Chanakyaniti: पुरुषांनी 'या' तीन गोष्टी चुकूनही कुणाला सांगू नये; वाचा चाणक्यनीतीतील महत्त्वाचे नियम!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 04:26 PM2024-06-10T16:26:44+5:302024-06-10T16:27:07+5:30
Chanakyaniti: स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांचे शेअरिंगचे प्रमाण कमी असते, तरीदेखील अनावधानाने चूक होऊ नये म्हणून पुरुषांनी तीन गुपितं जपावीत.
आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्यनीती या महान ग्रंथात मानवी जीवनाला अनुकूल वर्तनासंबंधी नियम दिले आहेत. त्याचे पालन करणे आपल्या दृष्टीने हितावह आहे. दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींबद्दल त्यात माहिती दिली आहे. ज्यांना तत्त्वनिष्ठ आयुष्य जगायचे आहे, परिस्थितीमुळे तसेच आपल्याच हातून घडणाऱ्या चुकांमुळे होणारा त्रास टाळायचा असेल त्यांनी चाणक्यनीतीचा जरूर अभ्यास करावा आणि त्यातील बारकावे जाणून घ्यावेत.
सादर लेखात आपण पुरुषांनी कोणती गुपितं बाळगावीत किंवा कोणत्या बाबतीत उघडपणे चारचा करू नये याचे नियम पाहणार आहोत. या नियमांचे पालन केले असता पुरुषांना त्यांच्या व्यक्तिगत जीवनात तर लाभ होईलच, शिवाय आपल्या नोकरी, व्यवसायात यश प्राप्त होईल हे ही नक्की. जाणून घेऊ ते नियम.
चाणक्यनीतीनुसार पुरुषांनी पुढील तीन नियमांचे पालन करायाला हवे!
आर्थिक विषय : चाणक्यनीतीनुसार पुरुषांनी आपले आर्थिक प्रश्न, मिळकत, खर्च, उत्पन्नाचे साधन याबाबत उघडपणे चर्चा करू नये. कारण, आर्थिक स्थितीवरून पुरुषांचे व्यक्तिमत्त्व ओळखले जाते. त्यांचे समाजातले मूल्यमापन केले जाते. आर्थिक समस्या कितीही असल्या तरी चारचौघात चर्चा केल्याने त्यावर उपाय तर निघत नाहीच, उलट लोक आपल्या स्थितीचा गैरफायदा घेऊ शकतात हे लक्षात ठेवले पाहिजे. आपल्या जवळच्या लोकांव्यतिरिक्त असे विषय शेअर करू नये, हे हिताचे ठरते.
कौटुंबिक समस्या : पुरुषांनी आपल्या पत्नी आणि मुलांबद्दल बाहेरच्या लोकांशी चर्चा करू नये. पत्नीचे दुर्वर्तन असले, मुलं ऐकत नसतील तरी यात पुरुषाची प्रतिमा लोकांच्या दृष्टीत मलीन होते. घरात असे वातावरण असेल तर त्या पुरुषाचा घरात वचक नाही, त्याला कोणी जुमानत नाही, किंमत देत नाही असे चित्र दिसून येते आणि त्या परिस्थितीचा फायदा दुसरे लोक घेऊ शकतात. हे लक्षात ठेवून मगच हे विषय बोलताना भान ठेवावे. अतिरिक्त माहिती पुरवू नये, अन्यथा प्रकरण आपल्याच अंगाशी येऊ शकते.
मान-अपमान : असे म्हणतात, 'सुख सांगावे सकळांसी, दुःख सांगावे देवासी' कारण आपल्या दुःखाबद्दल ऐकायला कोणीही उत्सुक नसते. उलट त्या दुःखाचा, संकटाचा गैरफायदा घेणारेच अनेक असतात. म्हणून मान-सन्मान झाला तर तो चारचौघात खुशाल सांगावा, पण अपमान गपगुमान गिळून टाकावा. लोक सल्ला द्यायला आणि आपल्या चुका शोधायलाच बसलेले असतात. त्यांच्या हातात आयते कोलीत देण्यापेक्षा अपमानाचे घोट गिळून टाकणे केव्हाही चांगले.
चाणक्यनीतीनुसार पुरुषांनी हे तिन्ही नियम पाळले तर त्यांचे खाजगी आयुष्य इतरांसाठी भांडवल होणार नाही आणि तुमची 'झाकली मूठ सव्वा लाखाची' राहील हे नक्की!