Champa Shashthi 2023: चंपाषष्ठीनिमित्त खंडेरायासाठी करा हा चविष्ट नैवेद्य आणि द्या अस्सल गावरान टच!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 10:34 AM2023-12-18T10:34:12+5:302023-12-18T10:34:56+5:30
Champa Shashthi 2023: आज चंपाषष्ठी आणि खंडेरायाची षडरात्र समाप्तीचा दिवस, त्यानिमित्त खंडोबाला कोणता नैवेद्य दाखवला जातो ते पहा आणि जरूर करा.
आज १८ डिसेंबर, मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी, तिलाच चंपाषष्ठी असे म्हणतात. आजच्या दिवशी मार्गशीर्ष प्रतिपदेपासून सुरु झालेले खंडोबाचे नवरात्र संपते. ही नवरात्र सहा दिवसांची असल्याने तिला षटरात्र असेही म्हणतात. आजच्या दिवशी खंडेरायाला निरोप देताना त्याच्या आवडीचा बेत आखला जातो, तो म्हणजे वांग्याचे भरीत आणि भाकरीचा. तसेच या नैवेद्याचा काही भाग खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्यांना त्यांची पूजा करून वाढतात. थंडीचे दिवस सुरू झाल्याने बाजारात छान भरताची वांगी उपलब्ध होऊ लागली आहेत. त्याचा नैवेद्य देवाला दाखवून त्याची कृपादृष्टी त्यात पडावी आणि त्याची लज्जत आणखी वाढावी, त्यात प्रसादत्व उतरावे म्हणून आज हा नैवेद्य आवर्जून करा. फूड ब्लॉगर वैदेही भावे यांच्या चकली. कॉमवर दिलेली रेसेपी जरूर करून बघा!
वांग्याचे भरीत
साहित्य:
१ मोठे वांगे (साधारण १ पौंड)
२ मध्यम कांदे, बारीक चिरून
१ मोठा टोमॅटो, बारीक चिरून
फोडणीसाठी:
२ टेस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, १/८ टीस्पून हिंग, १/४ टीस्पून हळद, १/४ टीस्पून लाल तिखट किंवा २ हिरव्या मिरच्या,
३ ते ४ मोठ्या लसूण पाकळ्या, बारीक चिरून
चवीपुरते मीठ
चिरलेली कोथिंबीर सजावटीसाठी
कृती:
१) वांगे भाजून घ्यावे.
२) वांगे गार होवू द्यावे. वांगे सोलून आतील गर बाजूला काढावा आणि सुरीने रफली चिरावे.
३) कढईत तेल गरम करावे. मोहोरी, हिंग, हळद, लाल तिखट घालून फोडणी करावी. त्यात चिरलेली लसूण घालून १०-१५ सेकंद परतावे.
४) कांदा घालून पारदर्शक होईस्तोवर परतावे. कांदा छान परतला गेला कि टोमॅटो घालून एकदम मऊ होईस्तोवर परतावे.
५) मीठ आणि सोललेले वांगे घालून व्यवस्थित मिक्स करावे. तळापासून परतावे म्हणजे तळाला वांगे चिकटून जाळणार नाही. कडेने तेल सुटेस्तोवर परत राहावे (साधारण ५ ते ८ मिनिटे)
गरम भरीत भाकरीबरोबर किंवा पोळीबरोबर सर्व्ह करावे.