जयंती विशेष: समाजाच्या तळागाळात ऐक्य अन् भक्तिमार्ग रुजवणारे थोर पुरुष चैतन्य महाप्रभू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 11:12 IST2025-03-14T11:09:22+5:302025-03-14T11:12:35+5:30
Chaitanya Mahaprabhu Jayanti 2025: लुप्तप्राय झालेले वृंदावन चैतन्य महाप्रभू यांनी पुन्हा वसवले. सात वैष्णव मंदिरांची चैतन्य यांनी वृंदावनमध्ये स्थापना केली.

जयंती विशेष: समाजाच्या तळागाळात ऐक्य अन् भक्तिमार्ग रुजवणारे थोर पुरुष चैतन्य महाप्रभू
Chaitanya Mahaprabhu Jayanti 2025: भारतात संस्कृती, पंरपरा यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. भारतात अनेक पंथीय अगदी आनंदाने नांदतात. भारताला थोर संतांची, महतांची परंपरा आहे. यातील एक आदराचे नाव म्हणजे चैतन्य महाप्रभू. चैतन्य महाप्रभूंचा जन्म पश्चिम बंगालमधील नवद्वीप धाम (नादिया) या गावी फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच १८ फेब्रुवारी १४८६ रोजी झाला. चैतन्य महाप्रभू यांच्या जन्माविषयीची माहिती चैतन्य चरितामृत या ग्रंथात आढळून येते. यंदा २०२५ रोजी १४ मार्च रोजी चैतन्य महाप्रभू यांची जयंती आहे. चैतन्य महाप्रभू यांच्या चरित्राचा घेतलेला थोडक्यात आढावा.
चैतन्य यांना लहानपणी निमाई नावाने ओळखले जायचे. गौर वर्णामुळे त्यांना गौरांग, गौर हरि, गौर सुंदर अशा अनेक नावांनी त्यांना संबोधले जायचे. चैतन्य महाप्रभूंनी गायन-भजनाच्या नव्या शैली प्रसूत केल्या. राजकीय अस्थिरतेच्या काळात हिंदू-मुस्लिम एकता, जातपात, उच्च-नीचतेची भावना दूर सारण्याची प्रेरणा चैतन्य महाप्रभूंनी समाजाला दिली. चैतन्य महाप्रभूंवर अनेक ग्रंथ लिहिले गेले. यामध्ये कृष्णदास कविराज गोस्वामी विरचित चैतन्य चरितामृत, वृंदावनदास ठाकूर विरचित चैतन्य भागवत व लोचनदास ठाकुरांचा चैतन्य मंगल या ग्रंथांचा प्रामुख्याने समावेश होतो.
लुप्तप्राय झालेले वृंदावन पुन्हा वसवले
गौरांग नसते, तर वृंदावन एक मिथकच बनून राहिले असते, असे सांगितले जाते. लुप्तप्राय झालेले वृंदावन चैतन्य महाप्रभू यांनी पुन्हा वसवले. जीवनातील अंतिम काळ त्यांनी वृंदावनातच घालवला. चैतन्य स्वामींच्या नामसंकीर्तनाचा व्यापक व सकारात्मक प्रभाव आजही पाश्चात्य जगतावर असल्याचे दिसून येते. वैष्णव सांप्रदायिक त्यांना कृष्ण व राधा यांचा संयुक्त अवतार मानतात. चैतन्य यांनी नीलाचल येथे जाऊन जगन्नाथांच्या भक्ती आणि उपासना केली. वयाच्या २४ व्या वर्षी गृहस्थाश्रम सोडून केशव भारतींकडून त्यांनी संन्यासदीक्षा घेतली.
सात वैष्णव मंदिरांची चैतन्य यांनी वृंदावनमध्ये स्थापना
संन्यास घेतल्यानंतर ‘श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू’असे नाव त्यांनी धारण केले व याच नावाने ते प्रख्यात झाले. गोविंददेव मंदिर, गोपीनाथ मंदिर, मदन मोहन मंदिर, राधा रमण मंदिर, राधा दामोदर मंदिर, राधा श्यामसुंदर मंदिर आणि गोकुलानंद मंदिर, अशा सात वैष्णव मंदिरांची चैतन्य यांनी वृंदावनमध्ये स्थापना केली. या मंदिरांना 'सप्तदेवालय', असेही म्हटले जाते.
कृष्ण दर्शनाची आत्यंतिक आस अन् भगवंतांचा साक्षात्कार
ईश्वरपुरींची भेट चैतन्यांच्या जीवनातील महत्त्वाची घटना मानली जाते. ईश्वरपुरींनी त्यांना ‘गोपी जनवल्लभाय नमः’ हा दशाक्षरी मंत्र देऊन अनुग्रहित केले. ते निरंतर श्रीहरीचे ध्यान व स्मरण करीत असत. ‘माझा कृष्ण मला भेटवा’, असे म्हणत ते हिंडू लागले. कृष्ण दर्शनाची त्यांना आत्यंतिक आस लागली होती. नामसंकीर्तन करीत ते घरात बसून असत. हळूहळू त्यांचा शिष्यसंप्रदाय वाढू लागला. चैतन्यांच्या या संकीर्तनाला खूपच गर्दी लोटू लागल्याने चैतन्य आणखी काही मंडळींसह आपला शिष्य श्रीवास पंडित यांच्या घरी रात्री संकीर्तन करू लागले. हळूहळू त्यांना माधवाचार्य, शुक्लांबर, पुंडरीक, हरिदास, नित्यानंद ही मंडळीही मिळाली व त्यांचे शिष्य बनली. चैतन्यांना भगवंताचा साक्षात्कार झाला आणि ते परमेश्वरावतार समजले जाऊ लागले. चैतन्य महाप्रभूंचा विलक्षण प्रभाव बंगाल आणि लगतच्या प्रदेशावर पडला.
हरिनामसंकीर्तनाचा प्रसार, भक्तिमार्गाची समाजात रुजवण
भागवत भक्तीचा प्रचार व प्रसार महाराष्ट्रासह अन्य प्रांतांत चैतन्यांच्या पूर्वीच झालेला होता. चैतन्य महाप्रभूंनी ब्रह्मज्ञानापेक्षा भागवत भक्तीचे सामर्थ्य लक्षात घेऊन तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्यापेक्षा सहजसुलभ असा भक्तिमार्ग समाजाच्या तळागाळापर्यंत रुजवला. हरिनामसंकीर्तनाचा प्रसार सुरू केला. कृष्णाला आपले उपास्य दैवत समजून शुद्ध, निर्मळ आणि पवित्र आचरणाने व अढळ श्रद्धेने त्यांनी केवळ बंगाल-ओडिसात नव्हे, तर मथुरा-काशीपर्यंत ‘हरिनामा’चे माहात्म्य प्रस्थापित केले. त्यांचे शिष्य कृष्णदास कविराज यांनी 'चैतन्य चरितामृत' हा ग्रंथ लिहून बंगाली काव्यरचनेस सुरुवात केली. वृंदावनदासाने 'चैतन्य भागवत' रचले. लोचनदास कवीने 'चैतन्य मंगलची' रचना केली. चैतन्य महाप्रभूंनी १४ जून १५३४ रोजी कृष्णनामात लीन होत समाधीस्त झाले.