Chanakyaniti: आचार्य चाणक्य सांगतात की 'या' तीन गोष्टी कधीही कुणाला सांगू नका; नुकसान करून घ्याल!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 12:49 PM2024-03-11T12:49:37+5:302024-03-11T12:49:37+5:30
Chanakyaniti: शेअरिंग करण्याचे जसे फायदे असतात तसे तोटेही; त्यामुळे कोणत्या गोष्टी सांगू नये हे जाणून घ्या.
बोलून मन मोकळं होतं, हे जरी सत्य असले, तरी बऱ्याचदा बोलण्याच्या नादात आपण अतिरिक्त माहिती देत जातो. त्याची आवश्यकताही नसते. ऐकणारी व्यक्ती आपली हितचिंतक आहे की हितशत्रू याची खातरजमा न करता माहितीचे वाटप आपल्याच अंगाशी येऊ शकते. म्हणून चाणक्यांनी काय बोलावे, कुठे बोलावे आणि काय बोलू नये, याचे नियम सांगितले आहे. बोलताना हे भान ठेवले, तर भविष्यात अडचणी येणार नाहीत. चाणक्यनीती काय म्हणते ते पाहू...
अर्थनाश मनस्तापं गृहिण्याश्चरितानि च।
नीचं वाक्यं चापमानं मतिमान्न प्रकाशयेत॥
जेव्हा आर्थिक अडचणी येतात, मन अस्वस्थ असते, पत्नीचे विवाहबाह्य संबंध आहेत असे कळते, कोणाकडून तुमचा अपमान झालेला असतो, तेव्हा या गोष्टी स्वतः जवळ ठेवा. थोडा काळ जाऊ द्या. आपोआप त्यातून मार्ग निघेल आणि सगळे प्रश्न सुटतील. परंतु अविवेकाने या गोष्टी कोणाजवळही बोलू नका. कारण, लोक आपले दुःख ऐकून घेतात आणि आपण दिलेल्या माहितीचा गैरवापर करून आपल्याला बदनाम करतात.
चाणक्यांनी श्लोकात दिलेल्या गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात कमी जास्त प्रमाणात घडत असतात. म्हणून दुःखाचे भांडवल करू नका. परिस्थिती स्वतः हाताळायला शिका.
आर्थिक अडचणीचे प्रसंग प्रत्येकावर येतात. परंतु अडचणीच्या काळात घेतलेली मदत आयुष्यभराचे ओझे होते. त्यापेक्षा स्वतःवर विश्वास ठेवा आणि अडचणीतून मार्ग काढा.
काही कारणाने मन दुखावले गेले असेल आणि तुम्ही मन हलके करण्यासाठी आपली समस्या कोणाला सांगायला गेलात, तर लोक तुमचे प्रश्न तुमच्या भूमिकेतून समजून घेतील याची शाश्वती नाही. उलट सल्ले देऊन किंवा तुम्हाला चुकीचे ठरवून तुमचा मनःस्ताप वाढवतील.
वैयक्तिक नाते संबंधांबाबत कायम गोपनीयता राखावी. झाकली मूठ सव्वा लाखाची, अशी म्हण आहे. त्यानुसार आपल्या जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध असल्याचे तुम्हाला कळले, तर त्याला त्या नात्यातून परावृत्त होण्याची संधी द्या. चूक कोणाकडूनही होऊ शकते. त्याच्याकडून चूक का घडली, हे समजून घ्या. सुधारण्याची एक संधी द्या.
कोणाकडून कोणाबद्दल काही बरे वाईट ऐकले असेल, तर त्याची शहानिशा न करता त्याबद्दल चर्चा करू नका. ही माहिती कुठून मिळाली याचा विचार न करता, संबधित माहिती पसरवण्यासाठी लोक तुम्हाला जबाबदार धरतील. म्हणून एकवेळ कान आणि डोळे उघडे ठेवा पण तोंड बंद ठेवा.
आपला अपमान आपल्याजवळ राहू द्या. लोकांना थट्टा मस्करी करायला विषय देऊ नका. झालेल्या अपमानातून बोध घ्या. स्वतःमध्ये उचित बदल करा, परंतु सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नका.