इजिप्तमध्ये मांजराची पूजा होते, मग भारतात मांजर आडवं जाण्याची भीती का? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 08:00 AM2022-04-27T08:00:00+5:302022-04-27T08:00:02+5:30

मांजर आडवं गेल्याने कामं होत नाही म्हणे, ही वस्तुस्थिती आहे की गैरसमज? चला जाणून घेऊ!

Cats are worshiped in Egypt, so why be afraid of cats in India? Read on! | इजिप्तमध्ये मांजराची पूजा होते, मग भारतात मांजर आडवं जाण्याची भीती का? वाचा!

इजिप्तमध्ये मांजराची पूजा होते, मग भारतात मांजर आडवं जाण्याची भीती का? वाचा!

googlenewsNext

अलीकडेच दोन मांजरींचा हृदयद्रावक किस्सा कानावर पडला. एक मांजर दुसऱ्या मांजरीचे सांत्वन करत होती. मी कानोसा घेतला, तर ती सांगत सांगत होती, 'आज सकाळच्या न्याहारीला आमच्याकडे उत्तम बेत होता, तो म्हणजे, मऊ, लुसलुशीत, गुबगुबीत, लांब शेपटीचा काळाभोर उंदिर! मुलांना मेन्यू सांगितला. मुले खुशीत होती. बोक्यासुद्धा डायनिंग टेबलवर माझी वाट बघत बसला होता. मात्र, मी उंदराचा पाठलाग करत असताना एक माणूस आडवा गेला. मनात म्हटले आजचा बेत फसणार. म्हणून बाजूने दुसऱ्या मांजरीला पुढे जाऊ दिले. ते गेल्यावर मग मी उंदराच्या मागे धूम ठोकली. तोवर, टॉम अँड जेरीतल्या कार्टुन मालिकेसारखी माझी अवस्था झाली. उंदराने मला 'जेरी'स आणले आणि माझ्या घरचे न्याहारी मिळाली नाही, म्हणून मलाच 'टॉम'णे मारू लागले.'

हा संवाद ऐकला आणि काळजाचे पाणी पाणी झाले. आजवर आपण मांजरांना दोष देत होतो. परंतु, ते सुद्धा आपल्याला दोष देतात, हे कळल्यावर मनात अपराधी भाव दाटून आला. याचा अर्थ, मांजर आडवे गेले, तर आपलेच नाही, तर त्याचेही काम होत नाही, असे म्हणायला हवे. माझ्या डोक्यात हे विचारचक्र सुुरू असताना, प्रख्यात लेखक व.पु.काळे यांचे वाक्य आठवले,

'माणूस अपयशाला भीत नाही, तर अपयशाचे खापर फोडायला काहीच मिळाले नाही तर? या विचाराने घाबरतो.'

वरील रुपक कथेतून हीच बाब सांगण्याचा प्रयत्न आहे, की दुर्बल माणूस अपयशाची कारणे शोधतो. मग समोरून मांजर जावो नाहीतर अन्य कोणीही! 

तरीदेखील ८४ लक्ष योनी वगळून एकट्या मांजराच्या डोक्यावरच माणसाने अपयशाचे खापर का फोडले असावे? तर...मांजर अतिशय संशयास्पद नजरेने प्रत्येक गोष्टीकडे पाहत असते. गाय, म्हैस, कुत्रा, हे आपल्या परिसरात सहजतेने आढळणारे प्राणी बघा, त्यांच्या नजरेत असा संशयकल्लोळ आढळत नाही. ते बिचारे स्थितप्रज्ञ नजरेने सृष्टी पाहत असतात. तशीच संशयी दृष्टी कावळ्याची. तोही फार बारकाईने सगळ्या गोष्टी पाहत असतो. त्याच्या डोळ्यात अल्ट्रा लेन्सेस असतात. म्हणून फार चिकित्सक असलेल्या व्यक्तीला 'काकदृष्टी' आहे, असे आपण म्हणतो.

 

आपण दूध-पोळीवर समाधान मानतो, तशी मांजर दूध आणि उंदीर यावर समाधान मानते. त्यामुळे तिचे विशेष काही हट्ट नसतात. मात्र, ती एवढी चिवट असते, की तिला कितीही दूर नेऊन सोडा, ती दिशा कधीच विसरत नाही आणि मांजरपावलांनी बरोबर घरी येते. 

मांजरीचे फिस्कारून अंगावर येणे, तिच्या भांडकुदळ स्वभावाचे द्योतक आहे. गुरगुरत राहणे, समोरच्याकडे रागाने पाहणे, रात्रीच्या वेळी बाळ रडावे, तसे तासन् तास रडत राहणे, कोणाला आवडेल सांगा? म्हणून तिच्यावर हा राग. 

चांगल्या कामात कोणी शंका उपस्थित केली किंवा संशय व्यक्त केला, की आपली चिडचिड होते. तशीच कामासाठी बाहेर पडल्यावर मांजरीची संशयी नजर आपल्या नजरेस पडली, की त्रासदायक वाटते आणि काम झाले नाही, की आपण तिला दोषी ठरवतो.

मांजर, तीही काळी...!

आपण भारतीय कृष्णवर्णी, तरी आपल्याला काळा रंग आवडत नाही. 'लज्जा' चित्रपटात अनिल कपूरचा एक संवाद आहे, 'आपल्या देशात मुलगा काळाठिक्कर का असेना, त्याला मुलगी गोरीपानच लागते.' या गोऱ्या रंगाच्या प्रेमात पडूनच दीडशे वर्ष भारतीयांनी गुलामगिरीत काढली आणि पुनश्च त्याच दृष्टीने वाटचाल सुरू आहे. त्यामुळे, आधीच मांजर, तिही काळी, म्हणजे 'काम होणारच नाही' असे आपले मन परस्पर ठरवून टाकते. यात मांजरीचा काहीही दोष नसतो. दोष असतो, तो आपल्या कलुषित आणि भेदरलेल्या मनाचा. 
 
इजिप्तमध्ये मांजरांची पूजा होते. आपल्याकडेही अनेक घरात उंदरापासून बचावासाठी मांजर पाळली जाते. कोकणात तर माणसं कमी आणि मांजरी जास्त, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. ती इतकी माणसाळलेली असतात, की सतत पायात, हातात, जेवणाच्या ताटात घुटमळत असतात. तिथे मांजर 'आडवी' गेली, तरी कोकणी माणसांची `उभ्या उभ्या' असंख्य कामे सुरूच राहतात. 

Web Title: Cats are worshiped in Egypt, so why be afraid of cats in India? Read on!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.