वाईट सवयी बदलता येतात का? हो! नक्की येतात! पण कधी आणि कशा? ते जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 04:34 PM2022-10-11T16:34:05+5:302022-10-11T16:34:35+5:30
व्यक्ती वाईट नसते, सवयी वाईट असतात. त्या सवयी दूर झाल्या तर चांगुलपणा मूळ धरतो!
वाईट सवयींचा शेवट हा पश्चात्तापात असतो. वेळ निघून गेलेली असते आणि परतीचे मार्गही बंद झालेले असतात. पण वाईट सवयी एका रात्रीत जडतात का? अजिबात नाही! त्याची सुरुवात होत असताना आपले सुप्त मन आपल्याला सावध करते, परंतु आपण मनाचे ऐकत नाही. एक एक वीट रचत जातो आणि अभेद्य भिंत तयार होते. याबाबत एक गोष्ट सांगितली जाते.
एक गुरु आणि शिष्य जंगलातून जात असतात. वाटेत त्यांना एक अंकुर फुटलेला दिसतो. गुरुजी सांगतात, ते उपटून टाक. शिष्य लगेच तशी कृती करतो. काही पावलं पुढे गेल्यावर त्यांना एक रोपटं दिसतं. गुरुजी सांगतात, ते रोपटं उपटून टाक. शिष्य तसे करतो. आणखी काही अंतर पार केल्यावर एक पाच सात फुटी वाढलेलं झाड दिसतं. गुरुजी सांगतात, ते उपटून टाक. थोडी शक्ती लावत शिष्य तेही उपटून टाकतो. आणखी पुढे गेल्यावर एक वटवृक्ष दिसतो. गुरुजी सांगतात, यालाही उपटून टाक. शिष्य म्हणतो, 'गुरुजी हे कसं शक्य आहे? याची पाळं मूळं जमिनीत खोलवर रुतली आहेत. ती काढणं अशक्य आहे.' गुरुजी म्हणतात, 'मी हेच तुम्हाला शिकवत असतो. जेव्हा तण दिसतात, ते वेळीच उपटून टाकायला हवेत. त्याचं रूपांतर झाडात झालं तर ते उपटून टाकणं अशक्य होतं.'
ज्या सवयी आता क्षणिक सुख देत आहेत, त्या भविष्यात आपल्याला त्रासदायक ठरणार आहेत, याची सूचना अंतर्मन देतं तेव्हा वेळीच सावध व्हा. वाईट सवयींची पाळं मूळं खोलवर रुतण्याआधी ती उपटून टाका. मनाची उत्तम मशागत करा. तसे केले तर वाईट सवयी आणि त्यापासून होणारा प्रादुर्भाव यापासून आपण स्वतःला नक्कीच वाचवू शकतो याची खात्री बाळगा.
आजपासून आपल्या मनातलं वाईट सवयींचं रोप किती वाढलं आहे ते चाचपून पहा आणि जरी ते खोलवर गेलं असेल तरी ते निरुपयोगी असल्याने मुळासकट काढून टाकण्याचा प्रयत्न करा, नक्की जमेल!