Chanakyaniti : सुखी कोणीही होऊ शकतं, पण समाधानी कसं व्हायचं ते सांगताहेत आचार्य चाणक्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 05:20 PM2024-05-02T17:20:20+5:302024-05-02T17:21:02+5:30

Chanakyaniti : सद्यस्थितीत सुख विकत घेऊ शकतील एवढा पैसा लोकांकडे आहे, पण समाधान हरवलं आहे; ते कुठे आणि कसं मिळवायच ते जाणून घ्या!

Chanakyaniti : Anyone can be happy, but Acharya Chanakya tells how to be satisfied! | Chanakyaniti : सुखी कोणीही होऊ शकतं, पण समाधानी कसं व्हायचं ते सांगताहेत आचार्य चाणक्य!

Chanakyaniti : सुखी कोणीही होऊ शकतं, पण समाधानी कसं व्हायचं ते सांगताहेत आचार्य चाणक्य!

चाणक्य नीती हा महान कूटनीतीज्ञ आणि अर्थतज्ञ आचार्य चाणक्य यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. त्यात त्यांनी मानवी आयुष्यातील अनेक बाजूंवर सखोल विचार करून त्यावर तोडगे दिले आहेत. ते अमलात आणले तर आपल्यालाही यशस्वी आयुष्याच्या दिशेने निश्चितपणे घोडदौड करता येईल. यासाठी त्यांनी शिकवलेल्या नीतिमूल्यांचा बारकाईने अभ्यास करू आणि ते मंत्र आत्त्मसात करू. 

वादात पडायला कोणालाही आवडत नाही. मात्र अनेकदा आपण विनाकारण वादविवादात अडकतो आणि समोरच्याशी वैर घेऊन बसतो. त्यामुळे होणार मनःस्ताप आणखीनच वेगळा. या गोष्टींवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि सुखाबरोबर समाधानी आयुष्य जगण्यासाठी आचार्य चाणक्य तीन गोष्टींवर ताबा मिळवा असे सुचवतात. त्या तीन गोष्टी कोणत्या हे जाणून घेऊया. 

अहंकार : अहंकाराची बाधा झालेला मनुष्य कधीच यशस्वी होऊ शकत नाही. स्वतःला सर्वेसर्वा समजण्यात आणि स्वतःची योग्यता सिद्ध करण्यात त्यांचे आयुष्य खर्च होते. गर्वाचे घर खाली, अशी आपल्याकडे म्हण आहे, ती यासाठीच! स्वाभिमान असावा पण अभिमान नसावा. स्वाभिमान आत्मविश्वास वाढवतो तर अभिमान अहंकाराला खतपाणी घालतो! अहंकाराची पट्टी डोळ्यावर बांधली गेली की आपण आपल्या कलागुणांचा योग्य वापर करू शकत नाही. इतरांकडून चांगले शिकण्याची क्षमता गमावून बसतो. म्हणून अहंकाराचा वारा न लागो राजसा, अशी देवाजवळ प्रार्थना करायची आणि आपण स्वतःशी कायम प्रामाणिक राहायचे!

स्वार्थ : स्वार्थाने बरबटलेली व्यक्ती दुसऱ्यांचे हित पाहू शकत नाही. ती आपल्याच कोशात असते. आपले भले कशात आहे, हे पाहण्याची क्षमता गमावून बसते. त्यातही ताणतणाव आणि वादग्रस्त परिस्थिती असेल, तर अशावेळी स्वार्थी व्यक्ती दुसऱ्यांसमोर लाचार होते. त्यांच्या तालावर नाचते आणि आत्मसन्मान गमावून बसते.

क्रोध : तुम्ही जेवढे आजवर काही कमावले, ते सगळे एका क्षणात गमावण्याची ताकद रागात असते. कारण तुमचा राग तुमच्या व्यक्तिमत्त्वाची उणी बाजू दाखवतो. राग, क्रोध रास्त जागी असेल तर समोरच्या जरब बसते. याउलट तो अनाठायी व्यक्त झाला तर केवळ एका शब्दाने नाहीतर कृतीने तुम्ही आजवर कमावलेला चांगुलपणा गमावून बसतो. 

अशा या तीन महत्त्वाच्या गोष्टी दिल्यानुसार आटोक्यात ठेवल्या तर या शहरी कोलाहलातही तुम्हाला शांतता आणि समाधान नक्की गवसेल!

Web Title: Chanakyaniti : Anyone can be happy, but Acharya Chanakya tells how to be satisfied!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.