नववर्षातील पहिल्या विनायक चतुर्थीला अंगारक योग: ‘असे’ करा व्रत; पाहा, महात्म्य अन् मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 14:12 IST2025-03-31T14:06:16+5:302025-03-31T14:12:08+5:30
Chaitra Angarki Vinayaka Chaturthi April 2025: नववर्षाच्या पहिल्याच चैत्र महिन्यातील विनायक चतुर्थीला अंगारक योग जुळून आला आहे. अंगारक योग म्हणजे काय? व्रतपूजन कसे करावे? सविस्तर जाणून घ्या...

नववर्षातील पहिल्या विनायक चतुर्थीला अंगारक योग: ‘असे’ करा व्रत; पाहा, महात्म्य अन् मान्यता
Chaitra Angarki Vinayaka Chaturthi April 2025: ३० मार्च २०२५ पासून हिंदू नववर्षाला सुरुवात झाली. गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यात आला. यानंतर चैत्र शुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थी आहे. विशेष म्हणजे नववर्षातील पहिल्याच विनायक चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे. विनायक चतुर्थीला अंगारक योग जुळून येणे अतिशय शुभ, पुण्याचे मानले गेले असून, यामुळे या दिवसाचे महत्त्व अनेक पटींनी वाढले आहे. ०१ एप्रिल २०२५ रोजी चैत्र शुद्ध चतुर्थी म्हणजेच विनायक चतुर्थी अंगारक योग आहे. अंगारक योग म्हणजे काय? विनायक चतुर्थीला अंगारक योगात व्रत पूजन कसे करावे? शुभ मुहूर्त, महात्म्य, महत्त्व आणि काही मान्यता जाणून घेऊया...
प्रत्येक मासाच्या शुद्ध चतुर्थीला ‘विनायक चतुर्थी’ असे म्हटले जाते. विनायक चतुर्थी ही माध्यान्हव्यापिनी असावी लागते. अर्थात त्यात सूर्यदर्शनाला महत्त्व असते. प्रत्येक मासाच्या शुद्ध आणि वद्य चतुर्थीला गणेश व्रत सांगितले आहे. मासातून दोन चतुर्थ्या म्हणजे वर्षाच्या चोवीस चतुर्थ्या झाल्या. गणेशाचे हे चोवीस अवतार विविध ग्रंथांमध्ये नमूद आहेत, असे म्हटले जाते. गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत! गणपती बुद्धीची देवता आहे. गणपती ही वैश्विक देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. गणपती शाश्वत भक्ती लाभण्यासाठी, कृपा होण्यासाठी प्रत्येक महिन्यातील शुद्ध चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थीचे व्रत केले जाते.
चैत्र महिन्यातील विनायक चतुर्थीला अंगारक योग
गणपतीचे विनायक नाव हे प्राचीनच आहे. विनायक म्हणजे विशिष्ट शासन करणारा नायक. गणपती समरांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोड-धोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे. अंगारकी विनायक चतुर्थी हा योग वारंवार येत नाही. विनायक चतुर्थी मंगळवारी आली की तिला ‘अंगारक योग’ असलेली चतुर्थी मानतात. अंगारक म्हणजे मंगळ. विनायक चतुर्थी पुण्यप्रद मानली गेली आहे. मंगळवारी येणाऱ्या अंगारक विनायक चतुर्थीला गणपतीचे विशेष पूजन करावे, असे सांगितले जाते.
चैत्र शुद्ध विनायक चतुर्थी अंगारक योग: ०१ एप्रिल २०२५
चैत्र शुद्ध चतुर्थी प्रारंभ: मंगळवार, ०१ एप्रिल २०२५ रोजी पहाटे ०५ वाजून ४२ मिनिचे.
चैत्र शुद्ध चतुर्थी समाप्ती: मंगळवार, ०१ एप्रिल २०२५ रोजी मध्यरात्री ०२ वाजून ३२ मिनिटे.
अंगारक योग म्हणजे काय? महत्त्व अन् पौराणिक कथा
मंगळवारी चतुर्थी आली की, अंगारक योग जुळून येतो. याबाबत मुद्गल पुराणात तसेच गणेश पुराणात संदर्भ आढळून येतात, असे सांगितले जाते. अंगारक म्हणजे मंगळ ग्रह, जो निखाऱ्यासारखा लालभडक दिसतो. त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेशमंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली. त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला, की 'माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती, म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल! अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरदविनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत केले जाते. वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळते, शिवाय मंगळ ग्रहाची आणि खुद्द गणरायाची आपल्यावर कृपादृष्टी होते अशी भाविकांची श्रद्धा आहे.
विनायक चतुर्थी अंगारक योग व्रतपूजन कसे करावे?
अंगारक विनायक चतुर्थीला सकाळी लवकर उठून स्नान करावे. दिवसभर उपवास करावा. गणेश पूजनाचा संकल्प करावा. एका चौरंगावर गणपतीची मूर्ती स्थापन करावी. गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. यानंतर फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. गणपतीला लाडू, मोदक यांचा नैवेद्य दाखवल्यास उत्तम. गणपतीची आरती करून मनोभावे नमस्कार करावा. शक्य असेल तर आवर्जून गणपती मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घ्यावे. तसेच आपापले कुळधर्म, कुळाचार, परंपरा याप्रमाणे विधी करावेत. संकष्ट चतुर्थीला आपण दिवसभर उपास करून रात्री चंद्रोदय झाल्यावर चंद्रदर्शन घेऊन उपास सोडतो, परंतु विनायक चतुर्थीचे व्रत एकादशी व्रताप्रमाणे दोन्ही वेळेस उपास करून दुसऱ्या दिवशी सोडावे, असे शास्त्रात म्हटले आहे.
एक दुर्वा, जास्वंदाचे फूल आणि गोडाचा नैवेद्य अवश्य दाखवा
अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही अथवा संकट आल्यास त्याचे निवारण होते, अशी मान्यता आहे. गणेशाने मंगळाला वर दिला आणि तुझ्या नावाची ही चतुर्थी लोकांचे कल्याण करणारी होईल असा वर दिला. तेव्हापासून अंगारकी चतुर्थी या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असे मानले जाते. धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात मनात असूनही अंगारकी संकष्टी चतुर्थीला गणपती पूजन करणे शक्य झाले नाही, तर एक दुर्वा अवश्य अर्पण करावी. या दिवशी २१ दुर्वांची जोडी अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख-समृद्धी आणि बुद्धीप्रदान करतात, असे सांगितले जाते. मनोभावे गणपती बाप्पाचे स्मरण, नामस्मरण करावे. असे केल्याने पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होऊ शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. गणपतीला प्रिय असलेली जास्वंदीची फुले अवश्य वाहावीत. तसेच गणपतीला आवडणाऱ्या लाडू, मोदक किंवा गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. असे केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होऊन शुभाशिर्वाद देतो, असे म्हटले जाते.
|| गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ||