भगवान बुद्धांच्या विपुल शिकवणुकीचे संगायन; त्रिपिटक साहित्याचे जतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 06:53 AM2020-05-21T06:53:28+5:302020-05-21T06:54:00+5:30
अरहंत भिक्षुंनी याचे पठन केले. यालाच त्रिपिटक म्हणतात. ज्याचा शाब्दिक अर्थ आहे, ‘तीन पेटारे.’ त्रिपिटकाचे तीन भाग आहेत.
- फरेदुन भुजवाला
पंचवीस शताब्दीपूर्वी पाली भाषेला मागधी म्हणायचे, जी उत्तर भारतातील लोकभाषा होती़ ती भाषा ज्यात बुद्धांनी धर्माची शिकवण दिली होती़ ज्या प्रकारे हिंदू धर्मग्रंथाची भाषा संस्कृत आहे आणि कॅथॉलिकांच्या धर्मग्रंथांची भाषा लॅटिन आहे, त्याप्रमाणे पाली भाषेत भगवान गौतम बुद्धांची शिकवण सुरक्षित ठेवली गेली आहे; पण अन्य लोकभाषांच्या तुलनेत पाली भाषा कमी प्रसिद्ध आहे, असे नमूद करत विपश्यनाचार्य सत्यनारायण गोएंका सांगतात, भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर तीन महिन्यांत ५00 अरहंतांची विशेष सभा झाली होती़ त्यात भगवान बुद्धांच्या सर्व उपदेशांचे म्हणजे त्यांच्या विपुल शिकवणुकीचे संगायन केले गेले़ जी शिकवण भगवान बुद्धांनी त्यांच्या ४५ वर्षांच्या जीवनकाळात दिली होती़ अरहंत भिक्षुंनी याचे पठन केले़ यालाच त्रिपिटक म्हणतात़ ज्याचा शाब्दिक अर्थ आहे, ‘तीन पेटारे.’ त्रिपिटकाचे तीन भाग आहेत.
विनय पिटक (भिक्षुंच्या अनुशासनविषयक नियमांचा संग्रह), सुत्त पिटक (सामान्य जनांसाठी प्रवचन) आणि अभिधम्म पिटक (धर्मासंबंधी गंभीर शिकवणूक), प्रथम संगायनानंतर अनेक शताब्दिपर्यंत भगवान बुद्धांच्या शिकवणुकीला मौखिक परंपरेने विधिवत पाठ करवून ठेवले गेले़ पुढे विपश्यनाचार्य गोएंका म्हणतात, हेच त्रिपिटक श्रीलंकेत राजा वट्टगामिनीच्या संरक्षणात झालेल्या चवथ्या संगायनाच्या वेळी ताडपत्रांवर लिहिले गेले.
पाचवे संगायन ब्रह्मदेशाच्या मांडले शहरात राजा मिन्डोमिनच्या शासनकाळात झाले़ पूर्ण त्रिपिटक संगमरवरी मोठमोठ्या ७२९ पट्ट्यांवर अंकित केले गेले़ त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक पट्टीला छोट्या पॅगोडात ठेवले गेले़ ज्यांना ‘पिटक पॅगोडा’च्या नावाने विश्वातील सर्वांत मोठ्या पुस्तकाच्या रूपाने जाणले जाते़ हे पिटक पॅगोडे मांडेल पहाड्याच्या उतारावर बनलेले आहेत़ हे साहित्य नंतर २१ खंडांत छापले गेले.