Chaitra Navratri 2021 Date: कधीपासून होतोय चैत्र नवरात्रारंभ? 'या' वाहनावरून होणार देवीचे आगमन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 07:05 PM2021-04-07T19:05:05+5:302021-04-07T19:05:42+5:30
Chaitra Navratri 2021 Date: सन २०२१ मधील पहिले नवरात्र कधीपासून सुरू होणार आहे? चैत्र नवरात्राचा शुभ मुहूर्त कोणता? यंदा देवीचे आगमन कोणत्या वाहनावरून होणार आहे? जाणून घेऊया...
अवघ्या काही दिवसांनी मराठी नवीन वर्षाचा आरंभ होणार आहे. यंदाचे मराठी वर्षाचे शालिवाहन शके १९४३ असून, प्लवसंवत्सरारंभ होणार आहे. वास्तविक पाहता मराठी वर्षात चार नवरात्र साजरी केली जातात. यातील पहिले नवरात्र मराठी वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच चैत्र महिन्यात साजरे केले जाते. मराठी वर्षात येणाऱ्या दोन नवरात्रांना सर्वाधिक महत्त्व असल्याचे मानले जाते. पहिले चैत्र महिन्यातील चैत्री नवरात्र आणि दुसरे अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्र. सन २०२१ मधील पहिले नवरात्र कधीपासून सुरू होणार आहे? चैत्र नवरात्राचा शुभ मुहूर्त कोणता? यंदा देवीचे आगमन कोणत्या वाहनावरून होणार आहे? जाणून घेऊया... (Chaitra Navratri 2021 Date and Time)
चैत्र नवरात्रारंभ: १३ एप्रिल २०२१
चैत्र प्रतिपदा प्रारंभ: १२ एप्रिल २०२१ रोजी सकाळी ८ वाजून ०१ मिनिट.
चैत्र प्रतिपदा समाप्ती: १३ एप्रिल २०२१ रोजी सकाळी १० वाजून १६ मिनिटे.
चैत्र नवरात्र समाप्ती: २१ एप्रिल २०२१
भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे चैत्र नवरात्रारंभ १३ एप्रिल २०२१ रोजी होईल, असे सांगितले जात आहे. ज्योतिषशास्त्र आणि देवी भागवत पुराणानुसार, दुर्गा देवीचे आगमन भविष्यातील घटनांविषयीचे संकेत देत असते, असे सांगितले जाते. (Chaitra Navratri 2021 Durga Devi Vahan)
Gudi Padwa 2021 : गोड वर्षाची कडू सुरुवात कडुलिंबाने का करतात, याचे धार्मिक आणि शास्त्रीयदृष्ट्या महत्त्व!
चैत्री नवरात्र २०२१ मधील देवीचे वाहन
देवी भागवत पुराणात देवीचे आगमन कोणत्या वाहनावरून होते, याबाबत भाष्य केलेले आढळून येते. 'शशि सूर्य गजरुढा शनिभौमै तुरंगमे। गुरौशुक्रेच दोलायां बुधे नौकाप्रकीर्तिता॥' या श्लोकानुसार, आठवड्यातील सात दिवसांत देवीचे आगमन कोणत्या वाहनावरून होणार हे सांगितले गेले आहे. म्हणजेच आठवड्यातील दिवसांनुसार वेगवेगळ्या वाहनांवरून देवीचे आगमन होत असते.
अश्वारूढ देवीचे आगमन
नवरात्रारंभ रविवार किंवा सोमवार होत असेल, तर देवीचे वाहन हत्ती असते. गुरुवार किंवा शुक्रवार या दिवशी नवरात्रारंभ असेल, तर देवी डोली, पालखीतून येते. बुधवार असेल, तर देवीचे आगमन नौकारूढ होते. शनिवार आणि मंगळवारी नवरात्रारंभ होणार असेल, तर देवीचे आगमन अश्वारुढ होते. यंदा सन २०२१ मध्ये चैत्र नवरात्रारंभ मंगळवारी होत आहे. म्हणजेच यावर्षी देवीचे आगमन अश्वारूढ होईल, असे सांगितले जात आहे. विशेष बाब म्हणजे गतवर्षीच्या शारदीय नवरात्रातही देवीचे आगमन अश्वारूढ झाले होते.