Bhai Dooj 2021 : यमराज आणि यमीने केली भाऊबीजेची सुरुवात; जाणून घ्या यमराजाने काय घातली ओवाळणी?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 05:07 PM2021-11-04T17:07:04+5:302021-11-04T17:07:24+5:30

Diwali 2021 : यमराजाचे बोलणे ऐकून यमी आनंदून गेली व त्यांच्या या भेटीचा दिवस बहीण भावाच्या नात्याला समर्पित ठरवून भाऊबीज म्हणून साजरा होऊ लागला. त्यांच्यात नक्की काय बोलणे झाले? वाचा...

Bhai Dooj 2021: Beginning of Bhai Dooj by Yamaraj and Yami; Know what Yamaraja gifted her? | Bhai Dooj 2021 : यमराज आणि यमीने केली भाऊबीजेची सुरुवात; जाणून घ्या यमराजाने काय घातली ओवाळणी?

Bhai Dooj 2021 : यमराज आणि यमीने केली भाऊबीजेची सुरुवात; जाणून घ्या यमराजाने काय घातली ओवाळणी?

googlenewsNext

यमद्वितीया अर्थात भाऊबीज. या दिवशी यमराज दिवाळीनिमित्त आपल्या बहिणीकडे म्हणजे यमीकडे जेवावयास गेले होते. यमीने  त्याचे योग्यप्रकारे आदरातिथ्य केले आणि यमराजाकडे ओवाळणीदेखील मागितली. काय होती ओवाळणी? चला पाहू.

वास्तविक यमराज दाराशी येणार, ही कल्पनासुद्धा आपल्याला सहन होणार नाही. परंतु यमराजाच्या येण्याने त्याची बहीण आनंदून गेली आहे. कारण, दिवस रात्र या मृत्यूलोकीचा कारभार सांभाळणारा आपला भाऊ, कधी नव्हे ते जेवायला आपल्याकडे आला आहे. माहेरची माणसे आली की मुली मोहरून जातात. यमीसुद्धा त्याला अपवाद नव्हती. म्हणून यमराजाला आवडेल असा पाहुणचार तिने केला. त्याच्या कामाचे कौतुक केले. त्याच्या कर्तव्यदक्षपणामुळे सृष्टीचे चक्र, यम-नियम सुरळीत सुरू आहेत, असे ती म्हणाली. तिच्या कौतुकाच्या प्रेमभरल्या शब्दांनी यमराज भावूक झाले आणि तिला ओवाळणी काय देऊ असे विचारते झाले.

यावर यमी म्हणाली, 'दादा, मी जे मागेन ते खरोखरच मला देशील का?'
यमराज म्हणाले, 'माझ्या आवाक्यात असेल तर नक्कीच देईन!'
सारासार विचार करून यमी म्हणाली, 'दादा, तुझ्या येण्याने जसा मला आनंद झाला, तशी प्रत्येक बहीण आपल्या भावाची वाट बघत असते. त्यामुळे निदान आजच्या दिवशी तरी भावा बहिणीची ताटातूट होणार नाही, याची काळजी घेशील का? हीच माझी ओवाळणी समजेन मी...!'

यमराज म्हणाले, 'आम्हालातरी हे काम करताना कुठे आनंद होतो. परंतु जन्म-मृत्यू यामुळे जग सुरळीत सुरू आहे. अन्यथा लोक एकमेकांच्या जीवावर उठतील. मृत्यूच्या भयामुळे मनुष्य नियमांचे पालन करतो. अन्यथा तो बेबंधपणे वागेल. म्हणून त्याला दिलेल्या कालावधीत त्याने चांगले आयुष्य जगले पाहिजे. मृत्यूचा क्षण त्यांना माहित नसला, तरी आमच्याकडे सगळीच नोंद असते आणि आमचे काम आम्हाला वेळेत करावेच लागते. यासाठीच तर कृतज्ञता म्हणून लोक धनत्रयोदशीला आमच्या मार्गात म्हणजे दक्षिण दिशेला सायंकाळी यमदीपदान करतात. परंतु तुझी मागणी रास्त आहे. यासाठी मी माझ्या परिने आजच्या दिवशी त्यांचा वियोग होणार नाही, यादृष्टीने नक्की प्रयत्न करीन. मात्र, जे आपणहून नियमांचे उल्लंघन करतील, त्यांना माझ्या दरबारात हजेरी लावावी लागेल. त्याला माझा नाईलाज आहे.'

यमराजाचे बोलणे ऐकून यमी आनंदून गेली व त्यांच्या या भेटीचा दिवस बहीण भावाच्या नात्याला समर्पित ठरवून भाऊबीज म्हणून साजरा होऊ लागला. तेव्हापासून आजच्या दिवशी भावाने बहीणीच्या घरी जेवायला जाण्याची प्रथा आहे व बहीण भावाच्या नात्याआड न येण्याचे वचन यमराज पाळत आहेत. आहे की नाही सुंदर ओवाळणी?

Web Title: Bhai Dooj 2021: Beginning of Bhai Dooj by Yamaraj and Yami; Know what Yamaraja gifted her?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.