सर्वसामान्यांचा कैवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 11:28 PM2020-07-24T23:28:26+5:302020-07-24T23:28:40+5:30
- स्नेहलता देशमुख पांडुरंगशास्त्री आठवले म्हणजे भगवद्गीतेतील विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणारे तसेच स्वाध्याय परिवारात दादाजी म्हणून ओळखले जाणारे व्यक्तिमत्त्व. अध्यात्म ...
- स्नेहलता देशमुख
पांडुरंगशास्त्री आठवले म्हणजे भगवद्गीतेतील विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणारे तसेच स्वाध्याय परिवारात दादाजी म्हणून ओळखले जाणारे व्यक्तिमत्त्व. अध्यात्म प्रत्येक क्षणाला जगणारे पांडुरंगशास्त्री म्हणजे विधायक कामांची पर्वणीच, असे त्यांचे कुसुमाग्रजांनी केलेले वर्णन सार्थ आहे. त्यांनी तत्त्वज्ञानाविषयी तोंडपाटीलकी न करता वृत्तीतून दाखवून दिले. मच्छिमारांच्या जीवनात क्रांतिकारी बदल घडविले.
अनेक गावे व्यसनमुक्त करण्यात ते यशस्वी झाले. त्यांची प्रेरणाच अशी की, कितीतरी गावांचं रूपांतर स्वाध्याय परिवारात झालं. एवढंच नव्हे तर भारतीय संस्कृती आणि तत्त्वज्ञान यांचा विशेष अभ्यास करण्यासाठी त्यांनी तत्त्वज्ञान विद्यापीठाची स्थापना केली. भक्ती व संस्कृती यांचा मिलाफ घडवला आणि शेतीशाळा स्थापन केल्या. त्यात तंत्रज्ञानाचाही वापर केला. या शाळेत प्रवेशास अट होती, मालकीची थोडीफार जमीन हवी. भगवद्गीतेतील विचार सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी दादांनी परिश्रमाची पराकाष्ठा केली. त्यांनी संस्कृतमध्ये प्रावीण्य मिळवले; शिवाय संपूर्ण शेक्सपिअरही वाचला.
विविध परिषदांमध्ये आपले विचार प्रभावीपणे ते मांडत. या असामान्य बुद्धिमत्ता लाभलेल्या दादांना अमेरिकेतून बोलावण्यात आले. वर्षाला एक लाख रुपये शिवाय सर्व सुखसोयी देऊ केल्या; पण दादांनी त्यांना कळविले की, मला माझ्या दु:खी, पीडित लोकांबरोबरच काम करायचे आहे. म्हणून आपला प्रस्ताव स्वीकारू शकत नाही. तत्कालीन उपराष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांनी त्यांची समजूत घालण्याची जबाबदारी घेतली. परंतु, दादांचे मन तत्त्वज्ञान विद्यापीठात गुंतले होते.
दादांनी डॉ. राधाकृष्णन यांच्या हस्ते विद्यापीठाचे उद्घाटन केले आणि ते डॉ. राधाकृष्णन यांना म्हणाले, कुणापुढेही पैशाची याचना न करता मी हे कार्य चालू ठेवणार आहे. कारण मी समाजाला साधन मानतो मी परमेश्वराला सर्वस्व मानतो. माझे कार्य निष्ठेने होणार असेल तर मला यश नक्कीच मिळेल. केवढा आत्मविश्वास होता कारण त्यांची प्रभूवर निष्ठा होती.