Chaturmas 2022: श्रीमंत व्हायचे असेल तर 'ही' गोष्ट नक्की वाचा आणि त्यानुसार चातुर्मासात कृतीसुद्धा करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 05:38 PM2022-07-11T17:38:07+5:302022-07-11T17:38:32+5:30

Chaturmas 2022: ऐषोरामी जीवन जगावे असे प्रत्येकाचे स्वप्नं असते, पण ते सत्यात कसे उतरवावे असा प्रश्न तुम्हालाही पडत असेल तर ही कथा तुमच्यासाठी!

Chaturmas 2022: If you want to be rich, read this story and act in Chaturmas accordingly! | Chaturmas 2022: श्रीमंत व्हायचे असेल तर 'ही' गोष्ट नक्की वाचा आणि त्यानुसार चातुर्मासात कृतीसुद्धा करा!

Chaturmas 2022: श्रीमंत व्हायचे असेल तर 'ही' गोष्ट नक्की वाचा आणि त्यानुसार चातुर्मासात कृतीसुद्धा करा!

Next

एका गावात एक साधू राहत होते. लोक त्यांच्याकडे प्रश्नांचे निवारण करायला येत असत. साधू आपल्या योग सामर्थ्याने लोकांच्या शंकेचे निरसन करत. आपल्या कथा, कीर्तनातून, प्रवचनातून लोकांना ज्ञानामृत पाजत असत. वाम मार्गाला लागलेल्या लोकांचे मन पालटून त्यांना सन्मार्गाला लावत असत. त्यांच्या या अशा वर्तणुकीमुळे गावात त्यांना खूप मान होता. लोक त्यांना आपणहून दान, दक्षिणा देऊ करत. मात्र, साधू अतिशय मानी होते. संन्यस्त आयुष्य जगणाऱ्याने कोणत्याही गोष्टीचा संचय करायचा नसतो. जेवढे लागेल, तेवढ्याच गोष्टी मिळवून गुजराण करायची असते. या त्यांच्या तत्वानुसार त्यांनी कधीच धान्याची पोती आपल्या कुटीत साठवली नाहीत. तर, साधू नित्यनेमाने रोज पाच घरात माधुकरी मागून मिळेल तेवढ्या शिध्यावर पोट भरत असत. 

एक दिवस, गावातल्या एका भाविकाने साधूंना प्रश्न विचारला, `साधू महाराज, आपल्या गावातील सावकारांचे घरी आपण कधीच माधुकरी मागत नाहीत. त्यांच्याकडे तुम्ही गेलात, तर अन्य कोठे शिधा मागायची तुम्हाला गरजच पडणार नाही.'

साधू महाराज हसले, म्हणाले, 'त्यांच्या दारी मी गेलो होतो, परंतु त्यांच्याकडे देण्यासाठी काही नाही, असे म्हणत त्यांनी दार लावून घेतले. यावर मीच त्यांना 'सुखी भव' म्हणत आशीर्वाद देऊन आलो.

यावर भाविक म्हणाला, 'साधू महाराज, काही नाही कसं? सात पिढ्या बसून खातील, एवढी त्याच्याजवळ संपत्ती आहे. परंतु, हातून काही सुटतच नाही. त्याची ही वृत्ती बदलली आणि त्यांनी गावासाठी निधी दिला, तर गावाचे कितीतरी भले होईल. या सत्कार्यासाठी तुम्हीच त्याला उद्युक्त करू शकता. आपण काहीतरी करा.'

असे म्हणून भाविक निघून गेला. साधू महाराजांना धन, धान्य, संपत्तीची आस नव्हती, परंतु गावकऱ्याची  विनंती लक्षात घेऊन, संपत्तीचे केंद्रीकरण न होता, तिचा योग्य विनीमय व्हावा, यासाठी सावकाराला देण्याची सवय लावली पाहिजे. असा निश्चय करून, साधू महाराज दुसऱ्या दिवशी माधुकरी मागायला निघाले. चार घरे झाल्यावर, पाचवे दार सावकाराच्या घराचे ठोठावले. साधू महाराजांना पाहताच, सावकाराची बायको सूपातून धान्य आणत ओसरीवर आली. तिला पाहून झोपाळ्यावर दात कोरत बसलेला सावकार वसकन बायकोच्या अंगावर ओरडला. 'धान्याची कोठारे उतू चालली आहेत का आपली? या गोसावड्याला काय लागतेय मागायला? चल निघ इथून...'

साधू महाराज स्मित करून सावकाराला म्हणाले, 'महाराज, चूक तुमची नाही, तुमच्या हाताची आहे. एक काम करा, माझ्या झोळीत हात घाला, तुम्ही आणखी श्रीमंत व्हाल.'

सावकार चपापला. श्रीमंत होणार या मोहापायी, झोपाळा थांबवून क्षणात उठला, साधू महाराजांच्या झोळीत त्याने हात घातला. साधू महाराज म्हणाले, `महाराज, झोळीतले धान्य मुठीने उचला आणि आपण देत आहोत या भावनेने पुनश्च झोळीत टाका.' 

सावकाराने तसेच केले. परंतु, या कृतीची उकल त्याला झाली नाही. त्याची प्रश्नार्थक भावमुद्रा पाहून साधू म्हणाले, `महाराज, या हातांनी आजवर केवळ सगळ्यांकडून घेतले आहे, कधी काहीच दिले नाही. आपल्याकडची कोणतीही वस्तू दिली, तर तिचा क्षय होत नाही, तर ती वृद्धिंगत होते. आज ती सवय तुमच्या हाताला लावली. यापुढे हे हात मदतीसाठी, सेवेसाठी, सत्कार्यासाठी सरसावत राहतील आणि तुम्ही अधिकच श्रीमंत व्हाल!

आपल्यालाही दानाची सवय लावून घ्यायची असेल, तर एखाद्या दानशूराच्या झोळीत हात घालून पहावा. विंदा करंदीकर सांगतात, 

देणार्‍याने देत जावे
घेणार्‍याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देणार्‍याचे हात घ्यावे.

Web Title: Chaturmas 2022: If you want to be rich, read this story and act in Chaturmas accordingly!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.