Chaitra Navratra 2022 : हिंदू नवं वर्षांची सुरुवात करून देणारा चैत्र मास एवढा वैशिष्ट्यपूर्ण का? चला करून घेऊ त्याची तोंडओळख!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 17:55 IST2022-04-02T17:54:45+5:302022-04-02T17:55:13+5:30
Chaitra Navratra 2022 : नवं वर्षांची मंगलमयी सुरुवात करून देणारा चैत्र मास अनेकार्थाने महत्त्वपूर्ण आहे. त्यात कोणकोणत्या गमतीजमती दडलेल्या आहेत त्या जाणून घ्या.

Chaitra Navratra 2022 : हिंदू नवं वर्षांची सुरुवात करून देणारा चैत्र मास एवढा वैशिष्ट्यपूर्ण का? चला करून घेऊ त्याची तोंडओळख!
चांद्र वर्षाचा हा पहिला महिना. या मासाच्या पौर्णिमेला अथवा तिच्या आधी किंवा नंतर चित्रा नक्षत्र असल्याने या मासाला `चैत्र' या नावाने ओळखले जाते. सूर्याचे उत्तरायण याच मासात असते.
चैत्र मास हा भारतवर्षात वसंत ऋतूचा प्रारंभ असतो. आधीच्या शिशिर ऋतूत सर्व झाडांची पानगळ झालेली असते. वसंतात ह्या निष्पर्ण झाडांना नवीन पालवी फुटते . या पालवीला आपण चैत्रपालवी म्हणतो. सर्व ऋतूंमधील उत्तम ऋतू म्हणजे वसंत ऋतू! माघातच वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल लागत असली, तरीही चैत्र वैशाख हे दोन मास वसंत ऋतूचे मानले जातात. त्यामुळे शतपथ ब्राह्मणात वसंत ऋतूला संवत्सराचे द्वार म्हणून गौरवले आहे. गीतेत श्रीकृष्णांनी ऋतूंमध्ये मी वसंत ऋतू आहे असे म्हटले आहे.
या काळात विविध औषधी गुणयुक्त वनस्पती, वृक्ष, वेली तसेच अनेक तऱ्हेची फळे-फुले येऊ लागतात. त्यामुळे आनंदलेले कोकीळ पक्षी मोकळ्या गळ्याने गाऊ लागतात. या आल्हाददायक वातावरणामुळे सर्वत्र प्रसन्नतेचे, आनंदाचे राज्य असते. आता ऋतूमान थोडे बदलल्यामुे ग्रीष्माची चाहूल जरा आधीच लागते. परिणामी उन्हाळा, उकाडा जाणवतो. तरीही वसंत ऋतू हा आनंददायक असतो म्हणूनच कवि त्याला ऋतूराज असे गौरवतात. या वसंत ऋतूचे दोन मास चैत्र आणि वैशाख. या दोन्ही मासांना मधु माधव अशी गोड नावे आहेत.
वर्षारंभाचा महिना म्हणजे आनंदाला उधाण! त्यात चैत्र नवरात्र! चैत्र गौरीची महिनाभर पूजा केली जाते. तिला झोपाळ्यावर झुलवले जाते. चैत्र नवमीला रामाला पाळण्यात घालून रामजन्मोत्सव केला जातो.
या मासात पौर्णिमेला छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले स्वर्गारोहण, चैत्र कृष्ण द्वितीयेला समर्थ संप्रदायातील गेल्या शतकातील थोर संत प.पू.भगवान श्रीधरस्वामी यांनी घेतलेली समाधी, पूज्य अक्कलकोट स्वामींची जयंती आणि पुण्यतिथी, संत गोरोबाकाकांची पुण्यतिथी, रामजन्म, हनुमानजन्म अशा अनेक जयंत्या आणि पुण्यतिथ्यांमुळे या मासाला अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे.
या मासात चैत्र गौरीचे हळद कुंकू करून सर्व सुवासिनींचे आदरातिथ्य केले जाते. गौरीला आंब्याची वाटली डाळ आणि कैरीचे पन्हे यांचा नैवेद्य दाखवून तो प्रसाद सर्वांना वाटला जातो. गप्पा, गाणी, सहभोजनाचे कार्यक्रम रंगतात आणि रांगोळीचे चैत्रांगण काढून ६४ शुभचिन्हांचा गौरव केला जातो.
असे हे संस्कृतीपूजन चैत्राच्या निमित्ताने घडते आणि नववर्षाची मंगलमयी सुरुवात केली जाते.