विचार बदला, नशीब बदलेल...तुमचेही व इतरांचेही; वाचा ही मजेशीर गोष्ट!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 04:52 PM2021-06-24T16:52:28+5:302021-06-24T16:52:44+5:30
चांगल्या विचारांमध्ये वाईटाचेही चांगले करण्याची केवढीतरी क्षमता असते...!
एक राजा आपल्या राज्याचा फेरफटका करत हत्तीवर अंबारीत बसून चालला होता. आजूबाजूला फौजफाटा होता. राजाचा रुबाब पाहून सगळी जनता विनम्रपणे त्याला अभिवादन करत होती.
वाटेत एक चंदनाचा व्यापारी होता. त्यानेही राजाला लवून नमस्कार केला. परंतु त्याच्या नजरेत काहीतरी वेगळेच आहे, असे राजाला जाणवले. त्याची नजर राजाला खटकली. त्याने मंत्र्याला बोलावून सांगितले, `बाजारात उभा असलेला चंदनाचा व्यापारी, ज्या पद्धतीने माझ्याकडे पाहत होता, ते पाहता मला त्याला फाशीची शिक्षा देण्याची तीव्र इच्छा झाली.'
का, कशासाठी, हे विचारण्याची सोय नसल्याने, मंत्र्याने व्यापाऱ्यावरचे अकारण आणि अकाली आलेले मरण टाळण्यासाठी म्हटले, `महाराज, आपणास असे का वाटले, हे समजू शकलो नाही. परंतु तो व्यापारी खूप चांगला आहे. तो तुम्हाला खूप मानतो. तुमची प्रशंसा करतो. एवढेच नव्हे, तर तुमच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो. आणि आपण...'
हे ऐकून राजा म्हणाला, `काय? तो माझ्याबद्दल एवढे चांगले विचार करतो? त्याला माझ्याकडून ही सुवर्ण मोहोरांची थैली भेट द्या आणि दररोज त्याच्या दुकानातून आपल्या महालात अग्निहोत्र करण्यासाठी चंदनाची लाकडे मागवा.'
मंत्र्याचा जीव भांड्यात पडला. तो सुवर्ण मोहोरांची थैली घेऊन व्यापाऱ्याजवळ गेला. राजाबद्दल त्याचे विचार जाणून घेण्यासाठी मंत्र्याने वेषांतर केले. तो व्यापाऱ्याला म्हणाला, `काय शेठ, कसा चाललाय व्यापार? आज तर राजेसाहेब पण तुमच्याकडे खुश होऊन पाहत होते.'
राजाचे नाव काढताच व्यापारी म्हणाला, `अहो काय सांगू? चंदनाचा व्यापार करून माझ्यावर आता पश्चात्तापाची वेळ आली. एकही गिऱ्हाईक येत नाही. जे येतात, ते केवळ चंदनाचा सुगंध हुंगून निघून जातात. आता तर एकच उपाय आहे. आपल्या राज्याचा राजा गेला, तर त्याच्या अंत्यक्रियेत ही चंदनाची लाकडं कामी येतील आणि माझा व्यापार होईल.'
वेषांतर केलेला मंत्री म्हणाला, `अरेरेरे! काय हे विचार...तुम्ही राजेसाहेबांच्या मृत्यूची कामना करताय आणि इथे राजेसाहेबांनी तुमच्यावर खुष होऊन, तुमच्या व्यापाऱ्याच्या बढतीसाठी शुभेच्छा म्हणून या सुवर्ण मोहरा पाठवल्या आहेत. तसेच अग्निहोत्रासाठी रोज चंदनाची लाकडेही मागवली आहेत.'
हे ऐकून व्यापारी वरमता़े मंत्र्यांची क्षमा मागतो आणि राजाला दीर्घायुष्य लाभावे, अशी मनोकामना व्यक्त करत चंदनाच्या लाकडांची एक मोळी बांधून ती मंत्र्यांच्या हस्ते भेट म्हणून पाठवतो.
एका चांगल्या विचारामुळे दोन वाईट विचारांची मने पालटली. एकाला जीवदान तर दुसऱ्याला दीर्घायुष्यासाठी सदिच्छा मिळाल्या. यावरून आपल्याला लक्षात येते, की चांगल्या विचारांमध्ये वाईटाचेही चांगले करण्याची केवढीतरी क्षमता असते...!