आषाढ संपण्याआधी 'आषाढ तळण' उरकून घ्या व करा मरीमातेची पूजा! 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 04:04 PM2022-07-20T16:04:36+5:302022-07-20T16:05:18+5:30

आषाढ महिन्यात मरीमातेची पूजा आणि आषाढ तळणाला विशेष महत्त्व असते. काय असतो हा उत्सव, चला जाणून घेऊया. 

Before the Ashadha ends, finish the 'Ashadha Talan' and worship Marimata! | आषाढ संपण्याआधी 'आषाढ तळण' उरकून घ्या व करा मरीमातेची पूजा! 

आषाढ संपण्याआधी 'आषाढ तळण' उरकून घ्या व करा मरीमातेची पूजा! 

googlenewsNext

हिंदू संस्कृतीत प्रत्येक दिवस 'साजरा' करण्यासाठी काही ना काही निमित्त शोधले जाते, नव्हे तर ते मिळते! जसे की आषाढ तळण! यालाच आखाड तळणे असेही म्‍हणतात. २८ जुलै रोजी आषाढ अमावस्या आहे. त्या दिवशी आषाढ संपून दुसऱ्या दिवसापासून व्रत वैकल्यांनी नटलेला श्रावण भेटीस येणार. तेव्हा डाएट आपोआप होणारच आहे, तत्पूर्वी साजरा करून घ्या आषाढ तळण! 

आपल्या पूर्वजांनी अतिशय विचारपूर्वक सणांची, संस्कृतीची आणि खाद्यपदार्थांची सांगड घातली आहे. आषाढ तळण त्यापैकीच एक आहे. आषाढ महिन्यात मुबलक पाऊस पडतो. अशा वातावरणात केवळ कांदा भजीच नाही तर अनेक तळणीच्या पदार्थांचा समाचार घेतला जातो. मे महिन्यात केलेले वाळवणाचे पापड, कुरडया, सांडगे, शेवया यांना आषाढापासून न्याय द्यायला सुरुवात होते. श्रावणात व्रत वैकल्यांमुळे खाण्यावर निर्बंध येतात. त्यामुळे आषाढ तळण अगदी दणक्यात पार पाडले जाते. हे घरगुती पदार्थ जिभेचे चोचले तर पुरवतातच, शिवाय पावसाळ्यात शरीराला आवश्यक घटकही पुरवतात. 

पूर्वी तळणीच्या पदार्थांच्या यादीत गोड तसेच तिखट मिठाच्या पुऱ्या, खारे शंकरपाळे, चकल्या, शेव, भजी, कडबोळी, अळू वडी, कोथिंबीर वडी, पुडाची वडी असे नानाविध पदार्थ केले जात असत. त्याला खीर, लाडू, शिरा इ. गोड धोड पदार्थांची जोड असे. तळणीचे पदार्थ खाऊन अपचन होऊ नये म्हणून मुगाची खिचडी व आले पाकची वडी याचाही समावेश केला जातो. आता त्यात नवनव्या खाद्यपदार्थांची भर पडते आणि आखाड तळला जातो. 

एवढे सगळे पदार्थ करायचे आणि देवाला नैवेद्य दाखवायचा नाही, हे शक्य आहे का? ज्या अन्नपूर्णेच्या कृपेमुळे चमचमीत पदार्थांचा आस्वाद घेता येतो, त्या अन्नपूर्णेला मरिदेवीच्या रूपात या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. तिची पूजा केली जाते. आरती होते आणि देवीची गाणी गात आषाढ तळणाचा आनंद लुटला जातो. 

आपल्याला देवकृपेमुळे जसे मिळाले तसे वंचितांनाही मिळावे, म्हणून या खाद्यपदार्थांचे गरजूंना दान करून पुण्यही कमावले जाते. आपल्या आनंदात दुसऱ्यांना सहभागी करून घ्या, हीच तर आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. त्यानुसार आषाढातले उरलेले दिवस वाया न घालवता आषाढ तळणाचा तुम्ही आनंद घ्या आणि इतरांनाही द्या. आणि हो मरिमाताची पूजा विसरू नका. 

Web Title: Before the Ashadha ends, finish the 'Ashadha Talan' and worship Marimata!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न