शरीररूपी संगणकाला हवा ईश्वररूपी अँटीव्हायरस!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 08:00 AM2021-03-22T08:00:00+5:302021-03-22T08:00:03+5:30
शरीर सचेतन ठेवण्यात मनाची भूमिका सर्वात महत्त्वाची असते.
संगणक एक यंत्र आहे. त्याच्यामुळे अनेक काम सोपी होतात, परंतु ते स्वयंचलित नाही. त्याला चालना देण्यासाठी दुसरी यंत्रणा कार्यक्षम असावी लागते. ती वेगवेगळ्याप्रकारे कार्य करते.
आपले शरीरही संगणकासारखे आहे. आपल्या शरीरात इंद्रिय, मेंदू, हृदय, मन हे भाग शरीररूपी संगणकाला नियंत्रित करतात़ बाह्य गोष्टी आत्मसात करून शरीरात सेव्ह किंवा डाऊनलोड करतात. परंतु संगणात ज्याप्रमाणे अँटीव्हायरस नसेल, तर आतील सगळा डेटा करप्ट होतो, त्याप्रमाणे शरीरातील बाह्य गोष्टी आत्मसात करत असताना त्यांचा चांगला आणि वाईट दोन्हीप्रकारे परिणाम होतो. यासाठी मनाचा अँटीव्हायरस कार्यन्वित असायला हवा. अन्यथा शरीररूपी संगणक नादुरुस्त होईल.
शरीर सचेतन ठेवण्यात मनाची भूमिका सर्वात महत्त्वाची असते. म्हणून संत सांगतात, 'मन करा रे प्रसन्न, साऱ्या सिद्धीचे कारण!' मन स्वस्थ असेल, तर शरीरही स्वस्थ राहील. स्वस्थ शरीर आत्म्याशी संवाद साधून परमात्मापर्यंत पोहोचू शकेल.
या गोष्टी पुस्तकी वाटत असल्या, तरी जेव्हा आपण स्वानुभव घेतो, तेव्हा खरी प्रचिती येते. ईश्वराशी जोडले जाणे, अजिबात कठीण नाही. तो बाहेर नाही, आपल्या आत आहे. तोच आपल्या शरीरात अँटीव्हायरसचे काम करतो. त्याच्याशी नित्य संवाद साधला नाही, तर तो काम करणे बंद करतो. तो क्रियाशील ठेवण्यासाठी रोज परमेश्वराचे स्मरण करा, त्याच्याशी संवाद साधा आणि आपल्या मनातील अनावश्यक डेटा कंट्रोल+अल्ट+डिलिट करून टाका...!