Bhagvadgeeta: पुनर्जन्माचा सिद्धांत काय आहे? भगवद्गीतेत श्रीकृष्णाने याबाबत काय सांगितले ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 07:00 AM2024-02-07T07:00:00+5:302024-02-07T07:00:02+5:30

Bhagvadgeeta: पुनर्जन्माबद्दल अनेकांच्या मनात अनेक प्रश्न असतात, पण खरंच पुनर्जन्म होतो का, ते खुद्द भगवान श्रीकृष्णाच्या शब्दात जाणून घेऊया. 

Bhagvadgeeta: What is the theory of reincarnation? Know what Shri Krishna said about this in Bhagavad Gita! | Bhagvadgeeta: पुनर्जन्माचा सिद्धांत काय आहे? भगवद्गीतेत श्रीकृष्णाने याबाबत काय सांगितले ते जाणून घ्या!

Bhagvadgeeta: पुनर्जन्माचा सिद्धांत काय आहे? भगवद्गीतेत श्रीकृष्णाने याबाबत काय सांगितले ते जाणून घ्या!

हिंदू धर्मात पुनर्जन्म या संकल्पनेवर विश्वास ठेवला जातो. एका जन्मातील अपुऱ्या राहिलेल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आत्मा पुन्हा देह धारण करतो, याला पुनर्जन्म असे म्हणतात. पुनर्जन्म म्हटल्यावर पुढचा जन्म पुन्हा मनुष्य योनीतच मिळेल याची शाश्वती नाही. ८४ लक्ष योनी फिरून झाल्यावर आत्म्याला नरदेहाची प्राप्ती होते, असे म्हणतात. त्यामुळे पुढचा जन्म कोणता, हे कोणीच सांगू शकत नाही. परंतु, एकाच जन्मात एवढ्या हालअपेष्टा सहन केल्यानंतर पुन्हा जन्म नकोच, असे आपण देवाकडे मागणे मागतो. यातून मोक्ष ही संकल्पना निर्माण झाली. आत्म्याची `पुनरपी जननम् पुनरपी मरणम्' या फेऱ्यातून सुटका व्हावी, यासाठी मनुष्य देहात आपण पाप-पुण्याचा समतोल साधण्याचा प्रयत्न करतो. 

मनुष्याचा आत्मा त्याच्या कर्मानुसार निरनिराळ्या योनीत जन्म घेतो, अशी हिंदू लोकांची श्रद्धा आहे. या जन्मात केलेल्या पाप पुण्याचे फल पुढील जन्मात मिळते, असा कर्मसिद्धांत आहे. मनुष्य पूर्वसंचिताप्रमाणे म्हणजे पूर्वजन्मातील कर्माला अनुसरून या जन्मात सुख-दु:ख भोगतो. कर्माचे फळ भोगावेच लागते. कर्मयोग, ज्ञानयोग किंवा भक्तियोग यामुळे मनुष्य मुक्त होऊ शकतो. याबाबत गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात,

आब्रह्मभुवनाल्लोका: पुनरावर्तिनोऽर्जुन।
मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते।।

हे अर्जुना, मायेत अडकलेला मनुष्य पुन्हा पुन्हा जन्म घेत राहतो. यातना भोगत राहतो. परंतु हे कुंतीपुत्रा, मला प्राप्त झाल्यावर त्याचा पुनर्जन्म होत नाही. कारण, जीवा-शीवाचे ऐक्य झाले, की आत्मा मुक्त होतो. 

भगवान श्रीकृष्णाच्या मते पुनर्जन्म म्हणजे दु:खाचा सागर आहे. पुनर्जन्म प्राप्त झाल्याने मनुष्य त्रिविध तापामध्ये पडून त्याच्याकडून नानाविध पापकर्मे घडण्याचा संभव असतो. म्हणून त्याला दु:खाचा सागर म्हटले आहे. म्हणजे पुनर्जन्मात प्राप्त झालेले जीवित व त्यात अनुभवास येणारे विषय, जे विचार करताना मोहक वाटतात, परंतु देहाच्या यातना आत्म्याला भोगाव्या लागतात. 

देहांतासमयी व्याकुळतेचा प्रसंग येऊ नये म्हणून भगवंत भक्ताला आत्मज्ञानाच्या पिंजऱ्यात ठेवतो, असे संत ज्ञानेश्वर म्हणतात. खऱ्या उपासकाने प्रपंच म्हणजे विकाररूपी वृक्षांची बाग आहे, हे नित्य स्मरावे. म्हणून पुनर्जन्माची आस ठेवू नये आणि मिळालेल्या जन्माचे सार्थक करावे. 

ज्ञानी, योगी, भक्त सर्वांनाच मुक्ती आहे. पण मार्ग भिन्न आहेत. ज्ञानाचा अहंकार पूर्णत: लोप पावल्यामुळे त्याला ब्रह्मस्वरूपता लाभते. योग्याला योगमार्गाने देहत्याग करून परमपद लाभते, तर भक्ताला अनन्य भक्तीने, श्रद्धेने वासनाक्षयाद्वारे क्रममुक्ती मिळते. या तीन्ही अवस्था गाठणे सर्वसामान्यांना कठीण आहे. मग, आपण पुनर्जन्मात अडकून राहायचे का? तर नाही! यासाठी भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्यानुसार भक्तीयोग आणि कर्मयोग यांचे अनुसरण करायचे आणि आपली कर्तव्यपूर्ती झाली, की मोक्ष मिळावा, ही भगवंताकडे प्रार्थना करायची. 

Web Title: Bhagvadgeeta: What is the theory of reincarnation? Know what Shri Krishna said about this in Bhagavad Gita!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.