श्रीमंतीसाठी ज्योतिषशास्त्रीय तोडगे; पोळीचे दोन घास जीवनात आणतील क्षण खास!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 04:21 PM2022-06-07T16:21:12+5:302022-06-07T16:36:20+5:30
चांगली घर-गाडी, बँक-बॅलन्स, नोकरी, आनंदी जीवन हे बहुतेक लोकांचे स्वप्न असते. खूप प्रयत्न करूनही हे स्वप्न पूर्ण होण्यात अडथळे येत असतील तर वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात सांगितलेले उपाय करा. यामध्ये पुढे दिलेली पद्धत खूप प्रभावी ठरते.
मनुष्य दिवस रात्र झगडतो, ते स्वतःची आणि आपल्या जवळच्या लोकांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी. सुखी समाधानी जीवन जगणे हेच प्रत्येकाचे अंतिम उद्दिष्ट असते. परंतु अनेकदा एखादी व्यक्ती कष्ट करूनही पुरेसे पैसे कमवू शकत नाही. यामागे कुंडलीतील ग्रहस्थिती, भाग्य, कर्म इत्यादी अनेक कारणे असू शकतात. ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात अशा अनेक समस्यांवर उपाय दिलेले आहेत, ज्यामुळे माणसाला खूप मदत होऊ शकते. आज अशाच एका उपायाबद्दल आपण जाणून घेऊ!
आपल्या बालपणी आपली आई आजी भाकर तुकडा ओवाळून टाकत असे. आपल्याला कोणाची वाईट दृष्ट लागू नये अशी त्यामागे सद्भावना असे. याच मुद्द्याला दुजोरा देऊन ज्योतिष शास्त्राने कुंडलीतील बिघडलेल्या ग्रहस्थितीवर तोडगा सुचवला आहे.
पितृदोष किंवा काल सर्प दोषामुळे गरीबी, अपयश, विविध समस्या पाठलाग सोडत नसतील तर भाकरीच्या किंवा पोळीच्या तुकड्याचा उपाय करून बघा. ते उपाय पुढीलप्रमाणे आहेत-
आपण घरात रोज पोळी भाजी करतो. अशा वेळी पोळी केल्यावर पहिल्या पोळीला तूप लावा आणि त्याचे चार समान तुकडे करा. त्यावर गूळ किंवा साखर घाला. एक तुकडा गायीला, दुसरा कुत्र्याला, तिसरा कावळ्याला आणि चौथा तुकडा एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा. अर्थात व्यक्तीला पोळी देताना एकाऐवजी दोन पोळ्या दिल्या तरी चालेल. असे केल्याने कुंडलीतील अनेक दोष दूर होतील आणि हळूहळू तुमच्या जीवनात आर्थिक समृद्धी वाढू लागेल. ज्यांचे घर घेण्याचे स्वप्न आहे, तेही पूर्ण होईल.
पोळी, भाकरी हे पदार्थ आपल्यातील नकारात्मकता शोषून घेतात. म्हणून ज्योतिष शास्त्राने हे पदार्थ दान करण्याचा उपाय सांगितला आहे. गुजराती-मारवाडी घरात केले जाणारे रोडगे, बाटी यांचे दानसुद्धा पुण्यप्रद ठरते.
वरकरणी हा उपाय सोपा वाटत असला, तरी त्यात सातत्य ठेवणे आणि ही गोष्ट आठवणीत ठेवणे कठीण जाते. अशावेळी आपल्या जेवणाच्या ताटाचा देवाला नैवेद्य दाखवावा आणि आपण जेवायला बसण्याआधी वरील उपाय करण्याची सवय लावावी. जेणेकरून जेवणाच्या ओघात आपल्याला या गोष्टीचा विसर पडणार नाही आणि या उपायाचा लाभदेखील होईल!