो! आपल्या मनात आपण निर्माण केलेली प्रतिसृष्टी वास्तवापेक्षा जास्त वाईट आहे. आपण स्वतःबद्दल फारच क्रूर आहोत. तसं नसतं तर नीटनेटकं, प्रामाणिक आयुष्य जगत असतानाही लोक काय म्हणतील याचा विचार करत कुढत, कुंथत का जगलो असतो आपण?
काही माणसं आपल्यावर सदैव करत असतात, त्यांचं प्रेम विनाअट असल्याने त्यात कधीही फरक पडत नाही. काही माणसांना आपल्याबद्दल कधीच घेणंदेणं नसतं, आपलं काहीही चाललेलं असलं तरी ते आपल्याबद्दल काहीच मत बनवत नाहीत. आणि अशीही काही माणसं असतात की आपण कितीही छान वागलो, त्यांच्या आनंदासाठी जिवाचं रान केलं तरी आपल्याला बरं म्हणायचं नाहीच असा त्यांनी चंग बांधलेला असतो. मग ही स्वतःच्या जीवाची फरफट कशासाठी? हे असं म्हणाले नि ते तसं म्हणाले, सोड आता हे सांगणं! तुझं तुझ्याबद्दल काय म्हणणंय? सकाळी उठल्यावर आरशात जे माणूस दिसतं ना, त्याच्या नजरेतून तू कधी उतरणार नाहीस, तुझ्याबद्दलच्या अभिमानाची चमक तिच्यात कायम राहील इतकी काळजी घे फक्त!