जन्म आणि मृत्यू ही तर परमात्म्याकडे जाण्याची द्वारे- ओशो!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 12:12 PM2021-02-16T12:12:50+5:302021-02-16T12:13:17+5:30
परमात्मा जीवनात आहे, तसा मृत्यूमध्येही आहे. जीवन म्हणजे परमात्म्याचा दिवस तर मृत्यू म्हणजे त्याची रात्र.
मृत्यूच्या दारी उभा असताना तो अनुभव घेण्याची सॉक्रेटिसला विलक्षण ओढ लागली होती. सॉक्रेटिसची एखाद्या लहान मुलासारखी वृत्ती होती. लहान मुलाला कसे प्रत्येक बाबतील प्रश्न पडतात, प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची इच्छा असते. तो खुशाल विचारतो, 'मी मरेन का?' जर आपण म्हटले , 'हो,' तर तो विचारतो कधी मरेन? आज? उद्या? केव्हा घडेल ही गोष्ट? आणि इथे हा ज्येष्ठवयीन सॉक्रेटिस या लहान मुलाइतकाच ताजा, जिज्ञासू, उत्सुक आहे. त्याच्या लख्ख आरशावर धुळीचा कणही नाही. इतके वय झाले तरी मनाची पाटी लखलखीत आहे. याने जीवन जाणले. हा मृत्यूही जाणून घेईल. ज्याला जीवन आणि मृत्यू दोन्ही कळले, त्याने परमत्म्याला जाणून घेतले असे समजा.
परमात्म्यापर्यंत पोहोचण्याची ही दोन द्वारे आहेत. परमात्मा जीवनात आहे तसा मृत्यूमध्येही आहे. जीवन म्हणजे परमात्म्याचा दिवस तर मृत्यू म्हणजे त्याची रात्र. ज्याने केवळ दिवसच जाणला पण रात्रीबद्दल काहीच जाणू शकला नाही, त्याचे ज्ञान अपूर्णच म्हणायला हवे. रात्रीची आपली अशी वेगळीच मजा आहे. विश्रांतपणा आहे. रात्रीची आपली अशी एक शालीनता आहे. गूढ गहिरेपण आहे. रात्रीचा अंधार जी शांती प्रदान करतो तो शांती सूर्यप्रकाश देऊ शकत नाही. सूर्यप्रकाशात सगळं आरपार दिसते. त्याच गोष्टी रात्रीच्या अंधारात गहन होतात, सखोल भासतात.
दिवसभराच्या कामाने थकलेल्या भागलेल्या माणसाला रात्रीची झोप हवी असते. म्हणजे परत सकाळी ताजेतवाने होऊन उठता येते. सूर्याचे स्वागत करता येते. आपल्या कामाला लागता येते. असच जीवनभराच्या कष्टाने थकला भागलेला माणूस मृत्यूच्या शांत विश्रब्ध झोपेची इच्छा धरतो. जो नीटपणे जगला, तोच नीटपणे मृत्यूचा स्वीकार करू शकतो. सम्यक जीवनातून सम्यक मृत्यूची प्राप्ती होते. अजिबात भय बाळगू नका. घाबराल तर जीवन हातून निसटून जाईल आणि मृत्यूही निसटेल. त्या अवस्थेत तुमचे जगणे न जगण्यासारखे असेल आणि मरणही तसेच असेल. सगळीकडून रिकामेच राहाल.
दु:खही सहन होत नाही आणि सुखही सहन होत नाही अशी तुमची अवस्था असेल तर तुमच्या डोळ्यावरची झापडं दूर होऊन तुम्हाला तुमच्या अंतरंगात दिसायला लागेल. या अवस्थेचा उपयोग करा. प्रेम आणि पीडा दोन्हीपासून मुक्त होणे आवश्यक आहे.
जीवन जसे समोर येईल तसे जगा. जे उपलब्छ होईल ते समरसून परिपूर्णपणे जगा. तुमच्या वाट्याला वेदना आल्या तर वेदना, प्रेम आले तर प्रेम, जे मिळेल ते मनापासून स्वीकारा आणि पूर्णपणे जगा. अर्धवटपणे, द्विधा मन:स्थितीत, रडत झगडत, ओढत खेचत, कण्हत जगू नका. तुम्हाला आश्चर्य वाटेल, कारण आपली मनोधारणा अशी असते की सुख आपण समरसून स्वीकारतो. पण दु:खं पूर्णपणे स्वीकारत नाही. ते ज्या दिवशी खुल्या दिलाने स्वीकाराल त्या दिवसापासून जन्म मृत्यू या दोन्ही घटनांकडे समान नजरेने बघायला शिकाल आणि आपसुख आलेल्या परिस्थितीचा स्वीकार करत परमात्म्याशी जोडले जाल.