Chaitra Pournima 2022:लक्ष्मी मातेचा सिद्धहस्त प्राप्त व्हावा म्हणून चैत्र पौर्णिमेला करा 'हे' विशेष उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 02:55 PM2022-04-13T14:55:25+5:302022-04-13T14:55:52+5:30
Chaitra Pournima 2022: तसेच वैवाहिक जीवनातील गोडवा वाढण्यासाठी चैत्र पौर्णिमेला करा दिलेला खास उपाय...
हनुमान जयंतीच्या सोहळ्यामुळे चैत्र पौर्णिमेचे विशेष महत्त्व आहेच, त्याबरोबरीने चंद्र पूजेचे आणि लक्ष्मी पूजेचे महत्त्वही शास्त्राने अधोरेखित केले आहे.
चैत्र पौर्णिमा ही हिंदू नवं वर्षातील पहिली पौर्णिमा, शिवाय ती रामभक्त हनुमंताची जन्मतिथी म्हणूनही ओळखली जाते. यंदा १६ एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमा येत आहे. असे मानले जाते की चैत्र पौर्णिमेच्या दिवशी काही विशेष उपाय केल्याने देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते आणि जीवनात आर्थिक स्थिती मजबूत होते. अशा स्थितीत पौर्णिमेच्या दिवशीही हे उपाय करू शकता.
चैत्र पौर्णिमेच्या दिवशी काय करणे शुभ आहे ते वाचा :
पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी गोसेवा करा. गायीला चारा खाऊ घाला, गोशाळेत जाऊन सेवा करा. तेथील कर्मचारी वर्गाला गोसेवेसाठी आर्थिक मदत करा. ते करून झाल्यावर गोमातेच्या पायाखालची माती एका कापडाच्या पुडीत गुंडाळून तिजोरीत ठेवा. त्यामुळे धनवृद्धी होईल.
चैत्र पौर्णिमेला चन्द्र दर्शन घेऊन दुधाचा किंवा खिरीचा नैवेद्य चंद्राला आणि लक्ष्मी मातेला दाखवा. ते दूध नैवेद्य म्हणून ग्रहण करा. त्यादिवशी श्रीसूक्त म्हटल्याचा फायदा होतो. तसेच श्रीसूक्त पठण किंवा श्रवण २१ दिवस सलग एकाच ठराविक वेळी केल्याने हळूहळू आर्थिक समस्या संपुष्टात येऊ लागतात.
शास्त्रानुसार पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीचे आगमन होते. देवीला, विष्णूंना पिंपळाचे झाड प्रिय आहे. त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी हनुमानाचे दर्शन घेऊन पिंपळवृक्षाचेही दर्शन घेऊन त्याला प्रदक्षिणा घालावी.
वैवाहिक जीवनात आनंदासाठी पौर्णिमा तिथी देखील विशेष मानली जाते. असे मानले जाते की पती-पत्नीने एकत्रितपणे चंद्राला अर्घ्य दिल्यास त्यांच्या वैवाहिक जीवनात गोडवा राहतो.