अशांतीचे कारण बाहेर नाही, तर आपल्या आत असते - ओशो
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 08:06 PM2021-02-27T20:06:15+5:302021-02-27T20:06:44+5:30
खरे पाहता अशांती तुमच्या अहंकारात आहे. तुमच्या अहंकाराची प्रतिक्रिया होते आणि मग तुम्ही म्हणता ही अशांती आहे.
आपण मनाशी नेहमी असा विचार करत असतो की इतर कुणी तरी मला अशांत करत आहे. रस्त्यावर जाणाऱ्या ट्रॅफिकचा आवाज, चहुकडे खेळणाऱ्या मुलांचा कलकलाट, स्वयंपाकघरात काम करणारी पत्नी प्रत्येक जण तुम्हाला अशानत करत असतो. पण हे खरे नव्हे. तुम्हाला कुशीही अशांत करू शकत नाही. तुम्ही स्वत:च अशांतीचे कारण आहात. तुम्ही अस्तित्वात असल्याने कुणीही काहीही तुम्हाला अशांत करू शकते. तुम्ही अवस्थितच नसाल तर अशांती येईल आणि अंतातील रित्ततेला स्पर्शही न करता निघून जाईल. पण तुम्ही असे असता, की सगळे काही तुम्हाला फार लवकर स्पर्श करते. जणू कसल्याही गोष्टीचा घाव पडतो. जखम होते. लगेच तुम्हाला लागते.
मी इथे बोलतोय. जर इथे कुणीच नसेल, तर मी बोलत राहिलो तरी आवाज निर्माण होणार नाही. पण मी आवज निर्माण करू शकतो. कारण मी स्वत: तरी आवाज ऐकतोच. जर ऐकायला कुणीच नसेल, अगदी मी ही नसेन. नामरुपात्मक मी विलीन होऊन अंतरात रिक्तता असेल. तर आवाज निर्माण होणार नाही. कारण आवाज ही तुमच्या कानांची प्रतिक्रिया आहे.
खरे पाहता अशांती तुमच्या अहंकारात आहे. तुमच्या अहंकाराची प्रतिक्रिया होते आणि मग तुम्ही म्हणता ही अशांती आहे. ही तुमची व्याख्या आहे. कधी कोणत्या तरी दुसऱ्या स्थितीत, तुम्ही त्याच गोष्टीचा आनंद अनुभवू शकता. त्या वेळी तीच गोष्ट अशांती वाटणार नाही. मन आनंदी असेल, तेव्हा एखाद्या संगीताबद्दल म्हणाल, हे किती छान संगीत आहे. पण मन उदास असेल तर सुश्राव्य संगीतदेखील अशांतीचा अनुभव देईल.
जर तुम्ही उरलाच नाही, तर मग फक्त अवकाश उरेल. एक शून्य, रिकामी अवस्था असेल. आत कुणी नाहीच म्हटल्यावर प्रतिक्रिया कशी उमटणार? कोण प्रत्युत्तर देणार? ही रिक्त अवस्था अनुभवून पहा. कोणत्याही निष्क्रिय अवस्थेत बसा. काहीही करू नका. निष्क्रियपणे बसाल, ध्यान करू लागाल, तेव्हा क्रिया करणारा मी कर्ता हा अहंभाव राहत नाही. जेव्हा अहंभाव लोप पावेल, तेव्हा अशांतीचे कारणच राहणार नाही.