पंचग्रही योगात नववर्षाचे पहिले पंचक: ५ दिवस प्रतिकूल, अशुभ; ५ कामे टाळा, नेमके काय करू नये?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 13:16 IST2025-04-20T13:11:48+5:302025-04-20T13:16:45+5:30
Chaitra Panchak April 2025 What Do You Mean By Panchak In Marathi : पंचक म्हणजे नेमके काय? नववर्षातील पहिले पंचक कधी आहे? पंचक काळात काय टाळावे? जाणून घ्या...

पंचग्रही योगात नववर्षाचे पहिले पंचक: ५ दिवस प्रतिकूल, अशुभ; ५ कामे टाळा, नेमके काय करू नये?
What Do You Mean By Panchak In Marathi: हिंदू नववर्ष सुरू झाले असून, पहिला चैत्र महिना सुरू आहे. काही दिवसांनी चैत्र महिन्यांची सांगता होऊन वैशाख महिना सुरू होणार आहे. अनेकार्थाने चैत्र महिना अतिशय शुभ आणि वैशिष्ट्यपूर्ण मानला गेला आहे. चैत्र महिन्यात नववर्षातील पहिले नवरात्र साजरे केले जाते. यासह अनेक सण-उत्सव, व्रत-वैकल्ये अगदी उत्साहात साजरी केली जातात. या चैत्र महिन्यात अद्भूत दुर्मिळ आणि अनेक शुभ योग जुळून आले. परंतु, महिन्याच्या शेवटी एक प्रतिकूल मानला गेलेला पंचक योग जुळून आला आहे. पंचक काळ शुभ मानला जात नाही. पंचक म्हणजे काय? नेमकी कोणती कामे किंवा गोष्टी या काळात करू नये? जाणून घेऊया...
ज्योतिषशास्त्रानुसार, मीन राशीत पंचग्रही योग जुळून आलेला आहे. मीन राशीत शनि, बुध, शुक्र, राहु आणि नेपच्युन ग्रह आहेत. मीन ही शुक्र ग्रहाची उच्च रास मानली जाते. तर, सूर्य मेष राशीत असून, मेष रास सूर्याची उच्च रास मानली जाते. तर, वृषभ राशीत गुरू व हर्षल आहेत. मंगळ कर्क राशीत आहे. केतु कन्या राशीत आहे. प्लूटो मकर राशीत आहे. या ग्रहस्थितीत नववर्षातील पहिले पंचक लागणार आहे. (Chaitra Panchak April 2025 Date And Time)
पंचक म्हणजे काय?
पाच नक्षत्रांच्या विशिष्ट कालावधीला पंचक म्हटले जाते. चंद्राचे धनिष्ठा नक्षत्राचे तृतीय चरण आणि शततारका, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा, रेवती या नक्षत्रांमधील भ्रमण कालावधीला पंचक मानले जाते. काही मान्यतांनुसार, या काळात केलेल्या अशुभ कार्यांचा पाचपट प्रभाव पडत असतो. खगोल विज्ञानाच्या दृष्टिकोनातून ३६० अंशाच्या भचक्रात पृथ्वीच्या ३०० डिग्री ते ३६० डिग्री मध्य भ्रमणाच्या कालावधीला पंचक मानले जाते. पंचक कालावधीत चंद्राचा पृथ्वीवर सर्वाधिक प्रभाव असल्याचे मानले जाते.
हिंदू नववर्ष चैत्र महिन्यात कोणते पंचक लागणार आहे?
सप्ताहातील वारानुसार पंचकाला नाव देण्यात आलेले आहे. प्रत्येक पंचकाचे स्वतःचे महत्त्व असते. कोणत्या दिवशी पंचक लागणार, त्यानुसार पंचक नाव असते. म्हणजेच रविवारपासून सुरू होणारे पंचक रोग पंचक, सोमवारपासून सुरू होणाऱ्या पंचक राज पंचक, मंगळवारी अग्नि पंचक, शनिवारी मृत्यु पंचक आणि शुक्रवारी चोर पंचक लागते. चैत्र महिन्यातील पंचक मंगळवारी सुरू होत असल्यामुळे हे पंचक अग्नि पंचक म्हणून ओळखले जाईल. मंगळवार, २२ एप्रिल २०२५ रोजी उत्तर रात्री १२.३१ पासून पंचक सुरू होत आहे. बुधवार, गुरुवार, शुक्रवार पंचक असून, शनिवार, २६ एप्रिल २०२५ रोजी उत्तर रात्री ३.३९ पर्यंत पंचक राहणार आहे.
पंचक काळातील मृत्यू मानतात अशुभ
पंचक लागण्याची वेळ, मुहूर्त शास्त्रात अत्यंत महत्त्वपूर्ण मानला गेला आहे. पंचक कालावधीत शक्यतो शुभ कार्य केले जात नाही. पंचक कालावधी हा अमंगलाचे सूचक मानला गेला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, पंचक काळात कोणाचा मृत्यू झाला असेल, तर ते अशुभ मानले जाते. पंचक काळात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्यासह लगतच्या कालावधीत कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू होण्याची शक्यता असते, असा दावा शास्त्रात केल्याचे पाहायला मिळते.
पंचक काळात काय टाळावे? काय करू नये?
- ज्योतिषानुसार, सप्ताहातील प्रत्येक दिवशी लागणाऱ्या पंचकाचा प्रभाव हा भिन्न असतो. पंचक कोणत्या दिवशी लागते, यावर त्याचा प्रभाव कसा आणि किती असेल हे अवलंबून असल्याचे सांगितले जाते.
- पंचक कालावधीत जुळून येणाऱ्या शुभ योगांवर केलेल्या काही कार्यांचा सकारात्मक परिणाम प्राप्त होऊ शकतो. काहीवेळा धनलाभाचे योगही प्रबळ होऊ शकतात. याशिवाय वाहन खरेदी, गृह प्रवेश, शांती पूजन, मालमत्तेशी संबंधित स्थिर कार्ये करणे पंच कालावधीत शुभ मानली गेली आहेत.
- पंचक सर्व कार्यांसाठी अशुभ नसते, तर काही कार्यांसाठी पंचक अत्यंत शुभ मानले जाते. या कालावधीत यात्रा करणे, मुंडन कार्य, व्यापार आदी कार्यांसाठी पंचक शुभ मानले गेले आहे. तसेच साखरपुडा समारोह, विवाह आदी शुभ कार्ये पंचक कालावधीत केली जाऊ शकतात.
- पंचक कालावधीत काही कार्ये करणे निषिद्ध मानले गेले आहे. पंचक कालावधीत लाकडाची खरेदी करू नये. घराच्या छताच्या दुरुस्तीचे किंवा नवीन बांधकाम करू नये. पंचक काळात दक्षिण दिशेकडे प्रवास करणे वर्जित मानले गेले आहे. कोणात्याही प्रकारच्या इंधनाचे भंडारण करू नये, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
- अग्नि पंचक काळात शुभ कार्य करू नये, असे सांगितले जाते.
- मुहूर्त-चिंतामणीनुसार, पंचक दरम्यान दक्षिणेकडे प्रवास करू नये. परंतु, प्रवास करणे अत्यावश्यकच असेल, तर हनुमंतांचे पूजन करावे, नामस्मरण, मंत्रांचे जप करावे आणि प्रवासाला निघावे, असा एक उपाय काही जणांकडून सांगितला जातो.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.