विवाहित माणूस ब्रह्मचारी असू शकतो का? हो! वाचा वसिष्ठ ऋषींची कथा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 12:14 PM2021-07-14T12:14:00+5:302021-07-14T12:15:00+5:30

प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळून अध्यात्मसाधना करणाऱ्या साधकाला ही विदेही अवस्था प्राप्त होऊ शकते!

Can a married man be celibate? Yes! Read the story of Vasistha Rishi! | विवाहित माणूस ब्रह्मचारी असू शकतो का? हो! वाचा वसिष्ठ ऋषींची कथा!

विवाहित माणूस ब्रह्मचारी असू शकतो का? हो! वाचा वसिष्ठ ऋषींची कथा!

googlenewsNext

'अवघा रंग एक झाला' या संत चोखामेळा यांच्या लोकप्रिय अभंगात एक ओळ आहे, `देही असोनि विदेही, सदा समाधिस्त राही' या ओळीचा फार मोठा गर्भितार्थ आहे. देहात राहूनही देह वासनांपासून अलिप्त राहणे, ही कला केवळ भक्तांनाच जमू जाणे. ते देहकर्म, देहधर्म करतात परंतु आत्मा प्रभू चरणांशी समाधिस्त ठेवतात. ही सिद्धी प्राप्त होण्यासाठी देवाशी समरसून जाणे संतांना अपेक्षित आहे, तेव्हाच तर अवघा रंग एक होईल! 
याबाबत एक कथा सांगता येईल, ती आहे वशिष्ठ ऋषी, अरुंधती आणि विश्वामित्र ऋषींची!

नदीच्या एका तीरावर वशिष्ठमुनींचा तपश्चर्येने सजलेला, फुललेला आणि डवरलेला आश्रम होता. एक दिवस हे महामुनी आपल्या धर्मपत्नीला म्हणाले, 'अरुंधती, आज सुग्रास भोजन कर आणि ते भोजन समोरील तीरावर घेऊन ये. बऱ्याच काळानंतर विश्वामित्रांची तपश्चर्या आज संपणार आह़े  त्यांना भूक लागलेली असेल. मी पुढे होतो, तूही लवकर ये'

पतीआज्ञेप्रमाणे अरुंधतीने पाकसिद्धी केली आणि नदीच्या त्या तीरावर जाणार तर नदीला पूर आलेला. वसिष्ठांनी पलिकडून पाहिले आणि तिचे भाव ओळखत म्हणाले, 'घाबरतेस काय? नदीला प्रार्थना कर, माझे पती ब्रह्मचारी असतील तर मला वाट करून दे!'

अरुंधती गोंधळली. लग्न होऊन हे ब्रह्मचारी कसे? तिने नदीला विनंती केली आणि काय आश्चर्य, नदीने वाट मोकळी करून दिली. अरुंधती पलीकडे पोहोचली. तिने विश्वामित्रांना जेऊ घातले. पोटभर जेवण झाले. वसिष्ठ निघून गेले होते. अरुंधतीने नदीला पूर आल्याचे सांगत विश्वामित्रांना उपाय विचारला. विश्वामित्र म्हणाले, 'देवी, नदीला सांग, विश्वामित्र आताच्या क्षणापर्यंत उपाशी असतील तर मला वाट करून दे!'

पोटभर जेवलेल्या विश्वामित्रांचे बोल ऐकून अरुंधती पुन्हा गोंधळली. तिने दिलेला उपाय ऐकला, नदीनेही तिचे ऐकले, अरुंधती स्वगृही पोहोचली. दिवसभर विचार करत बसलेली अरुंधती सायंकाळी वसिष्ठ परत आल्यावर विचारती झाली, `तुम्ही विवाहित असून, स्वत:ला ब्रह्मचारी म्हणवता, विश्वामित्र जेवून स्वत:ला उपाशी म्हणवतात आणि नदीला हे पटते व ती वाट मोकळी करते, हे काय गौडबंगाल आहे? मला काहीच कळले नाही.'

त्यावर हसून वसिष्ठ सांगतात, 'अगं देहबुद्धीने केलेले कर्तव्य वेगळे आणि आत्मबुद्धीचे कर्म वेगळे. तू आमच्या देहबुद्धीचा आणि देहधर्माचा विचार करत होतीस परंतु आम्ही आत्मशक्तीच्या आणि आत्मकर्माच्या बळावर नदीला आवाहन कर असे सांगितले. आमच्या आत्मबुद्धीच्या पावित्र्याची साक्ष नदीला पटल्यामुळे तिने मार्ग मोकळा केला. यालाच देही असोनि विदेही अवस्था म्हणतात.'

असाच प्रपंच संतांनीदेखील केला, परंतु देहबुद्धीने! आत्मबुद्धीने मात्र ते प्रभू चरणी समर्पित होते. आपल्याही या अवस्थेपर्यंत पोहोचायचे असेल, तर प्रापंचिक जबाबदाऱ्या पार पाडून मनाने अलिप्त होता आले पाहिजे, तसे करणे जमेल का? 

Web Title: Can a married man be celibate? Yes! Read the story of Vasistha Rishi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.