श्रीमद् भगवद्गीता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 04:58 AM2020-07-16T04:58:22+5:302020-07-16T04:58:58+5:30
रोजच्या व्यवहारात आपणही चांगल्या हेतूने एखादी गोष्ट करायला जातो तेव्हा काही कारणांमुळे असा प्रश्न पडू शकतो की, मी योग्य करतो आहे का अयोग्य करतो आहे.
- सौरभ कुलकर्णी
श्रीमद् भगवद्गीता या ग्रंथाला वेदांचे सार असे म्हटले जाते. संपूर्ण वेद हे आपल्याला जीवन कसे जगावे हे शिकवितात. म्हणूनच त्यांना शास्त्र असेही म्हटले जाते. त्याप्रमाणे भगवद्गीतेलाही शास्त्र म्हटले जाते. कारण यामध्ये भगवान वेदव्यासांनी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादाद्वारा, तसेच अर्जुनाला उदाहरण म्हणून घेऊन जीवनाची सोपी पद्धती अठरा अध्यायांद्वारे समजावून सांगितली. म्हणून भगवद्गीता या ग्रंथाला शास्त्र असे म्हटले जाऊ शकते. या ग्रंथाची निर्मिती कर्ममार्ग, उपासनामार्ग, तसेच ज्ञानमार्ग असे तीन मार्ग सांगण्यासाठी केलेली आहे. याच्या पहिल्या अध्यायाचा जर आपण विचार केला तर यात उदाहरण असणारा अर्जुन हा स्वत:चा स्वभवत: असणारा जो क्षत्रियधर्म ‘दुष्टपणाचे निवारण करून सज्जनांचे रक्षण करणे’ आहे ते करण्यासाठी प्रवृत्त आलेला असला तरीही समोर युद्धासाठी जेव्हा आप्तस्वकीय लोकच आहेत हे पाहताच त्याचा निश्चय ढळायला सुरुवात झाली असे पहिल्या अध्यायात सांगितले आहे.
रोजच्या व्यवहारात आपणही चांगल्या हेतूने एखादी गोष्ट करायला जातो तेव्हा काही कारणांमुळे असा प्रश्न पडू शकतो की, मी योग्य करतो आहे का अयोग्य करतो आहे. तेव्हा आपला उद्देश योग असेल आणि तो पूर्ण करण्यासाठी निवडलेल्या मार्गामध्ये कोणाबद्दलही शारीरिक, मानसिक, वाचिक हिंसा घडू नये आणि जर अपरिहार्य कारणांमुळे होत असेलच तर तेवढ्या गोष्टींसाठी त्या व्यक्तीची आणि ईश्वराची माफी मागून योग्य म्हणजेच सर्वांसाठी हितकारक अशा गोष्टी आयुष्यभर करीत राहणे हे अर्जुनाच्या दृष्टांताने आपल्याला या ग्रंथातून शिकायचे आहे. म्हणून हा एक उत्तम शास्त्रग्रंथ आहे. या ग्रंथाचे वाचन करून त्यात सांगितलेल्या कर्ममार्गाचे आचरण फळाची इच्छा सोडून आपण करीत राहिलो, तर निश्चितपणे आपल्याला संसारात राहूनही अर्जुन आदींप्रमाणे आपले कल्याण साधायला उशीर होणार नाही.