तुम्ही सुद्धा हे तावीज तुमच्या जवळ बाळगा आणि गरज असेल तेव्हा उघडा; वाचा ही बोधकथा

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: February 19, 2021 06:34 PM2021-02-19T18:34:31+5:302021-02-19T18:35:59+5:30

सुख-दु:खाचे भांडवल न करता, स्वत:ला सतत दिलासा द्या, 'ही वेळ निघून जाईल...!'

Carry this amulet with you too; Read this parable | तुम्ही सुद्धा हे तावीज तुमच्या जवळ बाळगा आणि गरज असेल तेव्हा उघडा; वाचा ही बोधकथा

तुम्ही सुद्धा हे तावीज तुमच्या जवळ बाळगा आणि गरज असेल तेव्हा उघडा; वाचा ही बोधकथा

googlenewsNext

ज्योत्स्ना गाडगीळ 

एकदा अकबर राजाने बिरबलाला प्रश्न विचारला, की बिरबला, 'असे कोणते वाक्य आहे, जे सुख आणि दु:खं अशा दोन्ही प्रसंगात कामी येईल?' हजरजबाबी बिरबल लगेच म्हणाला, 'हे ही दिवस जातील!' सुखाचे क्षण असो नाहीतर दु:खाचे, ते फार काळ टिकत नाहीत, हे सत्य बिरबलाने एका वाक्यातून अकबराला पटवून दिले. अकबर खुश झाला. तेव्हापासून घराघरामधून हे वाक्य मोठ्या अक्षरात भिंतीवर कोरून ठेवले जाते. जेणेकरून आनंदाच्या भरात आपल्याला अहंकार आणि संकटाच्या काळात नैराश्य येत नाही. अशीच एक गोष्ट एका राजाच्या बाबतीतही घडली.

एका राजाकडे एक साधू आले. राजाने त्यांचा यथायोग्य सत्कार केला. राजाचा नम्रभाव आणि प्रजेप्रती असलेली जबाबदारीची जाणीव पाहता साधूंनी राजाला सुरक्षाकवच म्हणून एक तावीज दिले. आणि साधू म्हणाले, `राजा, हे तावीज साधेसुधे नाही, तर या तावीजच्या आत एक कागद आहे. त्यावर एक मंत्र लिहिला आहे. मात्र, तो मंत्र काय, हे आता विचारू नकोस किंवा उघडूनही पाहू नकोस. जेव्हा तू खूपच अडचणीत असशील, तेव्हाच हे तावीज उघडून बघ. असे सांगून साधू महाराज निघून गेले. 

एकदा राजा शिकारीला गेला होता. तेव्हा घनदाट अरण्यात वाघाची शिकार करता करता राजाची आणि सैनिकांची ताटातूट झाली. राजा एकटा पडला. वाट शोधत शोधत तो दुसऱ्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचला. ते शत्रूराज्य होते, हे त्याच्या लक्षात आले. तो एका गुपेâत लपून राहिला. सायंकाळ झाली होती. दुसऱ्या राज्यातल्या सीमेवरील पहारेकरी सीमेवर पाळत ठेवत जंगलातून पेâरफटका मारत होते. ते त्या गुहेजवळ आले. 

राजा आत लपून बसला होता. त्याच्या कानावर घोड्यांच्या टापांचा आवाज आला. राजा दचकला. आज जर आपण शत्रू राष्ट्रातील सैनिकांच्या हाती लागलो, तर आपली कोणीही गय करणार नाही. तो श्वास रोखून गुहेत लपून बसला. त्याक्षणी तो एकाकी पडल्याने खूप घाबरला होता. त्याला साधूंची आठवण आली. त्याने गळ्यातले तावीज उघडून पाहायचे ठरवले. सैनिक जवळपास असल्याचे त्याला जाणवत होते. त्याने घाबरतच तावीज उघडले. त्यातील कागद उलगडून पाहिला. तर त्या कागदावर लिहिले होते, 'ही वेळही निघून जाईल.' साधूंनी मंत्ररूपाने लिहिलेले हे वाक्य वाचून राजाला धीर मिळाला. तो शांत बसून होता. 

सीमेवर कोणीही न दिसल्याने काही काळातच पहारेकरी तिथून निघून गेले. त्यांच्याबरोबरच घोड्यांच्या टापांचा आवाजही येईनासा झाला. राजाचा जीव भांड्यात पडला. तो रात्रभर गुहेत थांबला आणि सूर्योदय होताच जीव  मुठीत घेऊन आपल्या राज्यात परतला. 

प्रत्येकावर अशी वेळ, असा अवघड प्रसंग येतो. तेव्हा आपला धीर, संयम सुटतो. आपण उलट सुलट विचार करू लागतो. परंतु, तसे न करता, तावीजमध्ये बंदिस्त असलेला मंत्र आपणही लक्षात ठेवला, तर आपलीही अवघड परिस्थितीतून सहज सुटका होऊ शकते. म्हणून सुख-दु:खाचे भांडवल न करता, स्वत:ला सतत दिलासा द्या, 'ही वेळ निघून जाईल...!'

Web Title: Carry this amulet with you too; Read this parable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.