Char Dham : आयुष्यात एकदा तरी चार धाम यात्रा करा आणि सर्व तीर्थक्षेत्रांचे पुण्य मिळवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 03:24 PM2022-04-21T15:24:57+5:302022-04-21T15:25:58+5:30

Char Dham : अन्य तीर्थक्षेत्री जाणे शक्य नसेल, तर निदान चार धाम यात्रा अवश्य करा, असे धर्मशास्त्र सांगते!

Char Dham : Visit Char Dham at least once in your life and get the merit of all the pilgrimage sites! | Char Dham : आयुष्यात एकदा तरी चार धाम यात्रा करा आणि सर्व तीर्थक्षेत्रांचे पुण्य मिळवा!

Char Dham : आयुष्यात एकदा तरी चार धाम यात्रा करा आणि सर्व तीर्थक्षेत्रांचे पुण्य मिळवा!

googlenewsNext

'अन्यक्षेत्रे कृतं पापं पुण्यक्षेत्रे विनश्यति' असे एक संस्कृत वचन आहे. याचा अर्थ असा, की पुण्यक्षेत्री गेल्याने आपल्या पापाचा निचरा होतो. मात्र आपल्या रोजच्या कामाच्या धबडग्यात तीर्थक्षेत्री जावे, पुण्यसंचय करावा, एवढा वेळ मिळत नाही आणि निवृत्तीनंतर वेळ मिळालाच तर शरीर साथ देईलच असे नाही. यावर धर्मशास्त्राने तोडगा काढला आहे, तो म्हणजे अन्य तीर्थक्षेत्री जाणे शक्य नसेल, तर निदान चार धाम यात्रा अवश्य करा. 

सनातन शास्त्रांमध्ये चार धामचे तपशीलवार वर्णन केले आहे. दैवी काळात ही ठिकाणे इतर नावांनी ओळखली जात होती. सध्या चार धामची नावे वेगळी आहेत. दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक चार धाम येथे धार्मिक यात्रा काढतात. कोरोना काळात यात्रा थांबल्या होत्या, आता पुनश्च चार धाम यात्रेला सुरुवात झाली आहे. असे म्हणतात, की अन्य तीर्थक्षेत्री गेला नाहीत तरी चालेल, पण चार धाम यात्रा केल्याने सर्व तीर्थक्षेत्रांचे पुण्य लाभते. काय आहे त्या स्थानांची महती? थोडक्यात जाणून घेऊ. 

बद्रीनाथ 

बद्रीनाथ हे उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र आहे. दरवर्षी हिवाळ्यात बद्रीनाथचे दरवाजे दिवाळीच्या दुसऱ्या दिवसापासून बंद होतात. यानंतर, उन्हाळ्याच्या हंगामात दरवाजे पुन्हा उघडले जातात. हिवाळ्यात, बद्रीनाथ बर्फाच्या चादरीने झाकलेला असतो. बद्रीनाथ हे चार धामांपैकी एक आहे. याशिवाय केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री आहे. या चार धामांना मोठ्या संख्येने भाविक भेट देतात. चार धामांव्यतिरिक्त देवांची भूमी असलेल्या उत्तराखंडमधील तुंगनाथ आणि मदमहेश्वर मंदिरेही हिवाळ्यात बंद असतात. सध्या ती खुली असल्याने उन्हाळ्यात तिथे जाण्याचा विचार करता येईल. 

द्वारका

द्वारका ही भगवान श्रीकृष्णाची राजधानी होती असा उल्लेख महाभारतात आहे. हे शहर गुजरात राज्यात आहे. इतिहासकारांच्या मते, गुजरातचे द्वारकाधीश मंदिर भगवान कृष्णाच्या पणतूने बांधले आहे. अनादी काळापासून मंदिराचा विस्तार होत आहे. १७ व्या शतकात त्याचा व्यापक विस्तार झाला. तत्पूर्वी आदिगुरू शंकराचार्यांनी द्वारका मंदिरात जाऊन शारदा पीठाची स्थापना केली. हे मंदिर २५०० वर्षे जुने असल्याचा अंदाज आहे. द्वारका हे द्वापर युगातील शहर होते, जे आता महासागरात लीन झाले आहे. सध्या या पवित्र ठिकाणी द्वारकाधीश मंदिर आहे. द्वारकाधीश मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन दरवाजे आहेत. मुख्य प्रवेशद्वाराला 'मोक्षद्वार' आणि दुसऱ्या दरवाजाला 'स्वर्ग द्वार' असे म्हणतात. मंदिरात भगवान श्रीकृष्णाची चांदीच्या रूपात प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तेथील कृष्णमूर्तीचे विलोभनीय रूप पाहण्यासाठी द्वारकेला अवश्य जावे. 

जगन्नाथ मंदिर

जगन्नाथ मंदिर ओडिशामध्ये आहे. या मंदिरात बलराम आणि भगिनी सुभद्रा यांच्यासह भगवान श्रीकृष्णाची पूजा केली जाते. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात जगन्नाथ रथयात्रा काढली जाते. देवशयनी एकादशीला रथयात्रेची सांगता होते. अनादी काळापासून हा सण श्रद्धेने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. या उत्सवात भगवान कृष्ण आणि बलराम त्यांची बहीण सुभद्रा हिला घेऊन जगन्नाथपुरीला भेट देतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. रथयात्रेला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. सामान्य दिवशीही भाविकांची गर्दी असते.

रामेश्वरम

चार धामांपैकी एक म्हणजे रामेश्वरम. भगवान श्रीरामांनी लंकेला जाताना रामेश्वरममध्ये भगवान शंकराची मूर्ती स्थापित करून त्यांची पूजा केली, अशी आख्यायिका रामायणात आहे. हे शिवलिंग श्रीरामांनी स्वतःच्या हाताने बनवले होते. म्हणून त्या शिवलिंगाचे नाव रामेश्वरम ठेवले. त्रेतायुगापासून रामेश्वरात शिवाची पूजा केली जाते. रामेश्वरम हे एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. रामेश्वर यात्रेला मोठ्या संख्येने भाविक येतात. एरव्हीसुद्धा शंकराच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी असते. 

Web Title: Char Dham : Visit Char Dham at least once in your life and get the merit of all the pilgrimage sites!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.