Bhai Dooj 2023: बहीण डावखुरी असली तरी बिघडत नाही, तिच्याकडून औक्षण करून घ्या; कारण शास्त्र सांगते...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 07:00 AM2023-11-15T07:00:00+5:302023-11-15T07:00:06+5:30
Bhai Dooj 2023: डावखुऱ्या लोकांचा धर्मकार्यात सवयीप्रमाणे डावा हात पुढे आला की त्यांना बोलणी खावी लागतात, पण शास्त्रानुसार तो दोष नाही, तर...
डावखुरेपणा हा काही आजार नाही, तर तो नैसर्गिक सवयीचा भाग आहे. परंतु, विशेषतः धर्म कार्यात एखाद्या डावखुऱ्या व्यक्तीने कामात पुढाकार घेतला, की त्याला अकारण हटकले जाते. ही बाब शास्त्राला धरून आहे की लोकांनी निषिद्ध ठरवली आहे, ते जाणून घेऊया. विशेषतः मुलींना या गोष्टीवरून नेहमी हटकले जाते. सासरी उद्धार व्हायला नको म्हणून उजव्या हाताने काम करून घेण्याचा सराव करून घेतला जातो. भाऊबीज आणि रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला गंध लावताना हा प्रश्न आवर्जून उपस्थित होतो.
डावखुरेपणाबद्दल शास्त्रात कुठेही आक्षेप घेतलेला नाही. कारण ती अतिशय नैसर्गिक बाब आहे. परंतु, धर्म कार्यात फुलं वाहताना, पूजा करताना, आचमन घेताना किंवा प्रसाद घेताना उजव्या हाताचा उल्लेख आवर्जून केल्याचे आढळून येते. त्याचे स्पष्टीकरण कुठेही दिलेले नसले, तरी त्यामागील साधा तर्क असा काढता येतो, की जगातील लोकसंख्येच्या १० टक्के लोक डावखुरे असतात. शास्त्राची रचना सर्वसाधारणपणे सर्वांना लागू होईल अशा पद्धतीने केलेली असते. त्यानुसार ९० टक्के लोकांचा विचार करता शास्त्रात उजव्या हाताला प्राधान्य दिले असावे, हा प्राथमिक विचार लक्षात येतो. पण म्हणून, डावखुऱ्या लोकांना गटातून बाहेर काढण्याचे काहीच कारण नाही.
योगशास्त्राने याबाबत अधिक खुलासा केला आहे, की आपले हृदय शरीराच्या डाव्या बाजूला स्थित असते. त्यावर फार भार पडू नये, म्हणून डाव्या हातावर कामाचा भार कमी टाकला जातो. जड, अवघड कामे उजव्या हाताने उरकली जातात. हिंदीत एक प्रचलित म्हण आहे, 'ये तो मेरे बाए हाथ का खेल है' म्हणजेच हे सहज होणारे काम आहे. यावरूनही लक्षात येते, की डाव्या हातावर आपण सहजगत्या होणाऱ्या कामाची जबाबदारी टाकतो.
परंतु जे डावखुरे लोक असतात, त्यांचा निसर्गतः डावा हात अधिक कार्यशील असल्यामुळे साहजिकच त्यांच्या हृदयावर थोडा ताण पडतो. एका संशोधनातून असे सिद्ध झाले आहे, की डावखुरे लोक उजव्या हाताने काम करणाऱ्या लोकांच्या तुलनेत सरासरी ७ वर्षे कमी जगतात. मात्र काही डावखुरे लोक दोन्ही हातांचा छान समतोल साधतात. डाव्या आणि उजव्या हाताने व्यवस्थित काम करतात. त्यामुळे त्यांचा मेंदू अधिक कार्यन्वित होतो आणि हे लोक अधिक क्रियाशील आणि सक्षम बनतात. अमिताभ बच्चन, रफेल नदाल, आइनस्टाइन, नेपोलियन आणि हिलरी फोर्ड ही काही डावखुऱ्या लोकांची यादी पाहिली, तर आपणही वरील विधानाशी सहमत व्हाल. यासाठीच डावखुऱ्या मुलांच्या पालकांना आपल्या पाल्याकडून दोन्ही हातांनी जास्तीत जास्त सराव करण्याची सूचना दिली जाते.
धर्माने किंवा शास्त्राने हातांमध्ये भेदाभेद केला नाही. उलट हात जोडताना, अर्घ्य देताना, दान करताना दोन्ही हात जुळून पुढे येतात तेव्हाच कार्याला गती येते. म्हणून व्यक्तीत डावे उजवे न करता सर्वांना सामावून घ्यावे आणि समारंभाचा आनंद दोन्ही हातांच्या ओंजळीने भरभरून घ्यावा आणि द्यावा. तसेच वेड्या बहिणीची वेडी माया समजून घेत तिला दोन्ही हातांनी भरभरून आशीर्वाद आणि शुभेच्छा द्याव्यात!