भक्त श्रेष्ठ की भगवंत? या प्रश्नाचे उत्तर दडले आहे या सुभाषितात!
By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: February 9, 2021 09:00 AM2021-02-09T09:00:00+5:302021-02-09T09:00:02+5:30
भक्त आणि भगवंत या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
एकदा महर्षी नारद नारायण नारायण म्हणत भगवान महाविष्णूंकडे आले. त्यांना म्हणाले, 'भगवंता आम्ही भक्तांनी तुम्हाला शोधायचे तरी कुठे?'
त्यावर भगवान विष्णू म्हणाले, 'जे सर्वात पवित्र आणि उच्च स्थान आहे तिथे!'
महर्षी म्हणाले, 'अच्छा म्हणजे हिमालयात? पण तिथे तर देवाधिदेव महादेव असतात. तुमचे स्थान खरे तर क्षीरसागरात. पण तुमच्या भेटीला यावं तर तुम्ही नेहमी भक्तांच्या सान्निध्यात असता.'
भगवान विष्णू हसून म्हणाले, 'नारदा तूच तुझं उत्तर दिलं आहेस. मी सर्वात पवित्र आणि उच्च स्थानी असतो. ते स्थान म्हणजे भक्ताचे हृदय!'
पृथ्वी तावदियं महत्सू महति तद्वेष्ठनं वारीधीः।
पीतोऽसौ कलशोद्भवेन मुनीना स व्योम्नि खद्योतवत्।
तद्विष्णो परमं पदं कलयतः पूर्ण पदं नाभवत।
सोऽपि त्वदहृदी नर्तते खलु भवस्ततः परः को महान॥
पृथ्वी महान आहे. त्यापेक्षा त्या पृथ्वीला वेष्टण करणारा समुद्र महान आहे. असा समुद्र अगस्ती ऋषींनी एकाच आचमनात प्राशन केला .असे(अगस्ती) मुनी आकाशात एका काजव्या सारखे (तारा)आहेत. असे आकाश देवाने( वामन अवतारात) एकाच पावलात व्यापले .असा देव ज्या भक्तांच्या हृदयात आहे ,त्या भक्तांपेक्षा जगात मोठे कोण आहे?( भक्तच सर्वश्रेष्ठ आहेत.)
भक्तामुळे भगवंताची ओळख आहे आणि भगवंतामुळे भक्ताची. त्यामुळे या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.