Chaturmaas 2024: चातुर्मासात तुळशीची माळ जरूर घाला, पण नियमही पाळा!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 01:29 PM2024-06-27T13:29:18+5:302024-06-27T13:30:11+5:30
Chaturmaaas 2024: वारीमध्ये सहभागी व्हायचे म्हणून तुळशी माळ घालणार असाल तर तिचे पावित्र्य कसे जपायचे आणि ती घातल्याने होणारे लाभ कोणते, ते जाणून घ्या!
हिंदू धर्मात तुळशीचे मोठे महत्त्व आहे. दररोज तुळशीला पाणी अर्पण करण्यापासून ते संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावणे, तुळशीची दोन पाने खाणे, तुळशी हार देवाला घालणे अशा अनेक बाबतीत तुळशी भारतीय परंपरेचा महत्त्वाचा भाग बनली आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही तुळशीचे बरेच फायदे आहेत. आज आपण तुळशी माळ घातल्याने होणाऱ्या फायद्याची माहिती घेऊया. मानसिक विकार, ताण तणाव यावर तुळशी माळेचा उपाय सांगितला जातो.
तुळशीच्या रोपाने आणि तुळशीच्या रूपाने जसे घरात चैतन्य नांदते, त्यानुसार तुळशी माळ घातल्याने शरीरात चैतन्य नांदते. सामान्यत: भगवान विष्णू आणि कृष्णाचे भक्त तुळशीची माळ दागिन्याप्रमाणे गळ्यात घालतात. त्याचप्रमाणे वारकऱ्यांच्या गळ्यात देखील तुळशी माळ कायम आढळते. गळ्यात तुळशीची माळ परिधान केल्याने शरीर शुद्ध होते आणि मानसिक आरोग्यही सुधारते. तणाव कमी करण्यास मदत होते आणि बर्याच आजारांपासून सुटका मिळवण्यासाठीदेखील तुळशी माळेचा वापर केला जातो.
तुळशीची माळ वापरताना पाळायचे नियम :
>>तुळशीची माळ शोभेच्या दागिन्यापैकी एक नसून अष्टसात्विक भाव जागृत करणारी माळ आहे.
>> तिचे पावित्र्य जपण्यासाठी मांसाहार तसेच मद्य यांना स्पर्शदेखील करता कामा नये.
>>तुळशीची माळ घातली तर मनाची विशालताही दाखवता आली पाहिजे. वाद विवाद करून अर्वाच्य भाषा न वापरता गुण्या गोविंदाने जगता आले पाहिजे.
>> तुळशीची माळ गळ्यातून काढून ठेवली असता ती कचरा किंवा कोणत्याही अस्वच्छ भागात ठेवू नये.
तुळशीचे दोन प्रकार आहेत :
श्यामा तुळशी आणि राम तुळसी. श्यामा तुळशीच्या बीजाचा हार घातल्यास मानसिक शांती मिळते आणि मनात सकारात्मकता निर्माण होते. यामुळे आध्यात्मिक तसेच कौटुंबिक आणि भौतिक प्रगती होते. भगवंताप्रती भक्ती आणि श्रद्धा वाढते. दुसरीकडे, राम तुळशीची माळ परिधान केल्याने आत्मविश्वास वाढतो आणि सात्विक भावना जागृत होते. कर्तव्यपूर्तीचे भान राहते.
तुळशीची माळ घालण्याचे फायदे :
>> तुळशीची माळ परिधान केल्याने मन शांत होते आणि आत्मा शुद्ध होतो.
>> ही माळ परिधान केल्याने शरीर शुद्ध होते, चैतन्य वाढते. पचनशक्ती, ताप, सर्दी, डोकेदुखी, त्वचेचा संसर्ग, मेंदूच्या आजार आणि गॅसशी संबंधित अनेक आजारांमध्ये आराम मिळतो. तसेच संसर्गामुळे होणा-या आजारांपासून संरक्षण होते.
>> तुळशी ही एक संजीवनी आहे, तिच्या रोजच्या वापरामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो, पचनशक्ती वाढते तो. गळ्यामध्ये तुळशीची माला परिधान केल्याने विद्युत तरंगांचे उत्सर्जन होते जे रक्त प्रवाही ठेवण्यात अडथळा येऊ देत नाही. या व्यतिरिक्त तुळशी हिवताप आणि अनेक प्रकारच्या तापांमध्ये खूप फायदेशीर आहे.
>> तुळशीची माळ परिधान केल्यास मानसिक शांती मिळते. गळ्याभोवती परिधान केल्याने अत्यावश्यक अॅक्युप्रेशर पॉईंट्सवर दबाव आणला जातो, व मानसिक ताणतणाव कमी होतो. स्मरणशक्ती वाढविण्यात देखील तुळशी माळेची मदत होते. तुळशी माळेत रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याची ताकद आहे.
>> कावीळ झाली असता तुळशीचा हार घालणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. एवढेच काय तर कोणत्याही प्रकारच्या तापावर तुळशीचा काढा रामबाण उपाय ठरतो.
तर अशी ही बहुगुणी तुळशीची माळ चतुर्मासात किंवा आषाढी वारीच्या निमित्ताने घालणार असाल तर तिचे पावित्र्यही अवश्य जपा!