Angarki Sankashti Chaturthi 2022: नववर्षाच्या पहिल्या संकष्टीला अंगारकी योग: चंद्रोदयाची वेळ काय? पाहा, शुभ मुहूर्त व महत्त्व
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 12:22 PM2022-04-18T12:22:32+5:302022-04-18T12:23:59+5:30
Angarki Sankashti Chaturthi 2022: अंगारक चतुर्थी व्रताचरणाने २० संकष्ट चतुर्थी, तर अंगारकीला केलेला उपवासाने १२ संकष्ट चतुर्थीचे पुण्य मिळते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥ कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाच्या पूजनाने होते. हाती घेतलेले कार्य निर्विघ्नपणे पार पडावे, यासाठी बाप्पाला प्रार्थना केली जाते. गणपती बाप्पाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक गणेश व्रते करतात. प्रत्येक मराठी महिन्यातील शुद्ध आणि वद्य पक्षात येणाऱ्या चतुर्थीला गणपती व्रत केले जाते. यातील वद्य पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी (Sankashti Chaturthi 2022) व्रत करण्याची प्राचीन परंपरा सुरू आहे. मंगळवारी संकष्ट चतुर्थी आली की, त्यावेळी अंगारक योग जुळून येतो, असे सांगितले जाते. हिंदू नववर्षाच्या पहिल्याच संकष्ट चतुर्थीला अंगारक योग (Angarki Sankashti Chaturthi 2022) जुळून आला आहे. हा अतिशय शुभ योग मानला गेला आहे. एप्रिल महिन्यातील चैत्र अंगारक संकष्ट चतुर्थीचा शुभ मुहूर्त, विविध शहरांमधील चंद्रोदय वेळा आणि व्रतपूजनाची सोपी पद्धत जाणून घ्या... (Chaitra Sankashti Chaturthi April 2022)
गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. संकष्ट चतुर्थी मंगळवारी आली की तिला ‘अंगारक चतुर्थी’ म्हणतात. संकष्ट चतुर्थीचे व्रत आपण दर महिन्यात करतो, परंतु अंगारक चतुर्थीचे महत्त्व अधिक असते कारण हा योग वारंवार येत नाही. विशेष म्हणजे हिंदू नववर्षातील पहिलीच संकष्टी अंगारकी संकष्टी असल्याने याचे महत्त्व वेगळे मानले गेले आहे. (Chaitra Angarki Sankashti Chaturthi April 2022 Date)
चैत्र अंगारक संकष्ट चतुर्थी: मंगळवार, १९ एप्रिल २०२२
चैत्र वद्य अंगारक चतुर्थी प्रारंभ: मंगळवार, १९ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजून ३९ मिनिटे.
चैत्र वद्य अंगारक चतुर्थी समाप्ती: बुधवार, २० एप्रिल २०२२ रोजी दुपारी ०१ वाजून ५३ मिनिटे.
भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची परंपरा आहे. संकष्ट चतुर्थी व्रत प्रदोष काळी केले जाते. तसेच यामध्ये चंद्रोदय आणि चंद्रदर्शन महत्त्वाचे असल्यामुळे आषाढ महिन्यातील अंगारक संकष्ट चतुर्थीचे व्रताचरण आणि पूजन मंगळवार, १९ एप्रिल २०२२ रोजी करावे, असे सांगितले जाते. प्रत्येक संकष्टीला गणेशभक्त आपापल्या परिने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत-पूजत असतात. अंगारक म्हणजे मंगळ. या दिवशी येणारी संकष्ट चतुर्थी ही विशेष पुण्यप्रद मानली जाते. याविषयीची कथा सर्वज्ञात आहे. अंगारकीचा उपवास केल्यानंतर बारा संकष्ट्या केल्याचे पुण्य मिळते, अशी काही भाविकांची समजूत आहे, तर अंगारक चतुर्थी ही वीस संकष्ट चतुर्थ्या केल्याचे पुण्य देते, असेही काहींचे मानणे आहे. म्हणूनच या दिवशी उपवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड असते.
असे करावे संकष्ट चतुर्थीचे व्रत
संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करते वेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे. यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप, दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा. (Chaitra Angarki Sankashti Chaturthi April 2022 Chandrodaya Timing)
विविध शहरांतील चंद्रोदय वेळ
शहरांची नावे | चंद्रोदयाची वेळ |
मुंबई | रात्रौ ०९ वाजून ४५ मिनिटे |
ठाणे | रात्रौ ०९ वाजून ४५ मिनिटे |
पुणे | रात्रौ ०९ वाजून ४० मिनिटे |
रत्नागिरी | रात्रौ ०९ वाजून ३९ मिनिटे |
कोल्हापूर | रात्रौ ०९ वाजून ३५ मिनिटे |
सातारा | रात्रौ ०९ वाजून ३७ मिनिटे |
नाशिक | रात्रौ ०९ वाजून ४३ मिनिटे |
अहमदनगर | रात्रौ ०९ वाजून ३७ मिनिटे |
धुळे | रात्रौ ०९ वाजून ४१ मिनिटे |
जळगाव | रात्रौ ०९ वाजून ३८ मिनिटे |
वर्धा | रात्रौ ०९ वाजून २४ मिनिटे |
यवतमाळ | रात्रौ ०९ वाजून २६ मिनिटे |
बीड | रात्रौ ०९ वाजून ३३ मिनिटे |
सांगली | रात्रौ ०९ वाजून ३४ मिनिटे |
सावंतवाडी | रात्रौ ०९ वाजून ३५ मिनिटे |
सोलापूर | रात्रौ ०९ वाजून २९ मिनिटे |
नागपूर | रात्रौ ०९ वाजून २३ मिनिटे |
अमरावती | रात्रौ ०९ वाजून २८ मिनिटे |
अकोला | रात्रौ ०९ वाजून ३१ मिनिटे |
औरंगाबाद | रात्रौ ०९ वाजून ३६ मिनिटे |
भुसावळ | रात्रौ ०९ वाजता ३७ मिनिटे |
परभणी | रात्रौ ०९ वाजून २९ मिनिटे |
नांदेड | रात्रौ ०९ वाजून २६ मिनिटे |
उस्मानाबाद | रात्रौ ०९ वाजून ३० मिनिटे |
भंडारा | रात्रौ ०९ वाजून २१ मिनिटे |
चंद्रपूर | रात्रौ ०९ वाजून २० मिनिटे |
बुलढाणा | रात्रौ ०९ वाजून ३४ मिनिटे |
मालवण | रात्रौ ०९ वाजून ३७ मिनिटे |
पणजी | रात्रौ ०९ वाजून ३४ मिनिटे |
बेळगाव | रात्रौ ०९ वाजून ३२ मिनिटे |
इंदौर | रात्रौ ०९ वाजून ४० मिनिटे |
ग्वाल्हेर | रात्रौ ०९ वाजून ३८ मिनिटे |