Cancer features : सर्वकाही मिळूनही अस्वस्थ मनाची रास म्हणजे कर्क; वाचा उपाय आणि त्यांच्याबद्दल बरेच काही!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 06:24 PM2022-05-16T18:24:08+5:302022-05-16T18:24:31+5:30
Cancer features : अतिशय प्रामाणिक, जिज्ञासू आणि कर्तव्यदक्ष अशी ओळख आहे कर्क राशीच्या लोकांची! याच गुणांमुळे समाजात त्यांना मानसन्मान मिळतो. जाणून घेऊया त्यांच्याविषयी अधिक माहिती...
याआधी आपण मेष, वृषभ आणि मिथुन राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्त्व जाणून घेतले, आज कर्क राशीच्या लोकांबद्दल सविस्तर माहिती घेऊ. भावुकता, प्रचंड कुतूहल, विलासिता, व्यावसायिक कार्यक्षमता इत्यादी त्यांचे गुण आहेत. आपल्या कर्तव्याशी ते एकनिष्ठ असतात. मोठ्या पदापर्यंत पोहोचतात. राजकारणात सक्रिय असतात. स्वभाव थोडा लाजाळू असतो, परंतु जोडीदारावर मनापासून प्रेम करतात. त्यांच्या ठायी भूतदया असते.
आरोग्याची काळजी : कर्क राशीचे चिन्ह असते खेकडा. खेकडा जसा चिकटून बसतो किंवा आपली पकड घट्ट ठेवतो, तो गुण कर्क राशीच्या लोकांमध्ये आढळतो. त्यांच्यात एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याची क्षमता असते. मात्र तसे करण्याच्या नादात अनेकदा त्यांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते आणि हेळसांड होते. परिणामी लठ्ठपणा, हृदयविकार, मधुमेह असे गंभीर आजार होतात. यासाठी त्यांनी आपल्या करिअर इतकेच आपल्या तब्येतीकडेही लक्ष द्यावे.
आम्ही सारे खवय्ये : कर्क राशीचे लोक अतिशय खवय्ये असतात. चटकदार गोष्टी त्यांना फार आवडतात. त्यांना केवळ खाणे आवडत नाही तर खाऊ घालणेही आवडते. त्यांना पाककला उत्तम जमते. ते जितके खाण्याचे शौकीन असतात तेवढेच गाण्याचे शौकीन असतात. त्यांना नटण्या मुरडण्याची, टापटीप राहण्याची आवड असते. या सवयींमुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व खुलून दिसते.
स्वप्ने साकार करण्याची भरपूर क्षमता : असे लोक कठोर आणि कटू शब्दांचा तिरस्कार करतात, परंतु त्यांच्या वाट्याला अनेकदा मानहानीचे प्रसंग येतात. तरीदेखील ते आपल्या स्वप्नांपासून बधत नाहीत. ते त्यांच्या कर्तव्यांशी एकनिष्ठ राहतात आणि आपल्या आदर्श व्यक्तीप्रमाणे स्वप्नपूर्ती करतात. कर्क राशीच्या लोकांमध्ये स्वप्ने साकार करण्याची क्षमता असते.
व्यापक सामाजिक वर्तुळ : या लोकांचे व्यक्तिमत्त्व आणि स्वभाव यामुळे अनेक लोक त्यांच्याशी जोडले जातात. त्यामुळे त्यांचा जनसंपर्क दांडगा असतो. त्यांना समाजात मान असतो. मित्र परिवार त्यांना आपल्या निर्णयात सामील करून घेतो. असे लोक अनेकांना मार्गदर्शक म्हणूनही भूमिका निभावतात. कालपुरुषाच्या कुंडलीत चतुर्थ भाव असल्यामुळे सुख, समृद्धी, निवास आणि जनसंपर्क अतिशय उच्च दर्जाचा असतो. जर कुंडलीत चंद्र चांगल्या आणि मजबूत स्थितीत असेल तर अशी व्यक्ती खूप उच्च स्थानावर विराजमान असते.
मन शांत नाही : एवढ्या सगळ्या गोष्टी असूनही हे लोक कायम अस्वस्थ असतात. एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याचा नाद आणि जबाबदाऱ्यांचे ओझे त्यांना स्वस्थ बसू देत नाही. परिणामी मन शांत राहत नाही. या लोकांनी रोज ध्यान धारणेचा सराव केला पाहिजे. तसे केले तर ते त्यांचे ध्येय निश्चित पणे गाठू शकतील. कितीही अडचणी आल्या तरी त्यावर मात करू शकतील.
गूढ स्वभाव : या राशीच्या लोकांचा स्वभाव अतिशय गूढ असतो. यांच्या मनात काय सुरू असते याचा थांगपत्ता कोणालाही लागू देत नाहीत. चेहऱ्यावर एक भाव आणि मनात भलतेच विचार ही त्यांची खासियत असते. हे लोक एखाद्यावर दीर्घकाळ राग धरून ठेवतात. काही जण शीघ्रकोपी असतात, पण तेवढेच शांत देखील होतात. मात्र शहाण्या माणसाने यांच्याशी वैर पत्करू नये, हेच चांगले.