Chaturmaas 2024: यंदा चातुर्मासाची सुरुवात कधीपासून आणि कसे करावे व्रताचरण? जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 05:11 PM2024-06-22T17:11:01+5:302024-06-22T17:11:23+5:30
Chaturmaas 2024: चातुर्मास अर्थात आषाढी ते कार्तिकी एकादशीचा काळ; या कालावधीत कोणकोणते नियम पाळायचे त्याबद्दल सविस्तर वाचा.
चातुर्मासाचा पवित्र कालावधी हिंदू धर्मात अतिशय महत्त्वाचा मानला जातो. यंदा १७ जुलैपासून चातुर्मास सुरू होत आहे आणि १२ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार या कालावधीत भगवान श्री हरी विष्णूसह भगवान शंकराची पूजा करण्याची परंपरा आहे. भगवान विष्णू योग निद्रामध्ये गेल्याने या चार महिन्यांसाठी सर्व शुभ कार्ये थांबवली जातात.
चातुर्मासाचे नियम :
चातुर्मास महिना अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हा चार महिन्यांचा कालावधी अतिशय धार्मिक असतो. हिंदू कॅलेंडरनुसार, या वर्षी १७ जुलैपासून चातुर्मास सुरू होणार असून या कालावधीत अनेक प्रकारची व्रत वैकल्य केली जातील. या चार महिन्यात विष्णू तथा शिव पूजेला अधिक महत्त्व असते. जे भाविक या काळात भक्तिभावाने पूजा करतात आणि धार्मिक कार्यात व्यस्त राहतात, त्यांच्यावर ईश्वरकृपा कायम राहते अशी श्रद्धा आहे. चला तर पाहूया देवाच्या कृपेस पात्र होण्यासाठी चातुर्मासाचे नियम-
चातुर्मासात या गोष्टी लक्षात ठेवा -
- चातुर्मासात कांदा, लसूण, मांसाहारासारख्या तामसी पदार्थांचे सेवन टाळावे.
- या काळात सात्विक अन्नाचे सेवन करावे.
- चातुर्मासात शक्यतो जमिनीवर झोपावे. अर्थात सुखाचा, वैभवाचा त्याग करून ईश्वरास समर्पित जीवन जगावे.
- चातुर्मासात कोणतेही शुभ कार्य करू नये, भगवंत सेवेत, दानधर्मात मन रमवावे.
- या कालावधीत शक्य झाल्यास एकभुक्त राहावे.
- भगवान शिवाची तथा भगवान विष्णूंची पूजा करावी.
- या महिन्यात तुळशीच्या रोपासमोर दररोज तुपाचा दिवा लावावा.
- या काळात धर्मग्रंथांचे वाचन करावे.
- या काळात भाविकांनी धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यात सहभागी व्हावे.
- या महिन्यात पवित्र स्थानांची यात्रा करणे अत्यंत शुभ मानले जाते.
- या काळात दारू, सिगारेट, जुगार यासारख्या वाईट सवयींपासून दूर राहावे.
- या काळात ब्रह्मचर्य पाळावे.
चातुर्मासात पुढील विष्णू मंत्राचा रोज जप करावा :
ॐ भूरिदा भूरि देहिनो, मा दभ्रं भूर्या भर। भूरि घेदिन्द्र दित्ससि।
ॐ भूरिदा त्यसि श्रुत: पुरूत्रा शूर वृत्रहन्। आ नो भजस्व राधसि।
त्याचप्रमाणे शिवमंत्राची उपासना करावी :
शम्भवाय च मयोभवाय च नमः शंकराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च।।
ईशानः सर्वविध्यानामीश्वरः सर्वभूतानां ब्रम्हाधिपतिमहिर्बम्हणोधपतिर्बम्हा शिवो मे अस्तु सदाशिवोम।।