मोबाईल, लॅपटॉपइतकेच मनाचे चार्जींगही महत्त्वाचे!- ब्रह्मकुमारी शिवानी दीदी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 08:00 AM2022-01-19T08:00:00+5:302022-01-19T08:00:02+5:30
सकाळी उठल्यावर न विसरता जसे आपण आपले गॅझेट्स चार्ज करतो, तसे मनाला सकारात्मक विचारांचे चार्जिंग होणे महत्त्वाचे आहे!
रोज सकाळी उठल्यापासून आपण यंत्रवत कामाला सुरू करतो. सुटीचा दिवस वगळता आपल्या दिनचर्येत सहसा बदल होत नाही. मात्र, याच तोचतोपणामुळे आपले आयुष्यसुद्धा चाकोरीबद्ध झाले आहे. त्यावर पर्याय एकच, ज्याप्रमाणे उठल्यावर आपण मोबाईल, लॅपटॉप चार्जिंगला लावतो, तसे रोज किमान तासभर आपल्या मनाचेही चार्जिंग करून घ्या, सांगत आहेत ब्रह्मकुमारी शिवानी दीदी.
अतिश्रमामुळे जसे शरीर थकते, तसे अतिविचारामुळे मन थकते. त्याला गरज असते विश्रांतीची. परंतु आपण ती मिळूच देत नाही. सतत आपल्या मनावर, बुद्धीवर विचारांचा भडीमार करत राहतो. त्यामुळे मन योग्य दिशेने विचार करायचे सोडून चुकीच्या दिशेने विचार करू लागते. म्हणून मन शांत ठेवण्यासाठी दिवसभरातील चोवीस तासांपैकी एक तास फक्त मनासाठी द्या. ते शांत असेल, तर बाह्य जगतात कितीही तणावाचे प्रसंग आले, तरी तुम्ही ते सहज हाताळू शकाल.
आपल्याला स्वत:मध्ये बदल करायचा आहे. आपला प्रवास कलियुगाकडून सत्ययुगाच्या दिशेने न्यायचा आहे. सत्यनारायण पूजेत सांगितले जाते, ज्याचे कर्म चांगले तो नराचा नारायण होतो. याचा अर्थ सत्ययुगात नारायण आणि लक्ष्मीचे अस्तित्त्व होते, कलियुगात नर आणि नारीचे अस्तित्त्व आहे. परंतु, आपल्या चांगल्या कर्माने आपण कलियुगातही सत्ययुग आणू शकतो. त्यासाठी आपल्याठायी क्षमाशील वृत्ती हवी.
कोणाचे आभार मानायचे आहेत, कोणाचे माफी मागायची आहे, कोणाला मदत करायची आहे, कोणाशी हितगुज करायची आहे, तर आज करू उद्या करू म्हणत दिरंगाई करू नका. वर्तमानात जगा, आहे तो क्षण अनुभवून घ्या, जगून घ्या. ज्या क्षणी जे महत्त्वाचे आहे, त्या गोष्टी करून मोकळे व्हा. असे केल्यामुळे तुमच्या मनावर कसलेही ओझे राहणार नाही. मन आपोआप शांत राहील. शांत मन चांगल्या कामात रमवता येईल. तुम्ही प्रसन्न व्हाल आणि तुम्हाला पाहून इतरांनाही प्रसन्न वाटेल.
या सगळ्या गोष्टी सहज शक्य आहे, फक्त मनाचे चार्जिंग विसरू नका.