केवळ चमत्कारांनी नाही तर आपल्या प्रेरक विचारांनी सत्संग घडवणारे सत्यसाई बाबा यांची जयंती!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 11:32 AM2024-11-22T11:32:52+5:302024-11-22T11:33:18+5:30
आताचे जग हे चमत्कारापुढे नमस्कार करणारे आहे, म्हणूनच की काय सत्यसाई बाबांनी लोकांना सत्संगाला लावण्यासाठी चमत्काराचीही जोड दिली!
सत्यसाई बाबांचा जन्म २३ नोव्हेंबर १९२६ मध्ये झाला आणि त्यांनी शेवटचा श्वास २४ एप्रिल २०११ मध्ये घेतला. त्यांच्या नावे आजही जगभरात अनेक सत्संगाचे कार्यक्रम होतात. दानधर्म केले जातात. त्यांच्या नावे अनेक धार्मिक संस्था देखील आहेत. २३ नोव्हेंबर रोजी त्यांची जयंती. त्यामुळे त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ.
सत्यसाई बाबा यांचा जन्म आंध्र प्रदेशातील पुट्टापर्थी गावात झाला. मूल व्हावे म्हणून त्यांच्या आईने सत्यनारायणाची कथा ठेवली होती आणि त्या पूजेचा प्रसाद फळास आला. कालांतराने पुत्र झाला. सत्यनारायणाच्या कृपेने झाला म्हणून त्याचे नाव ‘सत्यनारायण’ ठेवण्यात आले. बालपणी त्यांना "सत्यनारायण राजू" नावाने हाक मारली जात असे.
त्यांच्या जन्माच्या वेळी अनेक चमत्कार घडल्याचे सांगितले जाते. जसे की वाद्यांचा आवाज आपसुख कानी पडला. फणाधारी नागाचे दर्शन घडले आणि त्या नागाने बाळाच्या डोक्यावर सावलीरूपी फणा धरला आणि तो तिथून निघून गेला. अशा घटनांमुळे हे बालक असाधारण आहे असा घरच्यांचा विश्वास बसला.
लहानपणापासूनच ते अष्टपैलू होते. शाळेत शिकत असताना त्यांना विंचू चावला आणि ते बेशुद्ध होऊन कोमात गेले. कोमातून शुद्धीवर आले, तेव्हा त्यांचे वागणे बदलले. त्यांनी खाणेपिणे बंद केले आणि फक्त श्लोक आणि मंत्रांचे पठण केले. अवघ्या ८ व्या वर्षी त्यांनी सुंदर भजन रचण्यास सुरुवात केली. २३ मे १९४० रोजी वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी त्यांनी आपल्या अवताराची घोषणा केली आणि आपले संपूर्ण आयुष्य जनसेवेसाठी समर्पित केले.
प्रत्येकाला उपजीविकेचे मूलभूत साधन उपलब्ध करून देणे हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे असे सत्यसाई बाबा मानत होते. सत्यसाई हे सर्व धर्माच्या लोकांसाठी प्रेरणास्थान होते. सत्यसाई बाबांनी १७८ देशांमध्ये धर्मप्रसाराची केंद्रे स्थापन केली आहेत. आयुष्यातील ८५ वर्षे शांततापूर्ण जीवन जगणाऱ्या सत्यसाईंनी २४ एप्रिल २०११ रोजी देहत्याग केला. सर्वांवर प्रेम करा, सर्वांना मदत करा आणि कोणाचेही नुकसान करू नका असा संदेश सत्यसाईबाबांनी जगाला दिला.
सत्यसाईबाबांना शिर्डीच्या साईबाबांचे अवतार मानले जाते. वाचूया त्यांचे प्रेरक विचार :
सत्यसाई बाबा हे एक आध्यात्मिक गुरू होते ज्यांच्या संदेशाने आणि आशीर्वादाने जगभरातील लाखो लोकांना योग्य नैतिक मूल्यांसह योग्य जीवन जगण्याची प्रेरणा दिली. सत्यसाईबाबांनी आपल्या भक्तांना नेहमी मदत केली आणि त्यांना चांगल्या आदर्शांचे पालन करण्याचा, चांगले वागण्याचा आणि सेवेची भावना ठेवण्याचा सल्ला दिला.ते म्हणायचे, "शिर्डीच्या साईंचा मी शिव-शक्ती स्वरूपाचा अवतार आहे.'' त्यांनीदेखील श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र भक्तांना दिला.
सत्यसाईबाबांनी त्यांच्या हयातीत अनेक शैक्षणिक संस्था, रुग्णालये आणि इतर मानवसेवेच्या कार्यात योगदान दिले. प्रशांती निलयम मधील बाबा - क्लास हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर सुमारे २०० एकरमध्ये पसरलेले आहे. पुट्टापर्थी येथे स्थित, हे रुग्णालय २२० खाटांमध्ये मोफत शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय सेवा पुरवते. बेंगळुरूच्या श्री सत्य साई उच्च वैद्यकीय विज्ञान संस्थेत गरिबांसाठी ३३३ खाटा तयार करण्यात आल्या आहेत.
सत्यसाईबाबांनी आपल्या हयातीत अध्यात्म कसे जगायचे याचा वस्तुपाठ घालून दिला. तीच परंपरा सुरु ठेवत त्यांचे भक्त त्यांचे कार्य जगभरात पोहोचवत आहेत आणि आजही सत्यसाईबाबांच्या विचारांचे पालन करत आहेत.