Bhaum Pradosh 2024: ऐन दिवाळीत भौम प्रदोष; आरोग्य व संपत्ती वृद्धीसाठी करा 'हे' उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 01:57 PM2024-10-28T13:57:44+5:302024-10-28T13:59:15+5:30
Bhaum Pradosh 2024: २९ ऑक्टोबरची संध्याकाळ धनत्रयोदशी आणि भौम प्रदोषामुळे होणार अधिक खास; जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि लाभ!
२९ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी (Dhanteras 2024)आहे आणि त्याच दिवशी भौम प्रदोष (Bhaum Pradosh 2024)देखील आहे. धनत्रयोदशीला आरोग्य, संपत्ती प्राप्तीसाठी भगवान धन्वंतरी, कुबेर महाराज, माता लक्ष्मी यांची पूजा करतात. अशातच भौम प्रदोष व्रत आल्यामुळे या तिथीवर महादेवाची उपासनादेखील फलदायी ठरेल. हे व्रत काय आहे आणि कसे करायचे, त्यामुळे होणारे लाभ कोणते याची माहिती जाणून घेऊ.
प्रदोष म्हणजे दोषांचे निराकरण करणारा. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध व वद्य पक्षातील प्रदोषकालयुक्त त्रयोदशीस प्रदोष असे म्हणतात. प्रदोषकाल हा साधारणपणे सूर्यास्तानंतर तीन घटी असतो. प्रदोष म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, मन, बुद्धी, अहंकार या तेरा तत्त्वांचा मेळ असलेली मायाविशिष्ट प्रकृती आणि त्रयोदशी यांचा मेळ आहे. किंबहुना या तेरा तत्त्वातील संचित मायामल निरस्त होण्यासाठी प्रदोषव्रताची योजना आहे. अशातच भगवान शिवाचा आवडता श्रावण मास असल्याने दुहेरी पर्वणीचा लाभ अवश्य करून घ्या!
२९ ऑक्टोबर २०२४ रोजी मंगळवार असल्याने आणि त्रयोदशी आल्याने ही तिथी भौम प्रदोष म्हणून ओळखली जाईल. वारानुसार जुळून येणाऱ्या प्रदोष तिथीला सोम, भौम, गुरु, शुक्र, शनी प्रदोष अशी नावे दिली जातात. आज भौम प्रदोष निमित्त पुढीलप्रमाणे करा प्रदोष व्रत! भौम व्रत मंगळ ग्रहाशी संबंधित असल्यामुळे या व्रतामुळे मंगळ दोष दूर होतो आणि आर्थिक अडचणी दूर होऊन कर्जमुक्ती मिळते असे म्हणतात.
प्रदोष व्रताचा प्रारंभ शक्यतो उत्तरायणात करावा. प्रदोषव्रतादिवशी दिवसभर उपवास, शिवाची आराधना, स्तोत्रवाचन आणि प्रदोषकाली शिवपूजा व पारणा (उपासानंतरचे भोजन) असा क्रम असून दुसऱ्या दिवशी आवर्जून विष्णूपूजन केले जाते. या व्रतासाठी आदिमायेसह साक्षात शंकर ही अधिदेवता असून नाममंत्राने त्यांना आवाहन केले जाते. प्रदोषव्रतात उपवास हे मुख्य अंग असते. शास्त्रानुसार कोणताही उपवास आदल्या रात्री दुसऱ्या प्रहरापासून सुरू होत असल्यामुळे आदल्या रात्रीच्या प्रथम प्रहरात अल्पाहार घ्यावा. मुख्य व्रतादिवशी शक्यतो जलोपवास अर्थात पाणी पिऊन करावा. तो प्रकृतीस मानवत नसेल, तर रसोपवास म्हणजे गोरस किंवा फळांचा रस किंवा अल्प प्रमाणात फराळ करावा. उपास शक्य नसेल तर शिवपूजा अवश्य करावी.
प्रदोषव्रताचा अधिकार :
प्रदोषव्रताचा अधिकार सर्व जातिधर्माच्या व सर्व वयोगटाच्या स्त्रीपुरुषांना आहे. विशेषत: संबंधात अडथळे आलेल्या, संतती कुमार्गास लागलेल्या, कर्जाने पीडित झालेल्या, सर्व कर्मात हटकून अपयश येणाऱ्या लोकांनी आवर्जून प्रदोषव्रत करावे. जितके काटेकोर, विधीपूर्वक, श्रद्धापूर्वक अंत:करणाने हे व्रत केले जाते, तितके त्याचे अधिकाधिक फळ मिळते.
प्रदोष काळ : प्रदोष काळ हा सायंकालीन संधिप्रकाश अर्थात सूर्यास्ताचा काळ असतो. आज पंचांगानुसार सूर्यास्ताची वेळ सायंकाळी ७ वाजून १० मिनिटे असल्याने पावणे सात ते साडे सात या कालावधीत शिवाभिषेक, स्तोत्रपठण, शिवमंत्राचा जप अवश्य करावा.