Chaitra Navratri 2023: कुळधर्म, कुळाचाराचे पालन का केले पाहिजे? हे जाणून घ्या खुद्द तुकोबा रायांच्या वाणीतून!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 07:50 AM2023-03-24T07:50:00+5:302023-03-24T07:50:00+5:30

Chaitra Navratri 2023:अलीकडच्या काळात आपण नित्य देवपूजेत कुचराई करतो, तिथे कुलधर्म कुलाचार दूरच; याबाबतीत तुकोबारायांनी काय सांगितले आहे बघा... 

Chaitra Navratri 2023:Why should Kuladharma, Kulachara be followed? Find out from the theory of Tukaram maharaj himself! | Chaitra Navratri 2023: कुळधर्म, कुळाचाराचे पालन का केले पाहिजे? हे जाणून घ्या खुद्द तुकोबा रायांच्या वाणीतून!

Chaitra Navratri 2023: कुळधर्म, कुळाचाराचे पालन का केले पाहिजे? हे जाणून घ्या खुद्द तुकोबा रायांच्या वाणीतून!

googlenewsNext

आपल्या कुळातील आचारानचे आचरण करा व शास्त्रांनी जी कर्मे करावी व कोणते करू नये, असे सांगितले आहे त्यालाच कुळधर्म आणि कुळाचार म्हटले आहे. या नियमांच्या चौकटीत राहून वागले असता, हातून चुका घडण्याची भीती राहत नाही. सध्या चैत्र नवरात्र देखील सुरु आहे.  याबद्दल अधिक स्पष्टीकरण देताना संतश्रेष्ठ तुकाराम महाराज लिहीतात, 

कुळधर्म ज्ञान कुळधर्म साधन, कुळधर्म निधान हाती चढे।
कुळधर्म भक्ति कुळधर्म गति, कुळधर्म विश्रांती पाववील।
कुळधर्म दया कुळधर्म उपकार, कुळधर्म सार साधनांचे।
कुळधर्म महत्त्व कुळधर्म मान, कुळधर्म पावन परलोकीचे।
तुका म्हणे कुळधर्म दावी देवी देव, यथाविध भाव जरी होय।

जो आपल्या कुळातील धर्माचे पालन करतो त्याला ज्ञान प्राप्त होते. त्याच्याकडून साधना होते. त्याच्या कुळधर्मांमुळे त्याच्या हाती ज्ञानाचे निधान म्हणजे परमेश्वर येतो. ज्याच्या ठिकाणी कुळधर्माचे आचरण आहे, त्याच्याकडून भक्ती होते. त्याला त्यामुळे उत्तम गती मिळते आणि तो विश्रांतीला पोहोचतो. जो कुळातील धर्म पाळतो व दुसऱ्यांवर दया करून उपकार करतो, त्याचा तो कुळधर्म साधनांचे सार आहे. कुळधर्म त्याला महत्त्व व मान प्राप्त करून देतो आणि परलोकी पावन करतो. तुकाराम महाराज म्हणतात, जर त्याच्या ठिकाणी शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे कुळधर्म करण्याचा भाव असेल, तर तो कुळधर्म त्याला देव देवतांचे दर्शन घडवतो.

संत शिरोमणी तुकाराम महाराज यांनी कुळधर्म विषयावर आपल्या या अभंगात त्या व्यक्तीची उन्नती या लोकी आणि परलोकीही कशी होऊ शकते, हे सांगितले आहेच. पण केवळ त्याची यातून होणारी अशी उन्नती सांगून महाराज थांबले नाहीत, तर कुळधर्म पाळणारी व्यक्ती ही दयाळू आणि इतरांवर उपकार करणारी बनते असेही सांगतात. म्हणजे महाराजांनी कुळधर्माची सांगड समाजाबाबतच्या कर्तव्याशी घातलेली आहे.

ज्ञानाइतकी पवित्र अन्य गोष्ट या विश्वात कोणतीही नाही. अन त्या ज्ञानाचे निधान म्हणजे परमेश्वर त्याची प्राप्ती या कुळधर्म पालनातून होऊ शकते. देव देवीचे दर्शन घडवण्याचे सामर्थ्य कुळधर्म पालनात आहे, असे महाराजांनी ठासून सांगितले आहे. 

Web Title: Chaitra Navratri 2023:Why should Kuladharma, Kulachara be followed? Find out from the theory of Tukaram maharaj himself!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.