Chanakyaniti: चाणक्यनीतीतल्या फक्त 'या' चार गोष्टी आचरणात आणा आणि दीर्घकाळ यशस्वी राहा!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 07:00 AM2022-11-30T07:00:00+5:302022-11-30T07:00:00+5:30
Chanakyaniti: आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या चार गोष्टी कायम लक्षात ठेवा...
आपल्या कार्यक्षेत्रात यशस्वी व्हावे असे प्रत्येकाला वाटते. परंतु यश कोणाला पटकन मिळते तर कोणाला मिळता मिळता हुलकावणी देते. अपयशासाठी केवळ नशिबाला दोष देऊन उपयोग नाही, तर आपले प्रयत्न योग्य दिशेने सुरू आहेत की नाही हे पाहणेही महत्त्वाचे आहे. आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीतीमध्ये चार कारणे विशेष अधोरेखित केली आहेत. ही चाणक्य नीती आपल्यालाही अनुसरता आली तर अपयशाच्या मुळापर्यंत पोहोचणे सोपे जाईल. चला तर जाणून घेऊया त्या चार गोष्टी-
>> लोक यशस्वी लोकांच्या मागे धावतात, पण तुम्ही अपयशी लोकांशी चर्चा करा. त्यांना का अपयश आले, हे आपल्याला त्यांच्या अनुभवावरून कळेल आणि त्यांनी केलेल्या चुका भविष्यात टाळता येतील. दर वेळी स्वतःच्या चुकांमधून शिकायला हवे असे नाही, दुसऱ्यांच्या चुकांमधून आपणही धडा घेतला पाहिजे. त्यालाच मराठीत म्हण आहे, पुढच्यास ठेच मागचा शहाणा!
>> यशस्वी लोकांची आत्मचरित्र वाचा. त्यांनी कोणत्या पद्धतीने स्वतःची प्रगती केली. त्यांना कोणत्या अडचणी आल्या, त्यावर त्यांनी कशी मात केली, याचे प्रशिक्षण आपल्याला त्यांच्या अनुभवातून मिळू शकते.
>> यशस्वी आणि अपयशी लोकांकडून शिकण्यासारख्या गोष्टींची तुमच्याकडे नोंद करा. जेणेकरून तुमच्या आयुष्यात असे प्रसंग उद्भवल्यास तुम्हाला त्या प्रसंगाशी कसे तोंड द्यायचे आहे याची आपली वैचारिक तयारी झालेली असेल. कोणताही निर्णय विचारपूर्वक घेण्याची सवय लागली, की तुमचे निर्णय चुकणार नाहीत आणि एखादा निर्णय चुकला तरी त्यावर मात करण्यासाठी तुम्ही सिद्ध असाल.
>> कठीण प्रसंगात आपण त्या प्रसंगाला तोंड कसे देतो, यावर यशापयश आवलंबून असते. सकारात्मक विचार करणारी व्यक्ती प्रत्येक कठीण प्रसंगातून मार्ग काढण्याचे सामर्थ्य बाळगते. अशी व्यक्ती शांत डोक्याने प्रत्येक गोष्ट यशस्वीपणे पार पाडू शकते.