Chanakyaniti: गरीब घरात जन्माला आलात? हरकत नाही, पण गरिबीत मरू नका! - आचार्य चाणक्य
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 12:46 PM2022-11-17T12:46:30+5:302022-11-17T12:47:01+5:30
Chanakyaniti: महान अर्थतज्ञ, मुत्सद्दी आणि राजकारणी आचार्य चाणक्य केवळ नैतिकतेला धरून श्रीमंत होण्याचा मार्ग दाखवतात.
आचार्य चाणक्य यांचे विचार वास्तवाला धरून असतात त्यामुळे ते प्रतिगामी वाटत नाहीत तर कालसुसंगत वाटतात. प्रस्तुत लेखातही आचार्यांनी श्रीमंत होण्याचे दोन मुख्य मार्ग सांगितले आहेत. ते जाणून घेऊ.
आचार्य चाणक्य आपल्या नीतिशास्त्र चाणक्य नीतीमध्ये म्हणतात की जर पैसा कमावण्याचा मार्ग चुकीचा असेल तर खूप पैसा मिळवूनही तो टिकणार नाही आणि माणूस गरीब व्हायला वेळ लागणार नाही. अशी व्यक्ती जितक्या लवकर श्रीमंत होईल तितक्या लवकर त्याचे पैसे निघून जातील आणि ती पूर्वीपेक्षा गरीब होतील. पैसा कमावणे कठीण नाही, पण तो टिकवणे महाकठीण. यासाठी दोन गोष्टी कटाक्षाने पाळायला हव्यात. त्या पुढीलप्रमाणे-
नाशवंत संपत्ती :
चाणक्य नीतीमध्ये असे म्हटले आहे की जे वाममार्गाने अर्थात चुकीच्या पद्धतीने कमावतात ते वरकरणी आपल्याला सुखी वाटत असतील पण जेव्हा त्यांचा पैसा उतरंडीला लागतो, तेव्हा त्यांच्याकडे पैसा, मान, मरातब काहीच उरत नाही. चोरी, खोटे बोलणे, फसवणूक करून माणूस कमी वेळात नक्कीच श्रीमंत होऊ शकतो, परंतु असा पैसा अपघात, आजारपण, फसवणूक अशा मार्गाने वेगाने निघून जातो. असा पैसा तुम्हालाही पापाचा भागीदार बनवतो. हा पैसा तुम्हाला काही काळ आनंद देतो, परंतु नंतर तो अनेक समस्यांना कारणीभूत ठरतो, त्यामुळे कधीही अनैतिक मार्गाने पैसे कमवू नका, लवकर श्रीमंत होण्यासाठी चुकीचे मार्ग निवडू नका नाहीतर आता जेवढ्या गरिबीत आहात त्याहून जास्त दारिद्र्याच्या खायीत लोटले जाल.
दान धर्म:
लक्ष्मी चंचल असते. तिला एका जागी अडवून ठेवू नका. ती नाश पावेल. व्यापाऱ्यांना बघा. ते पैशातून पैसा वाढवतात. गुंतवणूक करतात. दानधर्म करतात आणि साठवणूकही करतात. याउलट नोकरदार माणूस फक्त कमवतो आणि साठवतो. त्याठिकाणी लक्ष्मी स्थिर राहत नाही. यासाठी तिचा सदुपयोग करा. जितके द्याल त्याच्या दुप्पट परत मिळेल. गरजू, गरीब लोकांवर आपल्या उत्पन्नाच्या दहा टक्के भाग धर्मदाय संस्थेसाठी, सामाजिक संस्थांसाठी दान करा, जेणेकरून तुमचे पैसे सत्कारणी लागतील, जास्त लोकांपर्यंत पोहोचतील. याउलट साठवून ठेवलेले पैसे लवकर नष्ट होतील. त्या पैशांना पाय फुटण्याआधी आणि अध्यात्मिक भाषेत आपल्या ओंजळीतून सांडण्याआधी ते दान करायला शिका. तुम्ही दुसऱ्यांची ओंजळ भराल तेव्हा तुमची ओंजळ रीती न ठेवण्याची जबाबदारी परमेश्वर घेईल आणि लक्ष्मी मातेची सदैव कृपा राहील.