Bhadrapad Pournima 2022: गतवैभवाच्या प्राप्तीसाठी भाद्रपद पौर्णिमेला केले जाते उमा महेशाचे व्रत; सविस्तर माहिती वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 03:42 PM2022-09-07T15:42:59+5:302022-09-07T15:43:15+5:30

Bhadrapad Pournima 2022: दुर्वास ऋषींनी दिलेल्या शापातून मुक्त होण्यासाठी भगवान विष्णूंनीदेखील केले होते हे व्रत व मिळवले ऐश्वर्य, शांती, समाधान आणि पत्नीची बहुमूल्य साथ!

Bhadrapad Pournima 2022: Uma Mahesha's Vrat is performed on Bhadrapad Pournima to attain past glory; Read the detailed information! | Bhadrapad Pournima 2022: गतवैभवाच्या प्राप्तीसाठी भाद्रपद पौर्णिमेला केले जाते उमा महेशाचे व्रत; सविस्तर माहिती वाचा!

Bhadrapad Pournima 2022: गतवैभवाच्या प्राप्तीसाठी भाद्रपद पौर्णिमेला केले जाते उमा महेशाचे व्रत; सविस्तर माहिती वाचा!

googlenewsNext

यंदा शनिवारी १० सप्टेंबर रोजी भाद्रपद पौर्णिमा आहे. तिची सुरुवात आदल्या दिवशी अर्थात ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजून ८ मिनिटांनी सुरू होत आहे. तसेच १० तारखेला दुपारी ३.२९ मिनिटांनी पौर्णिमा संपली की त्याच दिवसापासून महालय प्रारंभ अर्थात पितृपक्ष सुरू होणार आहे. या पौर्णिमेच्या दिवशी उमा महेश्वराचे व्रत केले जाते. व्रतविधी जाणून घेण्याआधी पाहूया या व्रतासंबंधित कथा!

एकदा दुर्वास मुनी फिरत फिरत वैकुंठी पोहोचले. त्यावेळी त्यांच्याकडे भगवान शिवशंकरांनी दिलेली बेलाच्या पानांची एक माळ होती. ती माळ दुर्वासांनी भगवान विष्णुंना दिली. परंतु विष्णूंनी ती माळ स्वत:च्या गळ्यात धारण न करता सहजपणे गरुडाच्या मानेवर ठेवली. ते पाहून दुर्वास रागावले. त्या रागाच्या भरात त्यांनी विष्णूंना `तू ज्या लक्ष्मीमुळे इतका गर्विष्ठ झाला आहेस, ती लक्ष्मी क्षीरसागरात बुडेल. गरुडाचाही नश होईल. तुझे वैकुंठावरील स्वामीत्व जाऊ तू देखील पृथ्वीवर भटकत फिरशील.' असा शाप दिला. त्याप्रमाणे भगवान विष्णू रानावनातून भटकू लागले. 

पुढे एकदा गौतम ऋषींची भेट झाली असता त्यांनी विष्णूला उमा महेश्वर व्रत करायला सांगितले. त्यानुसार विष्णूंनी हे व्रत केले आणि त्यांना गतवैभव प्राप्त झाले. या व्रताला शिवानंद व्रत असेही म्हणतात.

या कथेचा सारांश पाहिला तर लक्षात येते, गर्वाचे घर खाली ही म्हण देवांनाही चुकली नाही. ज्यांनी गर्व केला तो जमिनीवर आला. म्हणून थोरामोठ्यांचा मान राखून आपली कला, श्रीमंती यांचे आपण केवळ विश्वस्त आहोत हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. आणि या व्रताचे वैशिष्ट्य म्हणजे जे कैलास पती आहेत, वैराग्याचे पुतळे आहेत, ते स्वतः अलिप्त राहून दुसऱ्यांना जे हवे ते प्राप्त करून देण्यास तत्पर राहतात. अशा वेळी आपण वैभव प्राप्तीचा लोभ धरायचा की उमा महेषाप्रमाणे स्थिर आणि समाधानी वृत्ती मागायची, हे ज्याचे त्यानेच ठरवले पाहिजे! 

आजच्या काळात हे व्रत विशेष कोणी करताना आढळत नाही. परंतु इच्छुकांसाठी व्रतविधी पुढीलप्रमाणे -

हे व्रत पुरुषांनी करायचे असते. कर्नाटकात हे व्रत अधिक प्रचलित आहे. सलग पंधरा वर्षे हे व्रत केले जाते. भाद्रपद चतुर्दशीला व्रताचा संकल्प करून भगवान शिवशंकर आणि पार्वतीची पूजा करावी. उपवास करावा. शिवमूर्तीजवळ निजावे. पौर्णिमेला स्नान करून भस्म लावून, रुद्राक्ष धारण करून शिव पार्वतीच्या मूर्तीची पूजा करावी. पूजेपूर्वी पंधरा गाठी मारलेला दोरा कुंकवात बांधून देवाच्या पायाशी ठेवावा आणि पूजा झाल्यावर तो हाताला बांधावा. पंधरा मांडे किंवा पंधरा घारगे असा नैवेद्य दाखवावा. सुवासिनीला जेवू घालावे. सोळाव्या वर्षी व्रताचे उद्यापन करावे.

अलिकडच्या काळात हे व्रत अंगिकारणे शक्य वाटत नसेल, तर या दिवशी किमान उमा महेशाचे स्मरण करून देवघरातल्या मूर्तींवर अभिषेक, पूजा किंवा स्तोत्रपठण आपण नक्कीच करू शकतो. जेणेकरून त्यांची कृपादृष्टी सदैव आपणास लाभेल. 

Web Title: Bhadrapad Pournima 2022: Uma Mahesha's Vrat is performed on Bhadrapad Pournima to attain past glory; Read the detailed information!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.